>> दुर्गम भागात तातडीने रूग्णसेवा मिळणार
राजतंत्र न्यूज नेटवर्क/पालघर, दि. 3 : डोंगर-दर्यांचा व आदिवासीबहुल म्हणून ओळखल्या जाणार्या पालघर जिल्ह्यातील दुर्गम भागातील रुग्णांना तातडीने आरोग्यसेवा मिळावी, या उद्देशाने जिल्ह्यातील विविध भागात 5 बाईक अॅम्ब्युलन्स उपलब्ध करुन देण्यात आल्या असुन काल, गुरुवारी (दि. 3) आरोग्यमंत्री दिपक सावंत यांच्या हस्ते मोखाडा येथे या सेवेचा शुभारंभ करण्यात आला. आरोहन संस्था, सिमेन्स लिमिटेड इंडिया आणि पालघरच्या जिल्हा आरोग्य विभागाच्या संयुक्त विद्यमाने ही सेवा सुरु करण्यात आली आहे.
आपण लंडनमध्ये गेलो असता तेथे बाईक अॅम्ब्युलन्स सेवा पाहिली होती. तेथे रहदारीत रूग्णाला तातडीने सेवा मिळावी म्हणून त्याचा उपयोग केला जात आहे. त्याची उपयुक्तता लक्षात घेऊन ही सेवा राज्यातही सुरू व्हावी यासाठी प्रथम मुंबईत 10 मोटर बाईक अॅम्ब्युलन्स सेवा प्रायोगिक तत्वावर सुरू केली. त्याचा मोठा फायदा मुंबईत दिसून आला आहे. त्यामुळे आता पालघरमध्ये पाच आणि मेळघाटाच्या आदिवासी बहुल भागामध्ये पाच बाईक अॅम्ब्युलन्स सेवा सुरू करण्यात आली असल्याचे आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांनी सांगितले.
या सेवेबाबत अधिक माहिती देताना डॉ. सावंत म्हणाले, ही अॅम्बुलन्स सेवा देणारा चालक स्वतः डॉक्टर आहे. त्याच्याकडे प्रथमोपचाराबरोबरच तातडीने संदर्भ सेवेसाठी मोबाईल टॅबची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या सेवेने रुग्णाला तातडीने रूग्णालयात दाखल करता येणे शक्य होणार आहे. तसेच आदिवासी भागात औषधी वनस्पती असल्याने, या भागात वनौषधीपासून औषध बनवणार्या कंपन्या आणण्याचा विचार असल्याचेही डॉ. सावंत यांनी यावेळी सांगितले. तर मोखाड्यात येत्या तीन महिन्यांत 28 खाटांचे बालरोग दक्षता कक्ष जिंदाल कंपनीच्या सहकार्याने सुरू करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. आशा कार्यकर्तीच्या मानधनात वाढ करण्याचा शासनाचा मानस असल्याचे ते म्हणाले.
मोखाड्यात पाणी टंचाई, स्थलांतराचा मोठा प्रश्न आहे. त्याला आळा घालण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. त्या अनुषंगाने सुरू करण्यात आलेल्या गोधडी आणि खुंटी प्रकल्पामुळे स्थलांतराला आळा बसल्याचे जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी यावेळी सांगितले. आरोग्य मंत्री डॉ. सावंत यांच्या सतर्कतेने पालघर जिल्ह्यातील कुपोषणाला आळा घालण्यात यश येत असून कुपोषणाची टक्केवारी एक तृतीयांशपर्यंत कमी झाल्याचे ते म्हणाले.
या कार्यक्रमास आरोहन संस्थेच्या रिना जोसेफ, संचालिका अंजली कानिटकर, सिमेन्स इंडियाचे श्रीनिवासन, कोकण विभाग आरोग्य उपसंचालक रत्ना रावखंडे, पालघर जिल्हा परिषदेतील शिवसेनेचे गटनेते प्रकाश निकम, मोखाड्याच्या नगराध्यक्ष मंगलाताई चौधरी, सभापती प्रदीप वाघ, जिल्हा शल्य चिकित्सक कांचन वानेरे आदी उपस्थित होते.
दरम्यान, सुदृढ बालक जन्माला यावे म्हणून आरोहन सामाजिक संस्था, सिमेन्स इंडिया लिमिटेड आणि आरोग्य विभागाच्या वतीने सामाजिक उत्तरदायित्व निधीतून मोखाडा ग्रामीण रुग्णालयात सोनोग्राफी मशीन उपलब्ध करून देण्यात आली आहे. तिचे लोकार्पण आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांच्या हस्ते करण्यात आले.