विनापरवाना फटाके विक्री, वाड्यातील 5 दुकाने सील

0
586
  • जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशावर फटाके विक्रत्यांची नाराजी

WADA FATAKE DUKANप्रतिनिधी/वाडा, दि. 5 : जिल्हाधिकार्‍यांनी दिलेल्या आदेशानुसार वाडा शहरातील विनापरवाना फटाक्यांचा व्यवसाय करणार्‍या दुकानांवर नगरपंचायतीच्या मुख्याधिकार्‍यांनी काल, रविवारी सायंकाळी छापा मारुन एकुण 5 दुकाने सील केली आहेत. दरम्यान या व्यापार्‍यांनी आपले परवाने मुदत संपल्याने नुतनीकरणासाठी सुमारे दीड महिन्यांपूर्वीच जिल्हाधिकारी कार्यालयात सादर केलेले असताना ऐन दिवाळीच्या हंगामात ही कारवाई केल्याने जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशावर नाराजी व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वाडा नगरपंचायतीच्या हद्दीत प्रितम सेल्स एजन्सी, नंदकुमार ट्रेडर्स, मनोरे ट्रेडर्स, पातकर ट्रेडर्स ही फटाक्यांची घाऊक दुकाने असून येथे दिवाळीच्या हंगामात करोडोंची उलाढाल होत असते. हे परवानाधारक व्यापारी नियमितपणे परवाने नुतनीकरणासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रकरण सादर करत असतात. यावर्षीही नुतनीकरणाची प्रकरणे प्रलंबित असताना परवाने नसल्याचे कारण देत जिल्हाधिकार्‍यांनी वाड्याच्या उपविभागीय अधिकार्‍यांना चौकशीचे आदेश दिले होते. त्यानुसार उपविभागीय अधिकार्‍यांमार्फत नगरपंचायत हद्दीतील दुकानांची तपासणी करण्यासाठी मुख्याधिकारी प्रबोधन मवाडे यांच्या नेतृत्वाखाली अन्य कर्मचार्‍यांचे तपासणी पथक गठीत करण्यात आले आहे. या पथकाला 5 नोव्हेंबर ते 10 नोव्हेंबर 2018 या कालावधीत तपासणी करण्याचे आदेश असताना त्यापूर्वीच रविवारी (दि. 4) सायंकाळी मुख्याधिकारी मवाडे यांनी फटाके दुकानांची तपासणी करून कारवाई केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. यात प्रितम सेल्स एजन्सी, नंदकुमार ट्रेडर्स, मनोरे ट्रेडर्स, पातकर ट्रेडर्स व होरसाळा ग्रामपंचायत हद्दीतील एका दुकानाचा समावेश आहे.

मवाडे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केलेल्या तपासणीत येथील फटाका दुकानांचे परवाने नुतनीकरण केले नव्हते. तसेच सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून कुठलीही उपाययोजना नसल्याचे उघड झाले. त्यामुळे मुख्याधिकारी मवाडे यांनी सरळ ही दुकाने बंद करून सील ठोकले. मात्र ग्रामपंचायत हद्दीत असलेली दोन दुकाने या कारवाईतून बचावली आहेत. दरम्यान, काल रविवार असल्याने फटाके खरेदीसाठी मोठ्याप्रमाणावर ग्राहकांनी गर्दी केली होती. त्यावेळीच ही कारवाई झाल्याने फटाके खरेदी न करता आल्याने ग्राहकांचा देखील चांगलाच हिरमोड झाला.

जिल्हाधिकार्‍यांनी फटाका दुकानांची तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. त्या अनुषंगाने तपासणी केली असता विक्रेत्यांकडे परवाने नुतनीकरण केलेले नव्हते. त्याचप्रमाणे सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून योग्य उपाययोजना केली नसल्याने ही कारवाई करण्यात आली.
-प्रबोधन मवाडे,
मुख्याधिकारी,
वाडा नगरपंचायत

[divider]

  • आपण दैनिक राजतंत्रचे App आपल्या स्मार्टफोनमध्ये Download केलेत का?
  • दैनिक राजतंत्रच्या विश्वसनीय बातम्या आपल्या मोबाईलमध्ये मिळविण्यासाठी खालील Link ला भेट द्या!
  • स्वतः Download करा आणि इतरांनाही सांगा!

➡ DOWNLOAD APP

ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी दैनिक राजतंत्रचे फेसबुक पेज LIKE करा!

Print Friendly, PDF & Email

comments