डहाणूचे माजी नगराध्यक्ष ईश्वर धोडी यांचा रेल्वे अपघातात मृत्यू

0
1246

RAJTANTRA MEDIA

डहाणू दि. ११: डहाणूचे माजी नगराध्यक्ष ईश्वर कृष्णा धोडी यांचे डहाणूरोड रेल्वे स्थानकामध्ये अपघाती निधन झाले आहे. ते ५७ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात आई, पत्नी व २ मुले असा परिवार आहे. रेल्वे रुळ ओलांडत असताना रेल्वेखाली सापडून त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येते. आज सायंकाळी 8.30 च्या सुमारास हा अपघात घडला. धोडी यांचा जागीच मृत्यू झाल्याने उपचाराची संधी देखील मिळू शकली नाही. रेल्वे पोलीसांकडून पंचनामा केला जात असून शव विच्छेदनानंतरच मृत्यूचे नेमके कारण समजू शकणार आहे.

ईश्वर धोडी हे शिवसेनेच्या तिकिटावर थेट नगराध्यक्ष पदावर निवडून आलेले पहिले नगराध्यक्ष होते. त्यांनी २००२ ते २००५ या कालावधीत नगराध्यक्ष भुषवल्यानंतर अविश्वास ठराव मंजूर झाल्याने नगराध्यक्षपद सोडावे लागलेले ते पहिले आणि एकमेव नगराध्यक्ष ठरले. त्यांच्यानंतर शिवसेनेला डहाणू नगरपालिकेची सत्ता संपादता आलेली नाही. धोडी हे ३ वेळा नगरसेवक म्हणून निवडून आले होते. त्यांनी शिवसेनेतर्फे ३ वेळा डहाणू विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली असली तरी त्यात यश आले नव्हते. कॉंग्रेसमधून राजकीय कारकीर्द सुरु केलेल्या धोडी यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर ते सेनेशी कायम निष्ठावान राहिले. अलीकडे ते राजकारणात फारसे सक्रिय राहिले नव्हते. त्यांच्या निधनाने हळहळ व्यक्त होत आहे.

ईश्वर धोडी यांना सायंकाळी 8.00 च्या सुमारास काही प्रत्यक्षदर्शींनी डहाणूरोड स्थानकाच्या पूर्वेला पाहिले होते. यामुळे त्यांनी आत्महत्या केली असावी असाही तर्क लावला जात असून याबाबत पोलीसांनी अजून भाष्य केलेले नाही.

Print Friendly, PDF & Email

comments