जव्हार रुग्णालयास 200 खाटांची मंजूरी

0
699

54 कोटी रुपयांची तरतूद!

प्रतिनिधी/जव्हार, दि. 10 : येथील पतंगशहा कुटीर रुग्णालयास 200 खाटांची मंजूरी मिळाली असुन यासाठी 54 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे येथील नागरीकांना दिलासा मिळाला असुन येथे उपचार घेणार्‍या रुग्णांची होणारी हेळसांड काहीप्रमाणात कमी होणार आहे.

जव्हार तालुक्यात आरोग्य सेवेच्या नावाने बोंब असुन मोठ्या सोयीसुविधा असलेल्या रुग्णालयाची येथे गरज आहे. तालुक्यात पतंगशाह कुटीर रुग्णालय हेच एकमेव मोठे रुग्णालय असून शहरातील गंभीर आजारी रुग्ण प्राथमिक उपचार घेण्यासाठी येथे येत असतात. मात्र येथे खाटांची संख्या कमी असल्याने एका खाटेवर 3 रुग्ण तर अनेकवेळा रुग्णांना जमिनीवर झोपून उपचार घ्यावे लागत असल्याचे चित्र दिसते. त्यातच या रुग्णालयात अपुरा कर्मचारी वर्ग तसेच रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत डॉक्टर्सची संख्या कमी असल्याने डॉक्टर्स आणि वैद्यकीय कर्मचार्‍यांवर कामाचा अधिक ताण पडतो. येथे पाण्याचाही प्रश्‍न गंभीर असुन पाणी नसल्याने स्वच्छतेचा प्रश्‍न निर्माण होतो. विशेष म्हणजे अतिदक्षता विभाग नसल्याने गंभीर स्वरूपाच्या आजारी रुग्णांना सेलवास, नाशिक किंवा ठाणे येथे अधिक उपचारासाठी पाठवले जाते. मात्र वेळीच आरोग्य सेवा न मिळाल्यास रूग्ण रस्त्यातच दगावल्याची कितीतरी उदाहरणे आहेत.

पतंगशाह कुटीर रुग्णालयाला सिव्हील हॉस्पिटलचा दर्जा मिळावा यासाठी जेष्ठ नेते ऍड. राजाराम मुकणे यांनी उपजिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता. त्यावेळी जव्हार रुग्णालयात 200 खाटा वाढवून देऊ, असे आश्वासन देण्यात आले होते. तर यापुर्वी आरोग्यमंत्री असलेल्या डॉ. दीपक सावंत यांच्या सदस्यपदाची मुदत संपल्यानंतर त्यांचे पद एकनाथ शिंदे यांना देण्यात आले. पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर त्यांनी जव्हार तालुक्यातील दाभेरी, साखरशेत या ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रांची पाहणी केली. तसेच पतंगशाह कुटीर रुग्णालयास भेट दिली होती.

जव्हार येथील सामाजिक कार्यकर्ते पारस सहाणे यांनी जव्हार येथे सिव्हील हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेज स्थापन करावे अशी शासनाकडे मागणी करत आरोग्य मंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन जव्हार येथे आरोग्य यंत्रणेची आवश्यकता त्यांना पटवून दिली होती. आरोग्य मंत्री शिंदे यांनीही त्यांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत अधिकार्‍यांना पाहणी करण्याचे आदेश दिले होते.

अखेर सहाणे यांच्या मागणीनुसार जव्हार पतंगशहा कुटीर रुग्णालयात 200 खाटा वाढवण्यासाठी 53 कोटी 54 लाखांचा निधी मंजूर करण्यात आल्याचे पालघर जिल्हा शल्यचिकित्सकांनी पत्राद्वारे कळविले आहे.

दरम्यान, जव्हारच्या ग्रामीण भागातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत आरोग्य सेवा कशी पुरवली जाईल याकडे लक्ष देण्याची सूचना आरोग्य विभागाला केली असल्याचे आरोग्य मंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. तर आपल्या प्रयत्नांना यश आले असून जव्हारमधील आरोग्य सेवा सक्षम करण्याची शासनाकडे मागणी करण्यात आली होती. त्यावर 200 खाटा वाढण्यासाठी निधी मंजूर करण्यात आल्याचे कळविण्यात आले आहे. त्याबद्दल शासनाचे धन्यवाद, अशी प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्ते पारस सहाणे यांनी दिली आहे.

Print Friendly, PDF & Email

comments