सूर्या पाणीपुरवठा योजनेला विरोध : अटक शेतकर्‍यांच्या समर्थनार्थ हालोली येथे आंदोलन

0
639

>> एमएमआरडीए विरोधात ग्रामस्थ, शेतकरी आक्रमक

SURYA PRAKALPप्रतिनिधी/मनोर, दि. 14 : सूर्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजने विरोधात आंदोलन करणार्‍या शेतकर्‍यांना शनिवारी (दि. 12) पोलीसांनी अटक करुन त्यांच्याविरोधात मनोर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केल्याने एमएमआरडीए आणि पोलीस प्रशासनाने सूडबुद्धीने शेतकर्‍यांवर गुन्हे दाखल केल्याचा आरोप करीत हालोली, बोट, कुडे, सातीवली, ढेकाळे आणि दुर्वेस येथील ग्रामस्थ व शेतकर्‍यांनी आज आक्रमक होत एमएमआरडीए विरोधात महामार्गालगतच्या हालोली येथे आंदोलन केले.

अटक शेतकर्‍यांवरील गुन्हे मागे घेण्यात यावे या मुख्य मागणीसह पाणीपुरवठा योजनेची ठेकेदार कंपनी एल अँड टीने महामार्गाच्या आर.ओ.डब्ल्यू.मध्ये खोदकाम करीत असताना लगतच्या शेतकर्‍यांच्या शेतीची नासधूस केली आहे. त्यामुळे एमएमआरडीए कंपनी व त्यांच्या अभियंत्यांवर गुन्हा दाखल करण्यात यावा, मोबदल्यापासून वंचित सुर्या प्रकल्पग्रस्त शेतकर्‍यांना तातडीने मोबदला मिळावा, उपविभागीय अधिकारी आणि जिल्हाधिकार्‍यांनी आयोजित केलेल्या बैठकित निर्णय होईपर्यंत योजनेचे खोदकाम बंद ठेवण्यात यावे, आदी मागण्या उपस्थित करीत आंदोलनकर्त्यांनी एमएमआरडीएच्या अधिकार्‍यांना यावेळी धारेवर धरले. तसेच लेखी आश्वासनाशिवाय माघार घेणार नसल्याची भुमिका घेतली.

या योजनेच्या कामास विरोध केल्यास सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचा इशारा एमएमआरडीएमार्फत ग्रामपंचायतींना एका पत्राद्वारे देण्यात आला आहे. या पत्राचा शेतकर्‍यांनी यावेळी निषेध केला. शेतकर्‍यांवर कारवाईचा इशारा म्हणजे एमएमआरडीए हुकूमशाही पद्धतीने वागत असल्याचे मत आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केले.

हालोलीच्या सरपंच समृद्धी सांबरे, उपसरपंच अजय पाटील, दुर्वेसच्या सरपंच नीलम सांबरे, टेनच्या सरपंच जोत्सना गोवारी, सातीवलीच्या माजी सरपंच नलिनी, शिवसेनेचे शैलेश पाटील, प्रवीण नारगोळकर, दीपक पाटील आदींसह सर्व ग्रामपंचायतींचे सदस्य, ग्रामस्थ, शेतकरी आणि महिला मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होत्या.

एमएमआरडीएमार्फत मीरा-भाईंदर, वसई-विरार महापालिका व विविध 27 गावांसाठी 403 एमएलडी क्षमतेची पाणीपुरवठा योजना राबविली जात आहे. या योजनेच्या कामास सुरुवातीपासून महामार्गालगतच्या गावातील शेतकरी आणि ग्रामस्थांनी विरोध दर्शविला आहे. त्यातच योजनेच्या खोदकामास विरोध करणार्‍या आंदोलक शेतकर्‍यांना शनिवारी पोलिसांनी अटक करत त्यांच्या विरोधात मनोर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. एक दिवसाच्या पोलीस कोठडीनंतर या आंदोलक शेतकर्‍यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे.

  • दरम्यान, सोमवारी (ता.14) पालघरला सूर्या पाणीबचाव संघर्ष समितीची बैठक पार पडली. या बैठकीत शेतकर्‍यांवरील कारवाईचा निषेध व्यक्त करण्यात आला. तसेच येत्या गुरुवारी (दि.17) समितीमार्फत उपविभागीय अधिकारी कार्यालयावर सर्वपक्षीय मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.

एमएमआरडीए करीत असलेले काम कायदेशीर आहे. त्यामुळे पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू राहणार आहे.
-सिद्धवा जायभाये
सहाय्यक पोलीस निरीक्षक, मनोर

[divider]

  • आपण दैनिक राजतंत्रचे App आपल्या स्मार्टफोनमध्ये Download केलेत का?
  • दैनिक राजतंत्रच्या विश्वसनीय बातम्या आपल्या मोबाईलमध्ये मिळविण्यासाठी खालील Link ला भेट द्या!
  • स्वतः Download करा आणि इतरांनाही सांगा!

➡ DOWNLOAD APP

ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी दैनिक राजतंत्रचे फेसबुक पेज LIKE करा!

Print Friendly, PDF & Email

comments