>> युवा सेनेच्या प्रयत्नाने प्रवाशांना दिलासा
वार्ताहर/बोईसर, दि. 17 : बोईसर रेल्वे स्टेशनवर दुचाकी व चारचाकी वाहनांसाठी रेल्वेने ठरवून दिलेल्या शुल्काऐवजी 10 रुपये जादा शुल्क आकारुन प्रवाशांची फसवणूक करणार्या पार्किंग कंत्राटदाराची चोरी युवा सेनेने उघडकीस आणली असुन वाढीव पार्किंग दर तात्काळ कमी करण्यात आल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.
बोईसर भागात मोडणार्या सालवड, पास्थळ, कुंभवली, पाम, टेंभी, खैरेपाडा, नवापूर, दांडी, कुरगाव, परनाळी, कुडण, तारापूर, मुरबे आदी बोईसर रेल्वे स्टेशनपासुन दुरच्या अंतरावर असलेल्या गावातून हजारोच्या संख्येने प्रवासी शिक्षण व रोजगारानिमित्त मुंबई तसेच इतर शहरं गाठतात. या गावांमधुन रेल्वे स्टेशनसाठी सार्वजनिक वाहतूक सेवा कमी प्रमाणात असल्याने तसेच वेळेची बचत म्हणून शेकडो प्रवासी आपल्या दुचाकीने किंवा चारचाकी वाहनाने स्टेशन गाठतात व आपल्या गाड्या रेल्वेच्या पार्किंगमध्ये ठेऊन इच्छित स्थळ गाठतात. येथे काही महिन्यांपुर्वी 12 तासांच्या पार्कींगसाठी 20 रुपये शुल्क आकारले जात होते. मात्र मागील 2 दिवसांपुर्वी हे दर अचानक 20 रुपयांनी वाढवून 40 रुपये करण्यात आले होते. त्यामुळे वाढलेल्या पेट्रोल दरासह पार्किंसाठी देखील वाढीव शुल्क चाकरमान्यांना मोजावे लागत होते. आज पालघर युवा सेनेचे उपजिल्हा अधिकारी सुमित पिंपळे यांनी बोईसर रेल्वे प्रशासनाकडे यासंदर्भात माहिती मागवली असता प्रत्येक वाहनासाठी 30 रुपये शुल्क असताना पार्किंगच्या फलकावर मात्र 40 रुपये शुल्क लिहून ही रक्कम प्रवाशांकडून वसूल केली जात असल्याचे उघडकीस आले. यानंतर युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी याबाबत पार्किंग कंत्राटदाराला जाब विचारुन प्रत्येक वाहनामागे 30 रुपये आकारण्यास भाग पाडल्याने प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.
यावेळी युवा सेनेचे महाराष्ट्र सहसचिव परीक्षित पाटील, जिल्हा युवा आधिकारी जस्वीन घरत, युवा सेनेचे दर्शन पाटील, आनंद धोडी, चंद्रकांत खंडागळे, प्रजोत दवणे, हितेश तामोरे, वीपेश संखे, पंकज ठाकूर, अजिंक्य मेर, हनेश बारी, नंदकुमार पिल्ले, ओमकार पंडित, अनिकेत मोरे, तुषार पाटील, महेश दोडके आदी उपस्थित होते.
[divider]
- आपण दैनिक राजतंत्रचे App आपल्या स्मार्टफोनमध्ये Download केलेत का?
- दैनिक राजतंत्रच्या विश्वसनीय बातम्या आपल्या मोबाईलमध्ये मिळविण्यासाठी खालील Link ला भेट द्या!
- स्वतः Download करा आणि इतरांनाही सांगा!
ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी दैनिक राजतंत्रचे फेसबुक पेज LIKE करा!