निवडणुकीच्या पुर्वसंध्येला शिवसेना-बविआमध्ये राडा!

0
1727

दोन्ही पक्षांच्या 80 ते 90 कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा

राजतंत्र न्यूज नेटवर्क/पालघर, दि. 30 : शिवसेनेचे आमदार व पालघर जिल्हा संपर्कप्रमुख रवींद्र फाटक यांनी मतदानाच्या आदल्या रात्री आपला मतदारसंघ नसतानाही नालासोपार्‍यात हजेरी लावल्यामुळे शिवसेना व बहूजन विकास आघाडीच्या (बविआ) कार्यकर्त्यांमध्ये निवडणुकीच्या पुर्वसंध्येलाच जोरदार राडा झाला. याप्रकरणी तुळींज पोलिसांनी दोन्ही पक्षांनी दिलेल्या परस्परविरोधी फिर्यादीवरुन आमदार रवींद्र फाटक तसेच बविआचे महापौर व माजी उप महापौरांसह दोन्ही पक्षांच्या एकुण 80 ते 90 कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

मतदानाच्या आदल्या रात्री म्हणजेच रविवारी रात्री साडेबाराच्या सुमारास आमदार रवींद्र फाटक महायुतीचे उमेदवार राजेंद्र गावीत यांचे निवडणूक प्रतिनिधी असलेले जितेंद्र शिंदे यांच्या नालासोपारा पुर्वेतील सेंट्रल पार्क रोड परिसरातील कार्यालयात आले होते. फाटक यांच्यासह 25 ते 30 पदाधिकारी व कार्यकर्ते येथे जमले होते. यावेळी त्यांची गाडी पाहून बविआचे नेते व महापौर रुपेश जाधव, माजी उप महापौर तथा नगरसेवक उमेश नाईक यांच्यासह 50 ते 60 कार्यकर्ते तेथे जमा झाले. या गाडीतून पैशांचे वाटप केले जात आहे, असा आरोप करत बविआच्या कार्यकर्त्यांनी जवळपास दोन ते तीन तास फाटक यांची गाडी अडवून, बॅग तपासणीची मागणी केल्यामुळे सेना आणि बविआचे कार्यकर्ते आमने-सामने आले व पुढे दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची होऊन तणाव निर्माण झाला.

अखेर पोलिसांनी दोन्ही पक्षांच्या परस्पर विरोधी फिर्यादीवरुन शिवसेनेचे आमदार रवींद्र फाटक, पदाधिकारी अजिंक्य गावकर, नवीन दुबे, जितेंद्र शिंदे, उत्तम तावडे, शिरीष चव्हाण, हेमंत पवार व इतर 25 ते 30 कार्यकर्ते तसेच बविआचे महापौर रुपेश जाधव, माजी उप महापौर उमेश नाईक, पदाधिकारी भरत मकवाना, प्रशांत राऊत, अतुल सांळुखे, निलेश देशमुख, भुपेंद्र पाटील व इतर 50 ते 60 कार्यकर्त्यांविरोधात बेकायदेशीर जमाव करुन धक्काबुक्की करणे व एकमेकांचा रस्ता रोखून धरणे असे आरोप ठेऊन तुळींज पोलीस स्टेशनमध्ये भारतीय दंड विधान संहितेचे कलम 341,143,323 सह म.पो.अधि. 37(1)(3),135 नुसार गुन्हा दाखल केला असुन पुढील तपास सुरु आहे

दरम्यान, प्रचाराचा कालावधी संपल्यानंतर मतदार संघाबाहेरून आलेले व त्या मतदारसंघाचे मतदार नसलेल्या नेत्यांनी त्या मतदारसंघात उपस्थित राहू नये, असे निवडणुक आयोगाचे निर्देश असताना नालासोपारा येथे आलेले आमदार रवींद्र फाटक यांच्याविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे.

Print Friendly, PDF & Email

comments