सफाई कर्मचार्‍यांबाबत समाजाची मानसिकता बदलणे गरजेचे! -दिलीप हाथीबेड

0
706

प्रतिनिधी/पालघर, दि. 10 : सफाई कर्मचारी करीत असलेल्या कामांमुळे परिसर स्वच्छ राहून नागरीक अनेक आजारांपासून दूर राहू शकतात. त्यांचे काम सैनिकांच्याच तुलनेचे आहे. त्यामुळे सफाई कर्मचार्‍यांकडे पाहण्याची समाजाची मानसिकता बदलणे गरजेचे असल्याचे मत राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे सदस्य दिलीप के. हाथीबेड यांनी व्यक्त केले.

हाथीबेड सोमवारी पालघर जिल्ह्याच्या दौर्‍यावर आले होते. नालासोपारा येथे मागील महिन्यात ड्रेनेज लाईन साफ करताना तीन सफाई कर्मचार्‍यांचा दुर्देवी मृत्यु झाला होता. त्यासंदर्भात झालेल्या कार्यवाहीचा त्यांनी शासकीय विश्रामगृह येथे झालेल्या बैठकीत आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे, वसई विरार महानगरपालिकेचे आयुक्त बी. जी. पवार यांच्यासह संबंधित वरिष्ठ अधिकारी आणि विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.

हाथीबेड म्हणाले, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सफाई मोहिमेला प्राधान्य दिले आहे. त्यानुसार देशभरातील सर्वच यंत्रणा यात सहभागी होत आहेत. यातील महत्त्वाचा घटक असलेला सफाई कामगाराचा दुर्देवाने मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई मिळणे गरजेचे आहेच. त्याव्यतिरिक्त नालासोपारा येथे झालेल्या घटनेतील कर्मचार्‍याच्या कुटुंबियांपैकी एकाला सेवेत घ्यावे, अशी सूचना त्यांनी केली. या घटनेनंतर पुढील कार्यवाहीबाबत जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी तातडीने दखल घेऊन पाठपुरावा केल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.

नालासोपारा येथील घटनेसंदर्भातील तपास यंत्रणेने पारदर्शकतेने तपास करण्याचे निर्देश हाथीबेड यांनी दिले. याव्यतिरिक्त सफाई कर्मचार्‍यांच्या रिक्त जागा भरण्याची कार्यवाही तातडीने करावी, कंत्राटी कर्मचार्‍यांना लागू असलेले वेतन पूर्णपणे मिळेल याची दक्षता घ्यावी, कर्मचार्‍यांची दर तीन महिन्यांनी आरोग्य तपासणी व्हावी, महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळामार्फत त्यांना कर्ज उपलब्ध करून द्यावे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रम साफल्य योजनेअंतर्गत जिल्हाधिकारी यांनी जागा उपलब्ध करून देऊन 25 वर्षे सेवा पूर्ण झालेल्या कर्मचार्‍यांना घरे उपलब्ध करून द्यावीत, आदी विषयांबाबत आढावा घेऊन योग्य कार्यवाही करण्याबाबत हाथीबेड यांनी सांगितले. जिल्हाधिकारी स्तरावर एक देखरेख समिती आणि महानगरपालिका स्तरावर समन्वय समिती तयार करून यापुढे अशा घटना घडू नयेत याबाबत दक्षता घेण्याची सूचनाही त्यांनी केली. सफाई कर्मचार्‍यांमध्ये देखील स्वत:विषयी जागृती निर्माण होण्यासाठी एक चित्रफीत तयार करून त्यांना दाखविण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.

जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे यांनी सादरीकरणाद्वारे नालासोपारा येथील घटनेनंतर करण्यात येत असलेल्या कार्यवाहीबाबत माहिती दिली. सफाई कर्मचार्‍यांची संबंधित यंत्रणांमार्फत नियमित आरोग्य तपासणी तसेच त्यांच्यामध्ये जागृती करण्याबाबत कार्यवाही करण्यात येत असून त्यांना कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी विविध ठिकाणी शिबिरांचे आयोजन करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. सफाई कर्मचार्‍यांशी संबंधित सर्व विषयांचा आढावा घेण्यासाठी सर्व यंत्रणांची लवकरच एक बैठक घेण्यात येईल, असेही ते म्हणाले. दरम्यान, या बैठकीत मृत कर्मचार्‍यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

Print Friendly, PDF & Email

comments