बोईसर एमआयडीसीतील कंपनीमधुन तब्बल 10 कोटींचे ड्रग्स जप्त

0
2346

BOISAR DRUGSदि. 23 : बोईसर औद्यागिक परिसरातील एका कंपनीत महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) छापा मारुन 10 कोटी रुपयांचे 238 किलो मेफोड्रोन नामक ड्रग्स जप्त केले असुन याप्रकरणी 4 जणांना अटक केली आहे. ड्रग्सची तस्करी करणार्‍या या रॅकेटचा दहशतवाद्यांशी संबंध असल्याची शंकाही व्यक्त करण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एमआयडीसीतील रेनबो या रंग बनविणार्‍या कंपनीत हा छापा मारण्यात आला. मागील काही काळापासुन ही कंपनी बंद होती. डीआरआयच्या मुंबई शाखेला 19 मार्च रोजी याबाबत खबर मिळाल्यानंतर छापेमारीची ही कारवाई करण्यात आली. येथे तयार करण्यात आलेला ड्रग्सचा साठा नेपाळमार्गे दक्षिण आफ्रिकेत पाठवला जाणार होता. यावेळी अटक करण्यात आलेल्या 4 आरोपींपैकी मुख्य आरोपी व या रॅकेटचे मास्टरमाईंड भानूदास मोरे व वजाऊल कमर हे दोघे ड्रग्स तस्करीप्रकरणी 10 वर्षांची शिक्षा भोगून 3 वर्षांपुर्वी तुरुंगातून बाहेर आले होते. तरुंगातच मैत्री झालेल्या भानूदास व वजाऊलने बाहेर पडल्यानंतर ड्रग्स तस्करी करण्याचा निश्‍चय केला होता. रऊफ लुलानिया या आरोपीने त्यांना रेनबो कंपनी भाड्याने घेऊन दिली होती. तर विविध केमिकल्सपासुन ड्रग्स बनविण्यात कुशल असलेल्या गुजरात येथील मनिष रेशारियाच्या मदतीने मेफोड्रोन ड्रग्स बनविले जात होते. 2 वर्षांपुर्वी मुंबईत 30 कोटी रुपयांचा मेफोड्रोन ड्रग्सचा साठा जप्त करण्यात आला होता. त्यावेळी अटक करण्यात आलेल्या साजिद इलेक्ट्रिक या आरोपीच्या चौकशीतून भानूदास मोरेचे नाव पुढे आले होते. दरम्यान चारही आरोपींना अटक करण्यात आली असुन डीआरआयचे अधिकारी याबाबत अधिक तपास करीत आहेत.

Print Friendly, PDF & Email

comments