
भारतातील पहिल्या बालशिक्षणतज्ज्ञ आणि अंगणवाडीच्या जनक ताराबाई मोडक यांची आज १२७ वी जयंती. ताराबाईंची शिक्षणक्षेत्रातील समज काळाच्या १०० वर्षे पुढे होती असे आता स्पष्ट झाले आहे. ज्या ज्ञानरचनावादाचा आज बोलबाला सुरु झाला आहे त्या ज्ञानरचनावादी शिक्षणपद्धतीचा आग्रह ताराबाईंनी स्वातंत्र्यपूर्व काळातच धरला होता. आज स्वातंत्र्याची पंचाहत्तरी जवळ येत असताना अजूनही आपण या शिक्षणपद्धतीचा म्हणावा तसा उपयोग केलेला दिसत नाही. ताराबाई आणि अनुताई वाघ यांनी जे शिक्षणाचे प्रयोग केले त्यापासून आपल्याला बरेच काही शिकण्यासारखे आहे. हा लेख JPEG Format मध्ये वाचण्यासाठी येथे CLICK करा
ताराबाई ह्या फिलॉसॉफीच्या पदवीधर होत्या. १९२१ च्या सुमारास राजकोटच्या बार्टन फीमेल ट्रेनिंग कॉलेजमध्ये प्राचार्यपदावर कार्यरत असताना त्यांना गिजुभाई बधेका यांच्या शिक्षणप्रयोगांविषयी समजले. आणि त्या सौराष्ट्रातील भावनगर येथील दक्षिणामूर्ती या संस्थेत गिजुभाई करीत असलेल्या शैक्षणिक प्रयोगामध्ये सहभागी झाल्या. बालशिक्षणाचे कार्य रुजवण्यासाठी त्यांनी १९२६ मध्ये गिजुभाईंसह नूतन बाल शिक्षण संघाची स्थापना केली. शिक्षणपत्रिका हे हिंदी व मराठी भाषेतून प्रसिद्ध होणारे नियतकालिक सुरु केले. १९३९ मध्ये गिजुभाईंचे निधन झाल्यानंतर नूतन बाल शिक्षणाची संपूर्ण धुरा सांभाळली. बालशिक्षणाचे प्रयोग करुनच त्या थांबल्या नाहीत. बालशिक्षणाचा जसा प्रचार आणि प्रसार होईल तशी त्यासाठी प्रशिक्षित शिक्षकवर्गाची आवश्यकता भासेल हे गृहीत धरुन बालअध्यापक विद्यालय देखील स्थापन केले. १९३६ मध्ये त्यांनी मुंबईमध्ये आपल्या कल्पनांवर आधारित शिशूविहार व त्याच्या जोडीला बालअध्यापक विद्यालय सुरु केले.
शहरामध्ये बालशिक्षणाचे कार्य सुरु असताना महात्मा गांधीजींच्या खेड्यामध्ये कार्य करा या सल्ल्यापासून त्यांनी प्रेरणा घेतली. आणि १९४५ मध्ये त्या बोर्डीत दाखल झाल्या. बोर्डीच्या हरिजन वस्तीमध्ये बालशिक्षणाचा पाया रचण्यास सुरुवात झाली. त्यांना अनुताई वाघ यांच्यासारख्या सहकारी लाभल्या. ताराबाई आणि अनुताई यांनी हरिजन वस्तीपासून सुरु केलेला प्रवास कुरणशाळा, घंटाशाळा, अंगणवाडी असा होत गेला. यथावकाश अंगणवाडी ही संकल्पना शासकीय पातळीवर स्वीकारली गेली. १९५८ मध्ये ताराबाई आणि अनुताई यांनी कोसबाडच्या टेकडीवर कार्य सुरु केले. कोसबाडला अंगणवाडी ते अंगणवाडी सेविका प्रशिक्षण केंद्र, अध्यापक विद्यालय उभे राहिले. या अध्यापक विद्यालयाने आतापर्यंत हजारो शिक्षक घडवले.
ताराबाईं १९४६ ते १९५१ या काळात मुंबई राज्याच्या विधानसभा सदस्य होत्या. त्यांनी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शाळा पाठ्यपुस्तक समितीवर अनेक वर्षे काम केले आहे. त्या अखिल भारतीय बालशिक्षण विभागाच्या २ वेळा अध्यक्षा होत्या. अनेक राज्यांच्या आणि केंद्र सरकारच्या शिक्षण समित्यांवर त्यांनी काम केले आहे. महात्मा गांधींनी त्यांच्या संकल्पनेतील बुनियादी शिक्षण पद्धतीचा आराखडा तयार करण्याचे काम त्यांच्याकडे सोपवले होते. १९४९ मध्ये इटलीमध्ये भरलेल्या आंतरराष्ट्रीय बालशिक्षण परिषदेमध्ये भाषण करण्याची संधी त्यांना मिळाली. या कार्याची दखल घेऊन १९६२ साली त्यांना भारत सरकारने पद्मभूषण पुरस्काराने गौरविले होते.
१९७३ मध्ये ताराबाईंचे निधन झाले. त्यानंतर नूतन बाल शिक्षणसंघाची जबाबदारी अनुताईंच्या खांद्यावर आली. त्यांनी ती यथार्थपणे पेलली. शिक्षणपत्रिकेचे संपादन केले. पुढे ठाणे जिल्हा स्त्री शक्ती समिती स्थापन करुन कर्णबधिर विद्यालय सुरु केले. ग्राममंगल ही प्रयोगशील शिक्षण देणारी संस्था स्थापन केली. रोजगाराभिमूख शिक्षणाचे अनेक प्रयोग केले. १९९२ साली अनुताईंचे निधन झाले. आणि यानंतर नूतन बाल शिक्षण संघासमोर आव्हान निर्माण झाले. ही आव्हाने संघाने लिलया पेलली. आज नूतन बाल शिक्षण संघ ताराबाई आणि अनुताई यांचे संस्कार आणि त्यांनी आखून दिलेल्या मार्गावर चालून त्यांच्या कार्याचा गौरवशाली वारसा २१ व्या शतकाला साजेशा पद्धतीने पुढे नेत आहे. आजही कोसबाडच्या टेकडीवरुन शिक्षणक्षेत्रातील धुरीणांना मोठी उर्जा मिळत असते.
ताराबाई आणि अनुताई यांच्या कार्यातून इतरांना प्रेरणा व उर्जा मिळावी आणि बालशिक्षणक्षेत्रात विशेष कार्य करणाऱ्या संस्था आणि व्यक्तींना प्रोत्साहन मिळावे यासाठी नूतन बाल शिक्षण संघातर्फे आजच्या दिवशी ‘ पद्मभूषण ताराबाई मोडक विशेष संस्था पुरस्कार ‘ व ‘ पद्मश्री अनुताई वाघ विशेष व्यक्ती पुरस्कार ‘ दिले जातात. यातून नूतन बाल शिक्षण संघाची बालशिक्षण क्षेत्रातील दीपस्तंभ बनण्याची आणि दुसऱ्यांना प्रकाश देण्याची वृत्ती आजही कायम असल्याचे दिसत असून त्यातून ताराबाईंचे आणि अनुताईंचे आशीर्वाद पुरस्कार्थींना मिळत आहेत. पद्मभूषण ताराबाई मोडक आणि पद्मश्री अनुताई वाघ यांना आजच्या दिनी विनम्र अभिवादन. त्यांच्या कार्याला सलाम!