दि. १३: डहाणू नगरपरिषदेच्या मुख्य अधिकारी पदावर विजय द्वासे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी आजच आपला पदभार स्वीकारला. द्वासे हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी होते. लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात रंगेहाथ पकडले गेलेले डहाणूचे मुख्याधिकारी विनोद डवले यांच्यावर निलंबनाची कारवाई झाल्याने ही जागा रिक्त होती. दरम्यानच्या काळात डहाणू नगरपरिषदेचा अतिरिक्त कारभार पालघरच्या मुख्याधिकारी यांचेकडे सोपविण्यात आला होता.
डहाणू नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी पदावर कोणाची वर्णी लागते याकडे डहाणूकरांचे लक्ष लागले होते. यापूर्वी डहाणू नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी पदाचा कार्यभार सांभाळणारे अतुल पिंपळे आणि प्रियांका केसरकर यांची देखील नावे चर्चेत होती. अतुल पिंपळे यांच्यावर गैरकारभाराचे आरोप करणारे डहाणूचे भाजप आमदार पास्कल धनारे यांनी पुन्हा अतुल पिंपळे यांच्या नावाची मुख्यमंत्र्यांकडे शिफारस केली होती. मात्र या शिफारशींना मुख्यमंत्र्यांनी केराची टोपली दाखवल्याचे स्पष्ट झाले आहे.