विद्युत लोकपालांनी ऐकल्या डहाणूतील विज ग्राहकांच्या समस्या

0
806

RAJTANTRA MEDIA

डहाणू दि. ६: विज ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी उपलब्ध यंत्रणेची लोकांना पुरेशी माहिती नाही. वृत्तपत्रांच्या माध्यमातून याबाबतची माहिती लोकांपर्यंत पोहोचल्यास सर्वसामान्य लोकांच्या विजेसंबंधीच्या तक्रारींचे निराकरण होण्यास गती येईल असा विश्वास राज्याचे विद्युत लोकपाल (मुंबई) आर. डी. संखे यांनी व्यक्त केला. विज ग्राहकांच्या तक्रारींवर सुनावणी घेण्यासाठी डहाणू येथे आले असता त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी महावितरणच्या अधिक्षक अभियंता श्रीमती किरण नागांवकर व विद्युत लोकपालांचे सचिव दिलीप डूंबरे उपस्थित होते.

डहाणूतील सोसायटी फोर फास्ट जस्टीस या सेवाभावी संस्थेतर्फे काही विज ग्राहकांच्या याचिका विद्युत लोकपाल यांचेकडे दाखल करण्यात आल्या होत्या. या याचिंकावरील सुनावणीसाठी अनेक ग्राहकांना मुंबई कार्यालयात यावे लागू नये याकरिता विद्युत लोकपाल यांनी डहाणू येथेच सुनावणी ठेवली. अशा लोकपाल आपल्या दारी संकल्पनेचे लोकांनी स्वागत करुन आपल्या समस्या लोकपालांसमोर सादर केल्या. यावेळी सोसायटी फोर फास्ट जस्टीसचे अध्यक्ष नरेंद्र पटेल, सचिव प्रकाश अभ्यंकर, महेश कारिया, शिवसेनेचे उप जिल्हाप्रमुख तथा सोसायटी फोर फास्ट जस्टीसचे माजी अध्यक्ष संतोष शेट्टी, प्राध्यापक गढरी यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

लोकपाल यांच्यासमोर उपस्थित झालेल्या अनेक तक्रारींचे अधिक्षक अभियंता नागांवकर यांनी निराकरण करण्याचा प्रयत्न केला. त्याच त्याच तक्रारी उद्भवल्यास महावितरणच्या जबाबदार अधिकारी/कर्मचाऱ्यांच्या विरोधात प्रशासकीय कारवाई केली जाईल असा इशारा देखील त्यांनी यावेळी बोलताना दिला. नागांवकर या महावितरणमधील खंबीर आणि धडाडीच्या महिला अधिकारी म्हणून ओळखल्या जात असून त्यांची अधिक्षक अभियंता पदावर नेमणूक झाल्यापासून त्या ग्राहकांशी विविध प्रकारे संवाद साधत आहेत.

  • विज ग्राहकांसाठी तक्रार निवारण प्रणाली अशी आहे: विज ग्राहकांनी आधी महावितरणच्या अंतर्गत तक्रार निवारण कक्षाकडे तक्रार नोंदवावी. त्यांना तक्रारीचे निराकरण करण्यास ६० दिवसांची मुदत आहे. येथे समाधान न झाल्यास किंवा मुदतीत समाधान झाल्यास तक्रार निवारण मंचाकडे अपील करता येते. मंचाकडे ६० दिवसांच्या आत निर्णय होईल. मात्र या निर्णयाने देखील समाधान न झाल्यास किंवा मुदतीत निर्णय न झाल्यास विद्युत लोकपाल यांचेकडे याचिका दाखल करता येते. तक्रार निवारण मंच किंवा विद्युत लोकपाल यांच्या आदेशाप्रमाणे पुर्तता न झाल्यास तक्रारदाराला महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाकडे दाद मागता येते.
Print Friendly, PDF & Email

comments