डहाणूतील थोर समाज सेविका शकुंतला करंदीकर यांचे निधन

0
2064
IMG-20180601-WA0138प्रतिनिधी
          दि. ०१ : डहाणूतील थोर  समाज सेविका, सुशील गृहिणी, अनेक व्यक्ति व संस्थांचा आधार असलेल्या शकुंतला करंदीकर यांचे यांचे आज, शुक्रवारी पहाटे अल्पशा आजाराने  निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा मकरंद, मुलगी मेघना, सुना जावई नातवंडे असा परिवार आहे.
           पुण्याच्या सुप्रसिद्ध व्यावसायिक आगाशे कुटूंबातील शकुंतला करंदीकर यांना बालपणापासूनच समाज सेवेचे बाळकडू मिळाले होते. लग्नानंतर पति राजाभाऊ करंदीकर यांना चांगली साथ देऊन यशस्वीपणे कुटूंबाचा सर्व डोलारा त्यांनी सांभाळला.
            रोटरी इनरव्हील क्लबच्या तसेच बुधवार भगिनी मंडळाच्या त्या संस्थापक अध्यक्ष होत्या. त्यांच्या कार्यकाळात समाजाभिमूख विशेषतः महीलांच्या सक्षमीकरणासाठी विविध उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात आले. कोणत्याही संस्थेच्या मदतीसाठी निधी उभा करण्यामध्ये त्यांचा हातखंडा होता. सामाजिक कार्या बरोबरच त्या स्वयंपाकातही सुगरण होत्या. निरनिराळे चविष्ट पदार्थ तयार करुन आलेल्या पाहुण्यांना खाऊ घालण्यात त्यांना फार आनंद मिळत असे.
           डहाणू व परिसरातील विविध सामाजिक व शैक्षणिक संस्थांशी त्यांचा जवळचा संबंध होता. त्यांची ईच्छाशक्ती इतकी प्रबळ होती की आयुष्यातील मोठमोठ्या संकटांवर मात करुन मोठ्या जिद्दीने त्या पुन्हा उभ्या राहिल्या व आपले कार्य पुढे चालू ठेवले. त्यांचा उत्साह तरुणांनाही लाजवेल असा होता. त्यांच्या जाण्याने डहाणूच्या सामाजिक व शैक्षणिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. त्यांचा मनमिळावू हसतमुख स्वभाव, सगळ्यांना मदतीला धावून जाण्याची वृत्ती तसेच समाजाभिमूख कार्य करणारे, बुध्दीमान कर्तव्यदक्ष असे थोर तेजस्वी हरहुन्नरी व्यक्तिमत्त्व आपल्यातून निघून गेल्यामुळे सर्व स्तरातून हळहळ व्यक्त होत आहे.
Print Friendly, PDF & Email

comments