एसीजी असोसिएटेड कॅप्सुल्सच्या प्रकल्प विस्ताराला आशागड ग्रामपंचायतीचा रेड सिग्नल

ग्रामपंचायतीची भूमिका: आधी प्रदूषण नियंत्रित करा, मग विस्तार करा!

संजीव जोशी ([email protected] / 9822283444)

कंत्राटी कामगारांसाठी कंपनीने बनविले स्वतंत्र प्रवेशद्वार

डहाणू दि. १ एप्रिल २०१९ : येथील आशागड ग्रामपंचायतीच्या हद्दीतील एसीजी असोसिएटेड कॅप्सुल्स या आशिया खंडातील सर्वात मोठ्या अशा औषधांच्या रिकाम्या कॅप्सुल्स बनविण्याऱ्या उद्योगाच्या विस्तारास आशागड ग्रामपंचायतीकडून हरकत घेतली जाण्याची शक्यता आहे. विस्तारासाठी ना हरकत पत्र द्यायचे किंवा नाही यासाठी ग्रामसभेने एक समिती गठीत केली असून त्यामध्ये वकील संजय कुबल व लघु उद्योजक नरेंद्र बोभाटे यांचाही समावेश करण्यात आला आहे. ही समिती ना हरकत देताना सर्व घटकांचा बारकाईने विचार करीत असून उद्योगामुळे होणारे भूगर्भातील जलप्रदूषण हा कळीचा मुद्दा बनला आहे. परिसरातील विहिरींचे पाणी प्रदूषित झाले असून हे प्रदूषण प्रथम दूर करावे असे ग्रामपंचायतीने कळवले आहे.

बातमी ऐका
चिंचपाडा येथील विहिरीतील प्रदूषित पाणी

आशागड ग्रामपंचायत हद्दीतील चिंचपाडा, निंबारपाडा, डोंगरीपाडा या परिसरातील भूगर्भातील पाणी पूर्णपणे प्रदूषित झाले असून कंपनीची सांडपाण्यावर प्रक्रिया करणारी यंत्रणा सदोष आहे. आधीच कंपनीने रायतळी येथील बंधाऱ्यातून आदिवासींच्या शेती सिंचनासाठीचे हक्काचे पाणी पळविलेले असून तेही पाणी कमी पडते आहे. पाण्याचा दुसरा स्त्रोत उपलब्ध नाही. अशा परिस्थितीत विस्तार केल्यास प्रदूषणाची पातळी आणखी वाढणार आहे. कंपनी सांडपाण्यावर प्रक्रिया न करताच शोषखड्ड्यात सोडत असल्याने ते प्रदूषित पाणी जमिनीत मुरत असल्याची ग्रामस्थांची शंका आहे. कंपनी ग्रामस्थांना प्रत्यक्ष स्थळ

डोंगरीपाडा येथील विहिरीवर ग्रामपंचायतीने पाणी पिण्यास अयोग्य असल्याचा फलक मारला असला तरी हेच पाणी प्यावे लागते.

पहाणी करण्याबाबत टाळाटाळ करीत असल्याने या शंकेत अधिकच भर पडत आहे. एकीकडे आदिवासींचे हक्काचे पाणी पळवायचे आणि दुसरीकडे त्यांचे पिण्याचे पाणीही पिण्यालायक ठेवायचे नाही अशा प्रकारामुळे ग्रामस्थांमध्ये आधीच मोठा असंतोष आहे. यावर उपाययोजना म्हणून कंपनीतर्फे चिंचपाडा व निंबारपाडा येथे एक छोट्याश्या नळाद्वारे तुटपुंजे पाणी उपलब्ध करण्यात येत असले तरी आंघोळीसाठी प्रदूषित पाणी वापरल्यामुळे त्वचारोगांचे प्रमाण वाढले आहे. डोंगरीपाड्याला मात्र प्रदूषित पाणीच प्यावे लागत आहे.

कंपनीने टिचभर पाणी देण्याची केलेली व्यवस्था

कंपनीकडून स्थानिकांना डावलले जाण्याची भावना: या कंपनीमध्ये स्थानिक तरुणांना हेतुपुरस्सर रोजगाराच्या संधी दिल्या जात नसल्याची स्थानिकांची भावना आहे. त्याच बरोबर येथील स्थानिक व आदिवासी तरुणांकडून बेकायदेशीरपणे वर्षानुवर्षे कंत्राटी पद्धतीने काम करुन घेतले जात आहे. त्यासाठी कंपनीने दोन प्रवेशद्वारे ठेवली असून दोन्ही प्रवेशद्वारातून प्रवेश केलेले कामगार एकाच ठिकाणी व एकाच प्रकारचे काम करीत असले तरी मुख्य प्रवेशद्वारातून प्रवेश करणाऱ्यांना गलेलठ्ठ पगार आणि दुसऱ्या प्रवेशद्वारातून तुटपुंज्या पगारावर काम करणारे कंत्राटी कामगार जातात अशी परिस्थिती आहे. कंपनीचा विस्तार होत असताना या अस्वस्थतेने आता डोके वर काढले असून शोषण आणि प्रदूषणासाठी विस्ताराला का परवानगी द्यायची असा प्रश्न विचारला जात आहे.

विस्तारित प्रकल्पाचे प्रगतीपथावर असलेले काम

आशागड ग्रामपंचायतीने याबाबत कंपनीला कळवले असता कंपनी कुठलेही ठोस आश्वासन देत नसून केवळ दोन ओळींचे मोघम उत्तर देऊन वेळ निभावत आहे. कंपनी व्यवस्थापनाने महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ, डहाणू तालुका पर्यावरण संरक्षण प्राधिकरण, कामगार अधिकारी या सर्वांना आपल्या खिशात घातले असल्यामुळे बिनधास्तपणे ग्रामपंचायतीच्या ना हरकत पत्राची वाट न पहाता विस्तारित प्रकल्प उभारणीचे काम सुरु केले आहे. कंपनीच्या आवारात मोठ्या प्रमाणात विना परवानगी उत्खनन देखील सुरु केले आहे.

कंपनीच्या आवारात चालू असलेले विना परवानगी उत्खनन

या प्रश्नावर कंपनी व्यवस्थापनाची बाजू समजून घेण्यासाठी संपर्क साधला असता प्रतिसाद मिळाला नाही. यातून कंपनी व्यवस्थापनाकडे ठोस उत्तरे नसल्याचे दिसून येत आहे. 

हि बातमी JPEG स्वरूपात हवी असल्यास येथे CLICK करा!

या बातमीचा समावेश असलेला PDF स्वरूपातील अंक CLICK वाचण्यासाठी करा!

Print Friendly, PDF & Email

comments