
प्रतिनिधी/वाडा, दि. 6 : निसरडी गवताळ पाऊलवाट, 90 अंशातील सरळ उभी चढाई, पूर्वेकडे जवळपास सहाशे फूट खोल दरीचा उतार आणि पाण्याची प्रचंड कमतरता, असा माहुली किल्ल्याचा एक चित्तथरारक अनुभव देणारा भाग असलेल्या वजीर सुळक्यावरील अतिकठीण चढाईची मोहीम पॉईंट ब्रेक ऍडवेन्चर्स टीमने फत्ते केली आहे.

शहापूर तालुक्यात असलेला माहुली किल्ला हा दुर्गप्रेमींसाठी नेहमीच एक पर्वणी ठरत असतो आणि म्हणूनच या किल्ल्याची चढाई करण्यासाठी अनेक दुर्गप्रेमी विविध ठिकाणाहुन येथे येत असतात. मात्र माहुली किल्ला जितका रोमांचक आहे, त्यापेक्षा अधिक चित्तथरारक आहे या किल्ल्याचा एक भाग असलेला वजीर सुळका. या वजीर सुळक्यावर महाराष्ट्र दिनी (1 मे) पॉईंट ब्रेक ऍडवेन्चर्स या दुर्गवेड्या टिमने प्रस्तरारोहण केले. जॉकी साळुंके, चेतन शिदे यांच्यासह आदितेश घारे (नाशिक), अनिल गातवे (नाशिक), गिरीष डगाणे (वाडा), दिपक विसे (मुरबाड), गणेश गायकवाड (पुणे), योगेश पवार (ठाणे), वेदांत व्यापारी (मुरबाड) आदी पॉईंट ब्रेक ऍडवेन्चर्सच्या सदस्यांनी 1 मे रोजी सकाळी 7 वाजता वजीर सुळक्याची चढाई सुरू केली. तर तब्बल 2 तास 15 मिनिटे ही अतिकठीण चढाई करत सुळक्याचा माथा गाठण्यात या टीमला यश आले.

हा एक अतिशय रोमहर्षक अनुभव असून प्रत्येक दुर्गप्रेमींसाठी ही एक पर्वणी असते, असे मत या टीममधील गिरीष डेंगाणे यांनी व्यक्त केले. तर गिर्यारोहण हे एक दोन दिवसाचे काम नसून नियमित सराव, शिस्तबद्धपणा, व्यायाम व अनुभव यातून केले जाते व यानेच अपघात न होता यशाचे शिखर गाठून मोहीम फत्ते होतात, असे मत या टीमने व्यक्त केले.