जव्हार आदिवासी प्रकल्पात घोटाळ्यांची मालिका उघड

0
1853

विविध योजनांच्या माध्यमातून 10.5 लाखांचा अपहार

राजतंत्र न्यूज नेटवर्क/जव्हार, दि. 4 : जव्हार एकात्मिक आदिवासी प्रकल्पात सन 2014 व 2007-2008 दरम्यान राबविण्यात आलेल्या शासकिय योजनांमध्ये मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाल्याचे उघडकीस आले असुन आदिवासी लाभार्थ्यांना इंग्लिश स्पिकिंग व संगणक प्रशिक्षण तसेच महिलांना शिवणयंत्र व घरघंटी वाटप अशा विविध योजनांद्वारे 10 लाख 50 हजार रुपयांचा अपहार झाल्याची तक्रार जव्हार पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आली आहे. यातील काही घोटाळ्यात सरकारी कर्मचार्‍यांचाही सहभाग असुन संबंधितांविरोधात जव्हारच्या सहाय्यक प्रकल्प अधिकार्‍यांच्या फिर्यादीवरुन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

सहाय्यक प्रकल्प अधिकार्‍यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, सन 2004 साली आदिवासी लाभार्थ्यांसाठी राबविण्यात आलेल्या इंग्लिश स्पिकिंग प्रशिक्षण योजनेमध्ये 7 लाख 47 हजार 300 रुपयांचा गैरव्यवहार करण्यात आला आहे. तसेच सन 2008 व 2009 दरम्यान आदिवासी लाभार्थ्यांना संगणक प्रशिक्षण देण्याच्या योजनमध्ये विक्रमगड येथील श्रीराम इन्स्टिट्यूट या संस्थेने 50 हजार 250 रुपयांचा तर याच कालावधीत राबविण्यात आलेल्या शिवणयंत्र वाटप योजनेत प्रकल्पातील सरकारी कर्मचारी व शिवणयंत्र पुरवठा करणारी भुसावळ येथील जैन अ‍ॅण्ड कंपनी या कंपनीने संगनमत करुन 1 लाख 22 हजार रुपयांचा घोटाळा केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. सन 2008 – 2009 मध्ये राबविण्यात आलेल्या घरघंटी पुरवठा योजनेतही 1 लाख 33 हजार 606 रुपयांचा अपहार झाल्याचे तक्रारीत नमुद असुन जव्हार पोलीसांनी या घोटाळ्यांशी संबंधित सर्व जणांवर भारतीय दंड विधान संहितेच्या कलम 420 सह विविध कलमांन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Print Friendly, PDF & Email

comments