प्रवेशाचे आमिष देणार्‍यांपासुन सावध रहा

0
720

सोनोपंत दांडेकर महाविद्यालयाचे आवाहन

DANDEKAR PRAVESH AAMISHराजतंत्र मीडिया/पालघर, दि. 20 : सोनोपंत दांडेकर महाविद्यालयात प्रवेश मिळवून देतो, असे आश्वासन देऊन विद्यार्थी व त्यांच्या पालकांकडून पैसे उकळविणार्‍या व्यक्तींपासून सावध रहावे, असे आवाहन सोनोपंत दांडेकर महाविद्यालयाच्या प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

गेल्या काही वर्षात सोनोपंत दांडेकर महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या करिअरच्या दृष्टीने उपयुक्त असे अनेक अभ्यासक्रम सुरु करण्यात आले आहेत. या अभ्यासक्रमाबरोबरच विविध प्रकारचे सहशैक्षणिक व शिक्षणेत्तर उपक्रम महाविद्यालयात मोठ्या प्रमाणात राबविण्यात येत असतात. महाविद्यालयाची ही गुणवत्ता लक्षात घेऊनच मुंबई विद्यापीठातर्फे सर्वोकृष्ट महाविद्यालय म्हणून सोनोपंत दांडेकर महाविद्यालयाला गौरविण्यात आले आहे. तसेच यावर्षी अखिल भारतीय स्तरावरसुध्दा इंडीया टुडे तर्फे झालेल्या सर्वेक्षणात सर्वोत्कृष्ट शंभर महाविद्यालयाच्या यादीत येण्याचा बहुमान सोनोपंत दांडेकर महाविद्यालयास मिळाला आहे. महाविद्यालयाच्या या उत्कृष्ट दर्जामुळे व गुणवत्तेमुळे पालघर जिल्ह्यातील पालघरसह वसई, डहाणू, तलासरी, वाडा, विक्रमगड, जव्हार, मोखाडा या तालुक्यातील विद्यार्थी या महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी येत असतात. त्याचबरोबर संजान, उंबरगाव, बलसाड या भागातील विद्यार्थीसुध्दा या महाविद्यालयात प्रवेश घेत असतात.

11 वी पासून ते पदव्युत्तर शिक्षणापर्यंत तसेच विविध स्वयंअर्थसहाय्यीत अभ्यासक्रमांपासून विधी आणि पी.एच.डी. संशोधनापर्यंतचे अनेक पर्याय या महाविद्यालयात उपलब्ध असल्याने आम्ही या महाविद्यालयात प्रवेश मिळवून देतो असे सांगून बाहेरच्या व्यक्तींमार्फत विद्यार्थ्यांकडून पैसे उकळविण्याचे प्रकार घडल्याचे महाविद्यालयाच्या प्रशासनास समजले आहे. शासनाच्या नियमाप्रमाणे देय असलेल्या आणि महाविद्यालयाच्या माहिती पुस्तिकेत दिलेल्या शुल्काशिवाय एकही रुपया महाविद्यालयातर्फे घेण्यात येत नाही तसेच प्रवेशासाठी कोणत्याही प्रकारचे डोनेशन स्वीकारले जात नाही, हे लक्षात घेऊन या संदर्भात प्रवेशासंबंधी कोणतीही माहिती हवी असल्यास किंवा इतर काही अडचण असल्यास महाविद्यालय प्रशासनाशी त्वरीत संपर्क साधावा आणि अशा गैरमार्गांचा अवलंब करुन विद्यार्थी व पालकांना फसविणार्‍या लोकांच्या थापांना बळी पडू नका, असे आवाहन सोनोपंत दांडेकर शिक्षण मंडळीचे अध्यक्ष अ‍ॅड. जी.डी. तिवारी व प्राचार्य डॉ. किरण सावे यांनी केले आहे.

अशा गैरप्रवृत्तीच्या लोकांच्या आमिषाला बळी पडून प्रवेशासाठी पैसे दिल्याचे समजल्यास सदर विद्यार्थ्याचा प्रवेश रद्द करण्याची कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही महाविद्यालय प्रशासनातर्फे देण्यात आला आहे.

Print Friendly, PDF & Email

comments