महायुतीचे उमेदवार राजेंद्र गावितांचा उमेदवार अर्ज दाखल

0
507

प्रतिनिधी/पालघर, दि. 4 : शिवसेना-भाजप-रिपाइं-श्रमजीवी महायुतीचे पालघर लोकसभेचे उमेदवार राजेंद्र गावित यांनी आज, गुरुवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी पालघर शहरामध्ये महायुतीच्या हजारो कार्यकर्त्यांसह वाजत-गाजत शक्ती प्रदर्शन करण्यात आले.

पालघर लोकसभा मतदार संघातील आठ तालुक्यातील शिवसेना भाजप व रिपाइंचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते. तर श्रमजीवी संघटनेनेही मोठ्या प्रमाणात शक्तिप्रदर्शन करत गावित यांना पाठिंबा दर्शवला. रणरणत्या उन्हाची पर्वा न करता महायुतीचे कार्यकर्ते उत्साहाने हातात भगवे झेंडे घेऊन शहरातून काढण्यात आलेल्या रॅलीत सहभागी झाले होते.

हजारो कार्यकर्त्यांसह महायुतीचे शक्तिप्रदर्शन!

शिवसेना नेते तथा बांधकाम व आरोग्य मंत्री एकनाथ शिंदे, शिक्षणमंत्री विनोद तावडे, सेनेचे पालघर जिल्हा संपर्क प्रमुख रवींद्र फाटक, आमदार प्रताप सरनाईक, जिल्हा प्रमुख राजेश शहा, वसंत चव्हाण, पालघर लोकसभा संघटक श्रीनिवास वनगा, पालघर संपर्क महिला संघटक ममता चेंबूरकर, दीपा पाटील, महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षा ज्योती ठाकरे, ठाण्याचे महापौर शिंदे, कोकण पाटबंधारे महामंडळाचे उपाध्यक्ष जगदीश धोडी, पालघर विधानसभा संपर्क प्रमुख रमाकांत रात, जिल्हा महिला संघटक ज्योती मेहेर, रिपाइंचे जिल्हा अध्यक्ष सुरेश जाधव, डहाणू नगराध्यक्ष भरत राजपूत आदी महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत गावित यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

दरम्यान, काही दिवसांपुर्वीच खासदार राजेंद्र गावित यांनी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर सेनेतर्फे त्यांना उमेदवारी जाहिर करण्यात आली होती.

एकुण 6 अर्ज दाखल

पालघर लोकसभा मतदार संघासाठी चौथ्या टप्प्यात 29 एप्रिल रोजी निवडणूक होणार आहे. आज दोन उमेदवारांनी एकूण पाच अर्ज दाखल केले असुन आतापर्यंत दाखल अर्जांची संख्या सहा झाली आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी दिली. आज गावित यांच्यासह ताई मारूती भोंडवे यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर आतापर्यंत 20 जणांनी एकूण 52 अर्ज घेतले असून आज एकाही अर्जाची विक्री झाली नसल्याचे डॉ. नारनवरे यांनी सांगितले.

Print Friendly, PDF & Email

comments