चौकशीची नागरिकांची मागणी

प्रतिनिधी/वाडा, दि. 5 : तालुक्यातील खुपरी वनक्षेत्र कार्यक्षेत्रात येणार्या खुपरी गावातील गट नंबर 151 मधील क्षेत्रात बेकायदा हजारो ब्रास मातीचे उत्खनन तर याच कार्यक्षेत्रातील जाळे येथील 15 एकर जागेतून बेकायदा वृक्षतोड झाल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणाने वनमाफियांचे धाबे दणाणले असुन याप्रकरणी उच्चस्तरीय चौकशी करून संबंधितावर कारवाई करावी, अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे.
तालुक्यातील खुपरी गावाच्या हद्दीतील गट नंबर 151 ही जमीन वनविभागाच्या मालकीची आहे. या जमिनीत टेकडीचे सपाटीकरण करून हजारो ब्रास मातीचे उत्खनन विनापरवाना केले आहे. विशेष म्हणजे या जागेपासून हाकेच्या अंतरावर वनपाल यांचे कार्यालय असतानाही माती चोरीला गेल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. तसेच जाळे या गावातील गट नंबर 58/1 अ या जागेतील 15 एकर मध्ये साग, खैर, इंजाली व ऐन अशा मौल्यवान झाडांची बेसुमार वृक्षतोड दुसरे मालकी प्रकरण दाखवून केली आहे.

विशेष म्हणजे एवढी प्रचंड वक्षतोड व हजारो ब्रास मातीचे उत्खनन होताना येथील कर्मचारी काय करत होते? असा सवाल आता उपस्थित होऊ लागला आहे. त्यांच्या आशिर्वादाने हे झाले असल्याचे बोलले जात आहे.
यासंदर्भात वाडा पश्चिम वनविभागाचे प्रभारी वनक्षेत्रपाल नितीन काळण यांच्याशी संपर्क साधला असता थोड्या वेळाने माहिती देतो असे सांगून त्यांनी याप्रकरणावर बोलणे टाळले. तर मातीने भरलेले डंपर वाहन ताब्यात घेतले असून एका मजुरावर यासंदर्भात गुन्हा दाखल केला आहे. तसेच याबाबतची अधिक चौकशी सुरू असल्याचे खुपरीचे वनपाल सी. टी. बागकर यांनी सांगितले. मात्र वृक्षतोडी संदर्भात विचारले असता वरिष्ठ अधिकार्यांकडून आपल्याला माहिती मिळेल, असे सांगून त्यांनीही अधिक बोलणे टाळले.
जाळे येथील 15 एकर जागेत झालेल्या वृक्षतोडीची उच्चस्तरीय अधिकार्यामार्फंत चौकशी करावी, तर खुपरी येथे झालेल्या उत्खननाची वनविभाग, दक्षता पथक व महसूल विभाग अशी संयुक्त चौकशी करावी, अशी मागणी मनसेचे नेते देवेंद्र भानुशाली यांनी केली आहे.