पालघरचा गड शिवसेनेने जिंकला!

0
1870
  • 88598 हजारांनी राजेंद्र गवितांचा विजय
  • बविआच्या बळीराम जाधव यांचा केला पराभव

वार्ताहर/बोईसर, दि. 23 : गेल्या महिन्याभरापासून पालघरचा गड कोण जिंकणार याची उत्सुकता आज, 23 मे रोजी जाहीर झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर संपली असुन शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार राजेंद्र गावित यांचा अखेर विजय झाला आहे. गावित यांनी 88 हजार 598 मताधिक्क्याने बळीराम जाधव यांना पराभवाची धूळ चारली.

अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेल्या पालघर लोकसभा मतदार संघासाठी 29 एप्रिल रोजी चौैथ्या टप्प्यात निवडणूक पार पडली होती. एकुण 2 हजार 177 मतदान केंद्रांवर पार पडलेल्या या निवडणुकीत जिल्ह्यातील 18 लाख 85 हजार 297 मतदारांपैकी 12 लाख 1 हजार 298 (63.72 टक्के) मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. तर भाजप-शिवसेना युतीचे उमेदवार राजेंद्र धेड्या गावित, बहुजन विकास आघाडीचे बळीराम सुकुर जाधव, वंचित बहुजन आघाडीचे सुरेश अर्जून पाडवी, बहुजन समाज पार्टीचे संजय लक्ष्मण तांबडा, बहुजन मुक्ती पार्टीचे संजय रामा कोहकेरा, मार्क्सिस्ट लेनिनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (रेड फ्लॅग) चे कॉम्रेड शंकर बदादे, आंबेडकराईट पार्टी ऑफ इंडियाचे देवराम झिपर कुरकूटे व दत्ताराम जयराम करबट, भोंडवे ताई मारूती, राजू दामू लडे, विष्णू काकड्या पाडवी तसेच स्वप्नील महादेव कोळी असे पाच अपक्ष उमेदवार मिळुन 12 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. मात्र भाजप-शिवसेना युतीचे उमेदवार राजेंद्र गावित व मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा लाभलेले बहूजन विकास आघाडीचे उमेदवार बळीराम जाधव यांच्यातच खरी लढत होती. पालघर लोकसभा मतदारसंघ हा 6 विधानसभा मतदारसंघात विभागला गेला असून त्यातील वसई, नालासोपारा व बोईसर या मतदारसंघातून बहुजन विकास आघाडी, तर विक्रमगड आणि डहाणू मतदारसंघातून भाजप व पालघर मतदारसंघातून शिवसेना प्रतिनिधित्व करत असल्याने राजेंद्र गावित व बळीराम जाधव यांच्यात अटीतटीची लढत होणार असल्याचे निश्‍चित होते. त्यामुळे संपुर्ण जिल्ह्यातील नागरीकांची नजर आज जाहीर होणार्‍या निवडणूक निकालांकडे लागली होती.

त्यानुसार आज सकाळी 8 वाजता मतमोजणीला सुरूवात झाल्यानंतर पहिल्या दोन फेरींमध्ये बहुजन विकास आघाडीने आघाडी घेतली. मात्र तिसर्‍या फेरीनंतर आघाडी घेतलेल्या महायुतीच्या राजेंद्र गावित यांनी अखेरपर्यंत आपली आघाडी कायम ठेवली व 36 व्या फेरीअंती त्यांनी 88 हजार 598 मतांनी बळीराम जाधव यांचा पराभव केला. गावित यांना 5 लाख 79 हजार 989 तर जाधव यांना 4 लाख 91 हजार 391 मते मिळाली. विशेष म्हणजे बहुजन विकास आघाडीचा बालेकिल्ला असलेल्या नालासोपारा येथून 24 हजार, वसई येथून 11 हजार तर बोईसर विधासभेतून 28 हजार मतांच्या फरकाने गावित यांनी आघाडी घेतली. तर पालघर विधानसभेमध्ये सर्वाधिक 60 हजाराच्या फरकाने आघाडी घेऊन युतीचा विजयी झाला. या निवडणुकीत अपक्ष उमेदवार दत्ताराम जयराम करबट हे केवळ 13 हजार 921 मते मिळवून तिसर्‍या तर वंचित बहुजन आघाडीचे सुरेश अर्जून पाडवी 13 हजार 715 मते मिळवून चौथ्या स्थानी फेकले गेले. तर अनेक पक्षांच्या उमेदवारांना 4 आकडी संख्याही ओलांडता आली नाही.

दुसरीकडे पालघरच्या जागेसाठी काटे की टक्कर होणार असल्याचे वातावरण निर्माण झाल्याने मतमोजणी केंद्राच्या आवारात दुपारी 1 वाजेपर्यंत कार्यकर्ते दिसुन आले नाही. मात्र गावित 50 ते 60 हजार मतांनी आघाडीवर आल्यानंतर जिल्ह्यातील युतीच्या कार्यकर्त्यांनी पालघरमध्ये येऊन एकच जल्लोष सुरु केला. शिवसेना नेते तथा बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, शिवसेनेचे पालघर जिल्हा संपर्क प्रमुख रवींद्र फाटक, माजी महापौर संजय मोरे, जिल्हा प्रमुख राजेश शहा, महिला आघाडी, युवा सेना तसेच भाजप व श्रमजीवी संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी यावेळी उपस्थित राहून विजय साजरा केला.

अंतिम निकालानंतर शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी पालघरच्या मतदारांचे आभार मानले. गुंडगिरी, पैशाचा पाऊस पाडणार्‍या पक्षाला नागरिकांनी घरी पाठवले व पालघरमध्ये काम करणार्‍या उमेदवाराला पसंती दाखवली, असे सांगत शिंदे यांनी पुन्हा पुन्हा नागरिकांचे आभार मानले.

तर मतदाराला जिल्ह्याला भेडसावणार्‍या समस्या कोण सोडवते हे पालघरमधील जनतेला माहित असल्याने त्यांनी भरघोस मते आपल्या पदरी टाकली. त्यांचा हा विश्वास खरा ठरवण्यासाठी आणखी प्रयत्न करणार, अशी प्रतिक्रिया गावित यांनी विजयानंतर दिली.

दरम्यान, यापुर्वी झालेल्या पालघरच्या पोटनिवडणुकीत भाजपचा विजय झाल्यामुळे या लोकसभा निवडणुकीत ही जागा कुणाकडे जाणार यावरून वाद होता. अखेर ही जागा शिवसेनेकडे आली पण भाजपमधून शिवसेनेत आलेले राजेंद्र गावित यांना इथून उमेदवारी देण्यात आली.

Print Friendly, PDF & Email

comments