डहाणू नगरपरिषदेत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जुंपली

0
1088

नगराध्यक्ष भरत राजपूत भडकले; जगदीश राजपूत यांनी खूर्ची उगारली!

राजतंत्र न्यूज नेटवर्क
डहाणू दि. 22: डहाणू नगरपरिषदेमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तणावाची पातळी वाढली असून काल (21) झालेल्या सर्वसाधारण सभेमध्ये नगराध्यक्ष भरत राजपूत यांचा संयम सुटला व त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांवर आवाज चढवला. त्याच्या एक पाऊल पुढे जात नगराध्यक्षांचे बंधू जगदीश राजपूत यांनी आक्रमक होत विरोधकांवर खुर्ची उचलून फेकण्याचा पवित्रा घेतला. सभा संपत असताना हा प्रकार घडल्यामुळे राष्ट्रगीत सुरु करुन प्रशासनाने या विषयावर पडदा टाकण्यात यश मिळवले. असे असले तरी भ्रष्ट्राचाराच्या विरोधात मते मागून संपूर्ण बहुमत मिळवलेल्या भाजपने निविदा सूचनांतील कळीच्या मुद्द्यांकडे लक्ष वेधल्यानंतर मुद्यांची चर्चा गुद्द्यांकडे वळवल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे.
डहाणू नगरपरिषदेने सर्वप्रथम 24 एप्रिल 2018 रोजी 4 कोटी 46 लक्ष 46 हजार 473 रुपयांच्या एकूण 8 विकास कामांच्या निविदा सूचना प्रसिद्ध केल्या होत्या. यातील 4 विकासकामांना प्रशासकीय मान्यता मिळाल्या नसताना व निधी उपलब्ध नसताना ही कामे काढण्यात आली होती. ठेकेदाराला आधीच कामे मंजूर करुन मग ठेकेदार घोडेबाजार करुन टक्केवारीच्या सहाय्याने निधी मिळवेल अशी ही भ्रष्ट्राचाराची पारंपारीक रीत. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसने याबाबत लेखी तक्रार केली होती. त्याच दरम्यान लोकसभा निवडणूका लागल्याने आचारसंहीता सुरु झाली आणि ही कामे रद्द झाली.
आता डहाणू नगरपरिषदेच्या प्रशासनाची कमान नव्या दमाचे मुख्याधिकारी डॉ. विजयकुमार द्वासे यांच्याकडे आल्यानंतर त्यांनी नियमानुसार कारभार चालवला आहे. साहजीकच त्यांनी 20जुलै रोजी नव्याने निविदा काढताना वादग्रस्त 8 विकासकामांपैकी 4 विकासकामे प्रशासकीय मंजूरी नसल्याने बाजूला सारुन उर्वरीत केवळ 4 कामांच्या निविदा सुचना प्रसिद्ध केल्या. या 4 कामांना देखील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी आक्षेप घेत अपशकुन केला. या निविदा सुचनांची तांत्रिक मान्यता जुनी असल्याने, तसेच जीेएसटी आल्यानंतर दरसुचीचे दर कमी झाल्याने नव्याने तांत्रिक मान्यता मिळविल्यास लाखो रुपयांची बचत होईल असे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांचे म्हणणे आहे. त्याशिवाय शासनाच्या दिनांक 27 एप्रिल 2018 रोजीच्या निर्णयाप्रमाणे (शासन निर्णय सांकेतांक क्रमांक: 201704271301295918) डांबरी रस्त्यांसाठी कंत्राटदारांकडून किमान 15 वर्षांची हमी घ्यावी व सिमेंट रस्त्यांसाठी किमान 30 वर्षांची रस्त्यांची हमी घ्यावी अशी मागणी त्यांच्याकडून करण्यात आली.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या तक्रार अर्जात दोन विकासकामांची तुलना केली असून जुन्या तांत्रीक मान्यतेतील दर हे सदोष असल्याचे आरोप केले आहेत. एका विकासकामाच्या तांत्रीक मान्यतेमध्ये खोदकाम करुन 50 मीटरच्या आतील अंतरावर साठा करणेचा दर 108 रुपये प्रती घन मीटर आहे. हाच दर अन्य कामामध्ये 395 रुपये प्रती घन मीटर म्हणजेच 365 टक्के इतका जास्त लावण्यात आला आहे. खोदकामातून बाहेर काढलेल्या दगड मातीची वाहतूक करण्यासाठी एका विकासकामामध्ये 173 रुपये प्रती घन मीटर दर देण्यात आला आहे. तर अन्य विकासकामामध्ये याच कामासाठी 279 रुपये प्रती घन मीटर असा 162 टक्के अधिक दर देण्यात आल्याचे उदाहरणासह स्पष्ट केले आहे. यातून नगरपरिषदेचे लाखो रुपयांचे नुकसान होणार असल्याचे उघड होत आहे. त्यामुळे मुख्याधिकारी यांनी ही विकासकामे रद्द करण्याची भुमिका घेतल्यास भरत राजपूत यांच्या नेतृत्वाखालील नगरपरिषदेवर नामुष्की ओढवली जाणार आहे.
सभा संपत असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसने कुठलेही आक्षेप नोंदविल्यानंतर तुमच्या कालावधीत काय झाले? हा नेहमीचाच प्रश्‍न विचारुन भरत राजपूत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सततच्या विरोधी भुमीकेमुळे शहरात विकास कामे होत नाहीत अशी संतप्त भावना व्यक्त केली. आम्ही तुम्हाला कामे करुन दिली आता तुम्ही आम्हाला का विरोध करता आहात असा प्रश्‍न विचारला. त्याच्या एक पाऊल पुढे जात बांधकाम सभापती असलेले भरत यांचे कनिष्ठ बंधू जगदीश राजपूत यांनी विरोधकांच्या दिशेने खुर्ची उचलत असंसदीय भाषेचा वापर केला. त्यामुळे सभागृहाचे वातावरण एकदमच कलुषीत झाले. अन्य सदस्यांनी या तणावात सावरासावर केल्यानंतर लगेचच राष्ट्रगित सुरु केल्यामुळे विषय तिथेच संपला असला तरी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आगामी काळात ठिणग्या पडतच रहातील अशी चिन्हे दिसत आहेत.

Print Friendly, PDF & Email

comments