चालते बोलते विद्यापीठ म्हणजे संतश्रेष्ठ गाडगे महाराज..!

0
2638

GADAGE BABAमहामानवांचा जन्म हा स्वत:साठी नसतोच. जगाच्या कल्याणातच त्यांची विभूती असते, हा देह अखंड चंदनापरी समाजासाठी झिजवून आपल्या सुगंधाने समाज सुगंधी करत असतो, हाच त्यांचा जीवनधर्म असतो. त्यांच्या अंगावर राजवस्र नसतात, हातात सोन्याचांदीचे कडे नसतात, तर निःस्वार्थ सेवेचे कंकण असते. रंजल्या गांजल्यासाठी वात्सल्य ओसंडून वाहणारा एकच त्यांचा चेहरा असतो.
समृद्ध समाज घडवण्याकरिता आयुष्यभर समाजातील तळागाळातील अंध, अपंग, रोगी, निराश्रित, दिन दुबळ्या बांधवांचे जीवनमान उंचावण्यासाठी, अज्ञान, अंधश्रद्धा, अस्वच्छता यांचे उच्चाटन करण्यासाठी तळमळीने कार्य करून आयुष्यभर चंदनासारखा झिजणारा, माणसात देव शोधणारा संत, एक थोर निष्काम कर्मयोगी महाराष्ट्राच्या कुशीत आणि अमरावतीच्या मुशीत 23 फेब्रुवारी 1876 रोजी पिता झिंगराजी व माता सखुबाई या दांपत्याच्या पोटी डेबुजी जन्मास आले..! डेबूजींचे लग्न लहानपणीच झाले होते. त्यांना चार मुली होत्या. पण ते संसारात फारसे रमले नाहीत. घरदार सोडून अवघ्या समाजाचा संसार सुधारण्यासाठी ते घराबाहेर पडले. त्यानंतर ते नुसतेच डेबुजी राहिले नाही तर त्यांच्या कार्यकर्तृत्वाने तुम्हा आम्हांचे संत गाडगे महाराज झाले.
संत गाडगे महाराजांच्या आयुष्यात त्यांना शिक्षण मिळाले नाही परंतू निरक्षर असूनही शिक्षणाबद्दलचे त्यांचे विचार सतत प्रेरणा देणारे ठरतात, शिक्षणाचा, प्रबोधनाचा जागर घालताना ते म्हणतात,

खर्चू नका देवासाठी पैसा। शिक्षणाला पैसा तोच द्या हो ॥
नको मंदिरांची करावया भर्। छात्र जो हुशार त्यास द्यावा ॥
नको धर्मकृत्ये पैसा खर्चूनिया। घेण्यासाठी विद्या तोच खर्चा ॥
शाळेहून नाही थोर ते मंदिर। देणगी उदार शाळेला द्या॥

गाडगे महराजांच्या कविता वाचल्यावर मन आश्चर्यचकित होते, निरक्षर असणार्‍या व्यक्तीची लेखणी इतकी धारधार कशी असु शकते हाच एक प्रश्‍न मनाला कायम विचार करायला लावतो.
गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला हे भजन कानी पडले की आपल्या समोर एका हातात काठी व दुसर्‍या हातात झाडू, डोक्यावर फुटके मडके असे संत गाडगे महाराज समोर उभा राहतात खर तर ते फक्त संत नसतात तर ते समाज प्रबोधनकार, समाज उद्धारक असतात, आपल्या गोड वाणीतून ते समाजाला अमृत पाजत असतात..!

तीर्थी धोंडापाणी देव रोकडा सज्जनी असे विद्रोही विचार ते आपल्या कीर्तनातून समाजाला सांगत असत, ते संत तुकाराम महाराजांना आपले गुरू मानत. मी कोणाचा गुरू नाही, मला कोणी शिष्य नाही, असे ते कायम म्हणायचे. दीन, दुबळे, अनाथ, अपंगांची सेवा करून एक उच्च विचारसरणी समाजात ते रुजवत, देवळात जाऊ नका, मूर्तिपूजा करू नका, सावकाराचे कर्ज काढू नका, अडाणी राहू नका, पोथी-पुराणे, मंत्र-तंत्र, चमत्कार असल्या गोष्टींवर विश्वास ठेऊ नका. मंदिरात दिवा लावण्यापेक्षा गरिबाच्या झोपडीतील अंधार दुर करा..! अशी शिकवण लोकांना महाराज देत. सेवा केवळ मानवजातीचीच नाही तर, जगातील सर्व प्राणीमात्रांची सेवा करावी, हे महाराजांनी एका कुत्र्याच्या मुत्र विसर्जनाच्या अनुभवातून मानवास सांगितले. त्यांच्या कीर्तनाचे शब्दचित्र उभे करणे माझ्या ताकदीबाहेरचे काम आहे, असे उद्गार गाडगे महाराजांचे चरित्र रेखाटताना प्रबोधनकार ठाकरे काढतात.

हल्लीच्या युगात, गावोगावी व शहरातून ठिकठिकाणी देवळे बांधण्याची चढाओढ लागलेली दिसून येते. परंतु गाडगे महाराजांनी तसे न करता राज्यातील प्रमुख शहरांत व तीर्थक्षेत्री धर्मशाळा, आश्रमशाळा, नद्यांना घाट, पाणपोया, गोरक्षण, अंध-अपंगांसाठी सदावर्त, मुलांसाठी शाळा-कॉलेज व वसतिगृहे बांधून सर्वसामान्य जनतेची सोय केली यातच त्यांचे मोठेपण सिद्ध होते..!

महाराष्ट्राची अस्मिता जपण्यास हाती एक काठी व झाडु घेऊन, फक्त बोलण्यातुनच नाही तर स्वतःच्या कृतीतुन जगाला स्वच्छतेचा संदेश देणारे हे व्यक्तित्व! स्वच्छता दूत म्हणून त्यांनी महराष्ट्राच्या मातीस जे योगदान दिले ते आजपर्यंत एकाही संताने, महाराजांने किंवा नेत्याने दिले नाही. गाडगे महाराज हे फक्त एक व्यक्तित्व नसुन तो एक सिद्धांत आहे, तो कधीही न संपणारा एक विचार आहे. एक दीपस्तंभ आहे. जो वाट चुकलेल्यांना आजही दिशा दाखवण्यासाठी उभा आहे!

आजकालच्या स्वच्छते बद्दलच्या जाहिराती व त्यांचा खर्च पाहून मनाला वेदना होतात, स्वतःला स्वच्छतेचे पुजारी म्हणून घेणारे तथाकथित नेते हातात झाडू घेतात दोन फोटो काढतात व आम्ही स्वछता दूत आहोत हे देशाला सांगायला मोकळे होतात..!
आज स्वच्छतेबद्दल नुसत्याच जाहिराती करून काही उपयोग नाही येथे प्रत्येक व्यक्तीने स्वच्छता राखली पाहिजे, वैयक्तिक स्वछेतेबरोबर परिसर, उद्याने, सार्वजनिक ठिकाणे, सार्वजनिक पाणवठे, शाळा, मंदिरे, कार्यालये स्वच्छ ठेवली पाहिजेत, त्यासाठी प्रोत्साहन दिले पाहिजे. खरी गरज आहे ती निस्वार्थ सेवा करणार्‍या समाजसुधारकांची त्याच बरोबर विशाल अंतकरणाची..! तेव्हाच कुठे समाज, गाव, राज्य, देश स्वच्छ व सुंदर होईल, तेव्हाच कुठे संत गाडगे महाराज स्वछता अभियान यशस्वी होईल, तेव्हाच कुठे संत गाडगे महाराज ग्राम स्वच्छता अभियान पुरस्काराची यशस्वीता व महत्व वाढेल, तेव्हाच कुठे संत गाडगे महाराजांच्या स्वप्नातील भारत देश आपल्याला पाहायला मिळेल…!

अवघं जीवन समाजाच्या उद्धारासाठी वेचणारा महामानव..! आयुष्याचा अर्थ काय? या प्रश्‍नाची उकल झालेला माणसातील माणुसकीला पुजणारा हा महामानव विरळच..! या कर्मयोगी महामानवाचे 20 डिसेंबर 1956 रोजी निधन झाले, अशा महानवाचा आज स्मृतिदिन त्यांच्या स्मृतीस व त्यांच्या विचारांना अभिवादन करून त्यांच्या या अमोल विचारांचा वसा आणि वारसा पुढे नेऊया..!! स्वच्छ, सुंदर, आदर्श देश घडवूया..!!

श्री.संतोष भगवान तळेकर
(एम.ए.डी.एड, डी.एस.एम, सी.पी.सी.टी)
8275941474

[divider]

  • आपण दैनिक राजतंत्रचे App आपल्या स्मार्टफोनमध्ये Download केलेत का?
  • दैनिक राजतंत्रच्या विश्वसनीय बातम्या आपल्या मोबाईलमध्ये मिळविण्यासाठी खालील Link ला भेट द्या!
  • स्वतः Download करा आणि इतरांनाही सांगा!

➡ DOWNLOAD APP

ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी दैनिक राजतंत्रचे फेसबुक पेज LIKE करा!

Print Friendly, PDF & Email

comments