नावीद शेख/मनोर, दि. 29 : मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील चिल्हार आवढानी ग्रामपंचायत हद्दीतील कानल पाड्यातील सखाराम रेंजड यांच्या राहत्या घराचा एक भाग आज सकाळी साडेअकराच्या सुमारास कोसळला. मोठा आवाज झाल्याने प्रसंगावधान राखत सखाराम रेंजड आणि त्यांची पत्नी घराबाहेर पडल्याने या दुर्घटनेतून ते सुखरुप बचावले. या घरात सहा सदस्य राहत होते. घर कोसळल्याने पावसाळ्यासाठी बेगमी करून ठेवलेले भाताचे कणगे, तांदूळ, मुलांच्या शाळेची पुस्तके, कपडे आणि घरात ठेवलेलं सोनं नाणं ढिगार्याखाली गाडले गेल्याने या कुटूंबाचे मोठे नुकसान झाले आहे. ऐन पावसाळ्यात राहते घर कोसळल्याने रेंजड कुटुंबाला धक्का बसला असून ते सरकारी मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. दरम्यान मंडळ अधिकारी वसंत बारवे यांनी पडझड झालेल्या घराचा पंचनामा करण्याचे आदेश स्थानिक तलाठी यांना दिले आहेत.