आचारसहिंता भंग केल्याप्रकरणी 4 जणांविरोधात तक्रार दाखल

0
4599
फाईल छायाचित्र

राजतंत्र न्यूज नेटवर्क/पालघर, दि. 5 : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या दौर्‍यादरम्यान सफाळे व केळवे येथे कोणत्याही परवानगीशिवाय पक्षाचे झेंडे, बॅनर्स व स्टेज उभारल्याप्रकरणी तसेच विरार येथे युवा विकास आघाडीमार्फत विनापरवानगी संवाद मेळाव्याचे आयोजन केल्याने एकुण चार जणांविरोधात आचारसंहिता भंगाची तक्रार दाखल करण्यात आली आहे.

लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या पार्श्‍वभुमीवर जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू असताना 2 एप्रिल रोजी शिवसेना, भाजप, रिपाइं व इतर मित्र पक्षांच्या महायुतीमधील शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांच्या पालघर जिल्हा दौर्‍यादरम्यान सफाळे पुर्वेतील वैतरणा नदीवरील पारगाव ब्रीजवर महायुतीचे निवडणूक चिन्ह असलेले वेगवेगळ्या आकाराचे झेंडे लावण्यात आले होते. याबाबत जिल्हा निवडणुक आयोगाच्या पथकाने परवानगीबाबत तपास केला असता सार्वजनिक बांधकाम विभागाची कुठलीही परवानगी न घेता हे झेंडे लावल्याचे समोर आले. तसेच या दौर्‍यानिमित्त केळवे येथील माकुणसार ग्रामपंचायतीसमोर आयोजित उद्धव ठाकरे यांच्या संवाद कार्यक्रमात कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता पक्षाचे झेडें, बॅनर्स व स्टेज लावल्याचे आदर्श आचारसहिंता पथकातील सव्र्हेलन्स टिमने केलेल्या व्हिडीओ चित्रीकरणात आढळून आले होते. तर 31 मार्च रोजी युवा विकास आघाडीतर्फे संबंधित पोलीस स्टेशनकडून कोणत्याही स्वरूपाची परवानगी न घेता विरार येथे युवा संवाद मेळाव्याचे आयोजन करुन आचारसहिंतेचा भंग करण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे.

त्यामुळे याप्रकरणी सफाळे येथील संतोष सदानंद पाटील, केळवे येथील पंकज जयवंत वर्तक व सचिन मच्छिन्द्र पाटील तसेच युवा संवाद मेळाव्याचे आयोजन करणारे युवा विकास आघाडीचे सचिव जतीन पाटील यांच्या विरोधात आचारसहिंता भंग केल्याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली असुन अधिक तपास सुरु आहे.

Print Friendly, PDF & Email

comments