पोलिस निरीक्षक सुदाम शिंदेंविरोधात श्रमजीवी आक्रमक

0
683
बदलीच्या मागणीसाठी हजारोंच्या संख्येने काढला मोर्चा
बदलीच्या मागणीसाठी हजारोंच्या संख्येने काढला मोर्चा

दिनेश यादव/वाडा, दि. 29 : वाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुदाम शिंदे यांच्याविरोधात श्रमजीवी संघटना आक्रमक झाली असुन शिंदेच्या मनमानी कारभारा विरोधात आज, शुक्रवारी श्रमजीवीने हजारोंच्या संख्येने वाडा पोलीस स्टेशनवर मोर्चा काढला. मोर्चाद्वारे शिंदेंच्या कार्यपद्धतीचा जाब विचारून त्यांच्या बदलीची मागणी या मोर्चातून करण्यात आली. श्रमजीवीचे सरचिटणीस विजय जाधव यांनी या मोर्चाचे नेतृत्व केले.

तालुक्यातील विविध प्रकरणात शिंदे यांनी हितसंबंध जोपासून आरोपींना व धनदांडग्यांना पाठीशी घालण्याचे काम केल्याचा आरोप श्रमजीवी संघटनेने यावेळी केला. तालुक्यातून जाणारी रिलायन्स कंपनीची गॅस पाईपलाईन टाकण्यासाठी शेतकर्‍यांना मोबदला न देता पोलिसांचा ताफा गावात फिरवून पोलीस शेतकर्‍यांना वेठीस धरत आहेत. तर मुसारणे येथील एका आदिवासी मुलीला घरातून उचलून नेणार्‍या तरुणांवरही पोलिसांनी अद्याप कोणतीही कारवाई केलेली नाही. पिंपरोळी येथील बाळू शेंडे, तिळगाव येथील लहू दिवा, करांजे येथील जयराम गोंधळी, डाहे येथील नामदेव गवळी, चेंदवली येथील जानू म्हस्कर, वाडा सोनारपाडा येथील मंजुळा जाधव तसेच नुकत्याच बिलोशी येथील शेतकरी विनोद चौधरी व त्याच्या कुटुंबावर काही गावगुंडांनी केलेल्या हल्ल्याप्रकरणी पोलीस निरीक्षक शिंदे यांनी संबंधित आरोपींना पाठीशी घातल्याचे असे अनेक आरोप श्रमजीवी संघटनेने केले आहेत. गावगुंडांच्या हल्ल्यात जखमी झालेले चौधरी कुटुंब देखील या मोर्चात सहभागी झाले होते.

दरम्यान पोलीस निरीक्षक शिंदेच्या मनमानी व दहशतीच्या कारभारामुळे सर्वसामान्य जनता भयभीत असून गुन्हेगार मात्र मोकाट फिरू लागल्याने पोलीस स्टेशन नेमके कोणासाठी काम करू लागलेय, असा सवाल यावेळी उपस्थित करण्यात आला. त्याचप्रमाणे शिंदेंच्या कार्यकाळात मोठ्याप्रमाणावर हप्तेखोरी सुरु असल्याचा आरोप करत गुन्हेगारांना जरब बसविण्याऐवजी सामान्य जनतेला वेठीस धरणार्‍या शिंदेंची तत्काळ बदली करावी, अशी मागणी मोर्चेकर्‍यांनी केली.

यावेळी श्रमजीवी संघटनेच्या शिष्टमंडळाने उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश घाडगे यांची भेट घेऊन वरील आक्षेप नोंदवले. याची घाडगे यांनी नोंद घेत कारवाई करण्याचे आदेश शिष्टमंडळाला दिले. या शिष्टमंडळात श्रमजीवी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुरेश रेंजड, प्रमोद पवार, कैलास तुंबडा, उल्हास भानुशाली, सरिता जाधव, जानू मोहंडकर आदी सहभागी झाले होते.

शिंदे यांच्याविरोधात काही दिवसांपूर्वीच तालुक्यातील सर्वपक्षीय पदाधिकार्‍यांनी पालघरच्या पोलीस अधिक्षकांकडे तक्रार केली असतानाच आता श्रमजीवी संघटना देखील आक्रमक झाल्याने शिंदेच्या बदलीसाठी प्रशासनावर दबाव वाढत असल्याचे चित्र आहे.

Print Friendly, PDF & Email

comments