पालघर: जिल्हा शिक्षण अधिकाऱ्यास १ लाख रुपयांची लाच घेताना अटक

0
1516

राजतंत्र न्यूज नेटवर्क

पालघर, दि. ७: जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाचा शिक्षण अधिकारी मोहन शशीकांत देसले, (49) याला एका सहाय्यक शिक्षकाकडून पदाला मान्यता देण्यासाठी १ लाख रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या ठाणे पथकाने रंगेहाथ पकडले आहे. यातून जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला भ्रष्ट्राचाराची वाळवी लागल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.
एका खासगी शिक्षण संस्थेत 2012 साली नोकरीस लागलेल्या सहाय्यक शिक्षकाने नोकरी कायम व्हावी यासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. उच्च न्यायालयाने शिक्षकाच्या बाजूने आदेश दिले होते. तरीही त्यांच्या पदास मान्यता देण्यासाठी शिक्षण अधिकारी देसले याने ३ लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली. तडजोडी अंती २ लाख रुपयांत मान्यता देण्याचे नक्की झाले. याबाबत संबंधित शिक्षकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेतल्यानंतर सापळा रचण्यात आला. आणि आज सायंकाळी देसले याला १ लाख रुपये स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले. देसले याने तक्रारदाराच्या पद मान्यतेचे पत्र ७ डिसेंबर रोजीच तयार केले होते, मात्र पैसे मिळेपर्यंत सही बाकी ठेवली होती.
देसले यानेअलीकडे स्वतःचे दालन वातानुकूलित केले होते. ही वातानुकूलित यंत्रणा त्याने लाचेच्या स्वरूपातच स्विकारून बसवली असल्याचे सांगण्यात येते. देसले कडे विविध शैक्षणिक संस्थांच्या अनेक प्रकारच्या मान्यतांच्या फाईली प्रलंबित असून त्यासाठी अनेक फेऱ्या माराव्या लागत होत्या. दालन वातानुकूलित केले आहे, शिवाय दौरे आणि कागदपत्रांचा खर्च वाढला असल्याने संस्थाचालकांनी पैसे द्यावेत अशी देसलेची मागणी असायची. अखेर त्याला थेट पोलीस कोठडीची हवा खावी लागली आहे. देसले कडे प्रलंबित असलेल्या प्रकरणांची देखील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशी व्हावी अशी मागणी केली जात आहे.

देसले याचा डिजीटल शिक्षण कार्यात विशेष कामगिरी केल्याबद्दल रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात राज्यपालांच्या हस्ते सत्कार झालेला आहे. म्हणजे भ्रष्ट्राचारी लोक आदर्श पुरस्कार, गौरव मिळवण्यात देखील तरबेज असल्याचे यातून स्पष्ट होत आहे.

Print Friendly, PDF & Email

comments