
वार्ताहर/बोईसर, दि. 8 : तारापूर औद्योगिक परिसरामध्ये (एमआयडीसी) पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी विविध ठिकाणी गटारी खोदण्याचे काम सुरु आहे. मात्र जुन्या गटारी व जमिनीत काही फुटावर खोदकाम केल्यास मोठ्या प्रमाणावर रासायनिक सांडपाणी बाहेर येत असल्याने पावसाळा सुरु होण्यापुर्वीच या नव्या गटारी रासायनिक सांडपाण्यामुळे पूर्ण भरल्या आहेत. प्रदूषण नियंत्रण मंडळ व एमआयडीसीचे अधिकारी याकडे दुर्लक्ष असल्याने कारखानदारांचे फावले असून त्याचा त्रास मात्र येथील नागरिक व कामगारांना सहन करावा लागत आहे.

तारापुर एमआयडीसी परिसरात गेल्या दोन वर्षांपासून पावसाचे पाणी वाहून नेण्यासाठी गटारींचे काम सुरू आहे. मात्र या गटारींच्या कामासाठी खोदकाम करत असताना अनेक ठिकाणी काही फुटांवर खोदकाम केल्यावर जमिनीमधुन रासायनिक सांडपाण्याचे झरे वाहत असल्याचे दिसुन येत आहे. या प्रकारावरुन येथील प्रदुषणाची पातळी अधोरेखित होत असतानाही हे रासायनिक सांडपाणी कुठून व कसे येते? याबाबत साधी पडताळणी देखील प्रदूषण नियंत्रण मंडळ किंवा एमआयडीसीचे अधिकारी करत नसल्याने संबंधित अधिकार्यांचा प्रदुषणाबाबतचा हलगर्जीपणा येथील प्रदुषण वाढीस जबाबदार ठरत असल्याची नागरीकांमध्ये चर्चा आहे.
तारापुर एमआयडीसी परिसरातील कारखानदार राजरोसपणे आपल्या कारखान्यातील रासायनिक सांडपाणी नैसर्गिक नाल्यात तर कोणी बोअरवेल खोदून त्यामध्ये टाकत असल्याचे अनेकवेळा समोर आले आहे. यामुळे जमिनीतील पाणी दुषित होत असल्याने सालवड, कुंभवली, पाम, टेम्भी, कोलवडे अशा एमआयडीसीच्या आजुबाजुला असलेल्या गावांमधील विहिरी व बोअरवेल निकामी झाल्या आहेत. तर पुढे नांदगाव व नवापूर खाडीमध्ये हे रासायनिक सांडपाणी मिसळत असल्याने या खाड्यांसह समुद्रातील माश्यांच्या प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. दरम्यान, याप्रश्नी अनेक वेळा स्थानिक गावकर्यांनी आवाज उठवला असताना देखील या प्रश्नाकडे प्रदूषण नियंत्रण मंडळ प्रत्येक वेळी दुर्लक्ष करत असल्याचा आरोप आहे.