जिल्ह्यातील पाणी स्त्रोतांचे होणार स्वच्छता सर्वेक्षण

0
767
  • ग्रामीण भागातील शासकीय विहिरी, हातपंप, नळयोजनांचे होणार सर्वेक्षण

PANI STROT SERVEKSHANराजतंत्र मीडिया/पालघर, दि. 27 : ग्रामीण भागातील नागरिकांना शुद्ध, सुरक्षित, मुबलक व स्वच्छ पिण्याचे पाणी मिळावे, तसेच दुषित पाण्यामुळे होणार्‍या रोगांच्या प्रादुर्भावावर नियंत्रण ठेवले जावे यासाठी पाणी व स्वच्छता विभागामार्फत जिल्ह्यातील पाणी गुणवत्ता सनियंत्रण कार्यक्रम राबविला जातो. या कार्यक्रमाअंतर्गत जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांचे वर्षातून दोन वेळा सर्वेक्षण करण्यात येते. त्यानुसार 1 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर 2018 या कालावधीत ग्रामीण भागातील शासकीय विहिरी, हातपंप, नळयोजना अशा 13 हजार 425 पाण्याच्या स्त्रोतांचे सर्वेक्षण केले जाणार आहे.

जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्राकडून त्यांच्या कार्यक्षेत्रात असणार्‍या सर्व गावातील पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांचे सर्वेक्षण केले जाणार आहे. यावेळी पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत सुरक्षित राहावे यासाठी शुद्धीकरण व प्रयोगशाळेत पाणी नमुन्यांची तपासणी केली जाणार आहे. या तपासणीमध्ये पाणी दुषित आढळून आल्यास त्या ग्रामपंचायतींना सुचना दिली जाणार असुन पिण्याच्या पाण्यामध्ये आढळून आलेले दोष नष्ट करून साथरोगास प्रतिबंध केला जाणार आहे. दरम्यान या सर्वेक्षणानंतर शुद्ध पाणी पुरवठा करणार्‍या ग्रामपंचायतींना हिरवे कार्ड दिले जाते. दुषित पाणी पुरवठा करणार्‍या ग्रामपंचायतींना लाल तर पाणी स्त्रोतांभोवती अस्वच्छता असलेल्या ग्रामपंचायतींना पिवळे कार्ड दिले जाते. सलग पाच वर्ष हिरवे कार्ड मिळालेल्या ग्रामपंचायतींना पालकमंत्री यांच्या हस्ते चंदेरी कार्ड देऊन गौरविण्यात येते.

पिण्याचे पाणी, परिसर आणि वैयक्तिक स्वच्छता या घटकांचा आरोग्याशी संबंध आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना शुद्ध व स्वच्छ पाणी पुरवठा होण्यासाठी पाणी गुणवत्ता चांगली असणे आवश्यक आहे. पाणी गुणवत्ता व सनियंत्रण कार्यक्रमामध्ये स्वच्छता सर्वेक्षणाचे महत्व अनन्यसाधारण असून वैयक्तिक सवयी व सार्वजनिक स्वच्छता, नळ पाणी पुरवठा यंत्रणेतील तांत्रिक दोष, देखभाल व दुरुस्ती या कारणांमुळे पाणी दुषित होते. हे दुषित पाणी पिण्यास वापरल्याने विविध जलजन्य आजार होऊ शकतात. याची पुर्वकाळजी म्हणून हे ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांची तपासणी करून नागरिकांना शाश्वत शुद्ध पाणी पुरवठा होण्यासाठी हे सर्वेक्षण केले जाते.

आपल्या गावातील ग्रामस्थांचे आरोग्य चांगले राहावे याकरिता व गावात कोणताही जलजन्य आजार होऊ नये किंवा साथीचे आजार पसरू नये याकरिता जलसुरक्षक यांनी गावातील प्रत्येक पिण्याच्या पाण्याचे सर्व स्त्रोतांचे सर्वेक्षण करून स्त्रोत दुषित असल्यास त्यावर उपाययोजना करावी. आपल्या गावातील सर्व स्त्रोतांजवळ ग्रामस्थांनी स्वच्छता राखावी. सर्व जलसुरक्षक व आरोग्यसेवक यांनी या कामाला प्राधान्य देऊन पिण्यासाठी वापरत असलेले व अयोग्य असलेल्या पाणी स्त्रोतांचे सर्वेक्षण करून घ्यावे, असे आवाहन पालघर जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी संघरत्ना खिल्लारे यांनी केले आहे.

Print Friendly, PDF & Email

comments