प्रतिनिधी/मनोर, दि. 13 : दोन दिवसांपासून बंद असलेल्या सूर्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेच्या खोदकामास ग्रामस्थ व शेतकर्यांचा विरोध असताना शनिवारी (दि.12) पोलीस बंदोबस्तात दुर्वेस येथे सुरुवात करण्यात आल्याने या खोदकामास विरोध करणार्या 5 आंदोलकांना पोलिसांनी अटक केली असुन त्यांच्याविरोधात मनोर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल केले आहेत.
मीरा-भाईंदर व वसई-विरार महापालिकेसह 27 गावांसाठी एमएमआरडीएमार्फत 403 एमएलडी क्षमतेची पाणीपुरवठा योजना राबविली जात आहे. दिवाळीनंतर महामार्गावरील हालोली गावात तसेच वाडा खडकोना आणि दुर्वेस गावात सुरू केलेल्या या योजनेच्या खोदकामास येथील ग्रामस्थांनी वारंवार विरोध करुन कामे बंद पाडली होती. असे असताना दोन दिवसांपूर्वी ठेकेदार कंपनी असलेल्या एल अँड टीमार्फत दुर्वेस येथे खोदकामास सुरुवात करण्यात आली होती. त्यामुळे पुन्हा येथील ग्रामस्थ आणि शेतकर्यांनी कामास विरोध केल्यानंतर मनोरच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक सिद्धवा जायभाये यांनी मध्यस्थी करीत एमएमआरडीएला काम बंद करण्यास सांगितले होते. तसेच या संदर्भात जिल्हाधिकार्यांची भेट घेऊन तोडगा काढण्याचे सुचविले होते.
त्यानुसार आंदोलकांनी जिल्हाधिकार्यांची भेट घेऊन आपले गार्हाणे मांडले असता जिल्हाधिकार्यांनी विषय समजून घेत तातडीने शेतकरी आणि ग्रामस्थांची पालघरच्या उपविभागीय अधिकार्यांसोबत बैठक घेण्याचे व हा प्रश्न सोडवण्याचे निर्देश दिले होते. अन्यथा 22 जानेवारीला जिल्हाधिकारी कार्यालयात संबंधित अधिकार्यांसोबत बैठक घेऊन तोडगा काढण्यात येईल, असे सांगितले होते. जिल्हाधिकार्यांच्या निर्देशानंतर पालघरचे उपविभागीय अधिकारी विकास गजरे यांनी शेतकरी आणि ग्रामस्थांसोबत शुक्रवारी सायंकाळी बैठक आयोजित करुन चर्चा केल्यानंतर येत्या 17 जानेवारी रोजी संबंधित अधिकार्यांची संयुक्त बैठक आयोजित केली होती.
मात्र याप्रश्नी तोडगा काढण्याअगोदरच काल, शनिवारी एल अँड टी कंपनीने पुन्हा कामाला सुरुवात केल्याने संतप्त झालेल्या शेतकरी व ग्रामस्थांनी काम बंद पाडण्याचा प्रयत्न केल्याने एमएमआरडीएच्या अधिकार्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अविनाश पाटील, संतोष सरफ, बाबल्या काटेला, बाळू आडगा व सुदाम डोंगरे अशा 5 आंदोलकांवर सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या पाचही आंदोलकांना न्यायालयात हजर केले असता त्यांना 1 दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
एमएमआरडीए आणि ठेकेदार कंपनी एल अँड टी विरोधात शेतकर्यांनी पंधरा दिवसांपूर्वी मनोर पोलीस स्टेशनमध्ये तक्रारी दाखल केल्या होत्या. परंतु शेतकर्यांच्या तक्रारींची दखल घेऊन साधी चौकशी करण्याचे सौजन्य देखील मनोर पोलिसांनी दाखवले नाही. उलट एमएमआरडीएच्या तक्रारीची दखल घेऊन पाच शेतकर्यांवर गुन्हे दाखल केल्याने पोलिसांवर दडपशाहीचा आरोप होत आहे.
शेतकर्यांवर दाखल झालेले गुन्हे ही एमएमआरडीए आणि पोलिसांची दडपशाही आहे. आणि ती खपवून घेतली जाणार नाही. याविरोधात आंदोलन उभारले जाईल.
-पुंडलिक घरत,
सदस्य, सूर्या पाणीबचाव समिती
[divider]
- आपण दैनिक राजतंत्रचे App आपल्या स्मार्टफोनमध्ये Download केलेत का?
- दैनिक राजतंत्रच्या विश्वसनीय बातम्या आपल्या मोबाईलमध्ये मिळविण्यासाठी खालील Link ला भेट द्या!
- स्वतः Download करा आणि इतरांनाही सांगा!
ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी दैनिक राजतंत्रचे फेसबुक पेज LIKE करा!