दहशतवादी घुसल्याच्या चर्चेने वसईत खळबळ!

0
488

संशयित इसम निघाले चित्रपटात काम करणारे कलाकार

राजतंत्र न्यूज नेटवर्क/वसई, दि. 28 : वसई पश्‍चिमेतील पंचवटी नाका भागात बँकेच्या सुरक्षारक्षकाने दहशतवादी पाहिल्याची खबर वार्‍यासारखी पसरल्याने काल, सोमवारी परिसरात एकच खळबळ उडाली. मात्र अवघ्या 40 मिनिटांत पोलिसांनी या घटनेचा तपास करत सुरक्षारक्षकाने पाहिलेले संशयित इसम चित्रपटात काम करणारे कलाकार असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांसह येथील नागरीकांनी सुटकेचा निश्‍वास सोडला.

काल, दुपारी पावणे तीनच्या सुमारास भारत बँकेच्या अंबाडी रोड शाखेचे सुरक्षारक्षक अनिल रामदास महाजन यांनी पालघर नियंत्रण कक्षास संपर्क साधुन पंचवटी नाका भागात लांब दाढी, रंग गोरा, अंगात आर्मीसारखा टि शर्ट, काळी पँट, तोंडाला रुमाल तसेच पोटावर मॅगझीन सारखे दिसणारे पॉकिट अशा वर्णनाचा संशयित दहशतवादी पाहिल्याची माहिती दिल्यानंतर वसई पोलिसांची विविध पथके पंचवटी नाका, अंबाडी रोड, ओम नगर तसेच सनसिटी परिसरात सदर इसमाचा शोध घेण्यासाठी रवाना करण्यात आली. तर वसईचे अपर पोलीस अधिक्षक विजयकांत सागर व उप विभागीय पोलीस अधिकारी डॉ. अश्विनी पाटील यांनी तत्काळ घटनास्थळ गाठत येथील संगीत हॉटेलचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता सदर इसम एका टुरिस्ट बसमध्ये चढल्याचे त्यात दिसले. यानंतर पोलिसांच्या एका पथकाने त्या बसची माहिती काढली असता गास रोड येथे एका चित्रपटाची शुटींग चालु असुन ही बस तेथील असल्याची माहिती समोर आली. पोलीसांचे एक पथक लगेचच गास रोड येथील शुटिंगच्या ठिकाणी पोहोचल्यानंतर तेथे सुरक्षारक्षकाने वर्णन केलेल्या पेहराव्यासारखे 20 ते 25 इसम आढळून आले. पुढे या सर्व जणांना माणिकपूर पोलीस स्टेशनमध्ये आणून त्यांची चौकशी केली असता हे सर्वजण एका हिंदी चित्रपटाच्या शुटींगमध्ये साईड रोलचे काम करण्यासाठी येथे आले असल्याचे व यातीलच एकजण पंचवटी नाका परिसरात काही कामानिमित्त आल्याचे स्पष्ट झाले. सुरक्षारक्षकाने देखील त्याने पाहिलेल्या संशयिताची ओळख पटविल्यानंतर तो दहशतवादी नसल्याचे स्पष्ट झाले व वसई पोलिसांसह येथील नागरीकांनी सुटकेचा निश्‍वास सोडला.

पालघर पोलिसांनी राबविलेल्या एक कॅमेरा शहरासाठी या उपक्रमाअंतर्गत लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्‍याचा या घटनेचा तपास करण्यास मोठ्या प्रमाणावर उपयोग झाला. त्यामुळे नागरिकांनी आपल्या भागात घडणार्‍या घटनांवर लक्ष ठेवण्यासाठी एक कॅमेरा शहरासाठी या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

सुरक्षारक्षक महाजन यांचा सत्कार
दरम्यान, भारत बँकेचे सुरक्षारक्षक अनिल महाजन हे भारतीय सिमा सुरक्षा बलातुन सेवानिवृत्त झाले असुन ते आपल्या सेवाकाळात जम्मु-काश्मिर येथे कर्तव्यावर होते. त्यांनी तत्परता दाखवुन तात्काळ पोलीस विभागाला या घटनेची माहिती दिल्याने हा प्रकार उघडकीस आला. त्यामुळे त्यांनी प्रसंगावधान दाखवुन केलेल्या उल्लेखनिय कामगिरीबाबत त्यांचा वसई पोलिसांतर्फे पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

Print Friendly, PDF & Email

comments