हे परमेश्वरा! मतमोजणीचा खरा आकडा बाहेर पडू दे!

राजतंत्र न्यूज नेटवर्क :

पालघर लोकसभा मतदारसंघाचे दिवंगत खासदार चिंतामण वनगा यांच्या निधनाने रिक्त झालेल्या पोटनिवडणुकीत मतदान प्रक्रिया २८ तारखेला एकदाची पार पडली. पालघरचे जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांच्या नेतृत्वाखाली याआधी पार पडलेल्या डहाणू, जव्हार व वाडा नगरपालिकांच्या निवडणूकीत झालेल्या गोंधळामुळे निवडणूका लांबणीवर पडण्याची नामुष्की ओढवली होती. कॉंग्रेसचे सईद शेख व राष्ट्रवादीचे राजेंद्र माच्छी यांना छाननीत बेकायदेशीरपणे अपात्र ठरवून निवडणूकीच्या रिंगणातून त्यांना बाहेर ठेवण्याचा प्रयत्न फसला होता. राजेंद्र माच्छी यांना ऐन निवडणूकीत तडीपारीची नोटीस बजावून देखील ते निवडून आले. मुंबई उच्च न्यायालयाने सईद शेख प्रकरणात चपराक दिल्यानंतर निवडणूका लांबणीवर पडल्या. या प्रश्नांना वाचा फोडल्याबद्दल दैनिक राजतंत्रला कारवाईची पोकळ नोटीस देण्यात आली. ही नोटीस जिल्हाधिकारी यांनी अज्ञानातून दिल्यामुळे अशी नोटीस जुन्या फटाक्याप्रमाणे फुस्स झाली. हे सर्व आठवण्याचे कारण, जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे हे निवडणूक काळात त्यांना भयंकर अधिकार असल्याचे मानतात आणि डोक्यात हवा गेल्याप्रमाणे वागतात असा अनुभव आहे. 

निवडणूक निर्णय अधिकारी असल्याच्या काळात मंत्री आणि लोकप्रतिनिधी यांना सामान्य समजणे, त्यांना महत्व न देणे यामुळे निवडणूका सुरळीत पार पडणार असतील तर ठिक आहे. निवडणूक कर्मचाऱ्यांना सतत धमक्या देऊन किंवा गुन्हे दाखल करुन निवडणूक प्रक्रीया सुरळीत पार पडली तरी ठिक आहे. मात्र अशा वागण्यातून जिल्हाधिकारी केवळ आपल्याकडे अधिकार आहेत म्हणून कर्मचाऱ्यांना धाक दाखवून नेतृत्व करु शकतील हा त्यांचा समज फोल ठरला. जिकडे धाक दाखवला जाणे अपेक्षीत आहे तिथे तो दाखवला नाही आणि चुकीच्या ठिकाणी दाखवला तर प्रभाव पडत नाही. डहाणू येथे निवडणूक काळात एक विना परवानगी सभा झाली. ह्या सभेमध्ये एका वक्त्याने बुलेट ट्रेन किंवा बंदरासाठी येणाऱ्या अधिकाऱ्यांच्या विरोधात अतिशय प्रक्षोभक भाषणे केली. निवडणूक आचारसंहिता पथकाने थातूर मातूर कारवाई करुन विषय आटोपता घेतला. पालघर आणि डहाणू येथे मुख्यमंत्र्यांच्या सभेच्या वेळी बेकायदेशीर पणे पोस्टर लावण्याप्रकरणी निवडणूक यंत्रणेने नावानीशी गुन्हे दाखल न करता अज्ञात इसमांविरुद्ध गुन्हे दाखल केले. तेव्हा नारनवरेंमध्ये नसलेला टि. एन. शेषन जागा झाला नाही.

नारनवरेंनी अनेक अधिकाऱ्यांना निवडणूक काळात नोटीसा दिल्या, गुन्हे दाखल केले. मात्र तरी सहकाऱ्यांमध्ये धाकही निर्माण झाला नाही किंवा संघ भावनाही निर्माण झाली नाही. निवडणूक कर्मचारी खासगी वाहनातून मतदान यंत्रे आणत असताना जागृत लोकांनी त्यांना पोलीसांच्या ताब्यात दिले. जिल्हाधिकारी काय करीत होते? मतदानानंतर मतदान यंत्रांमध्ये फेरफार करुन मते वाढवली गेल्याचा आरोप होत असताना निवडणूक यंत्रणेने असे बेजबाबदार वर्तन करणे याला जबाबदार कोण? जिल्हाधिकारी शक्य असेल तिथे एखाद्यावर जबाबदारी टाकून त्याला बळीचा बकरा ठरवू शकतील. पण त्यानंतरच्या गंभीर चुकांचे काय? मतदानाच्या सायंकाळी ६ वाजेपर्यंत 46.50 टक्के मतदान झाल्याचे जिल्हाधिकारी यांनी जाहीर केले होते. अचानक दुसऱ्या दिवशी 53.22 टक्के मतदान झाल्याचे जाहीर केले. एका रात्रीत 6.72 टक्के कसे वाढले? 6.72 टक्के म्हणजे 1 लाख 16 हजार पेक्षा जास्त मते होतात. निवडणूक यंत्रणेने असा हलगर्जीपणा करणे अक्षम्य आहे. यातून निवडणूक यंत्रणेची विश्वासार्हता डावावर लागते. त्यातही पुन्हा जिल्हाधिकारी यांनी जी अंतिम आकडेवारी दिली आहे. त्यामध्ये एकूण 17 लाख 31 हजार 077 मतदारांपैकी 8 लाख 87 हजार 687 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावल्याचे आकडे जाहीर केले आहेत. आणि 53.22 टक्के मतदान झाल्याचे जाहीर केले. ह्या आकडेवारीने प्रत्यक्षात 51.28 टक्के मतदान झाले हे ४ थ्या इयत्तेतील मुलाकडून हिशेब करुन घेतला तरी स्पष्ट होईल. 1.94 टक्के फरक म्हणजे 33 हजार 582 मतांचा फरक! इतक्या मोठ्या फरकाने पालघर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूकीत कदाचित जय पराजय होणार नाही, इतका हा आकडा मोठा आहे.
आणि म्हणूनच ह्या निवडणूकीची मतमोजणी सुरळीत पार पडावी. जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरेंना आकडेमोड नीट जमावी, यासाठी परमेश्वराला साकडे घालण्याशिवाय पर्याय नाही. अन्यथा वेगवेगळे आकडे बाहेर पडतील आणि प्रत्येक पक्ष आळीपाळीने फटाके वाजवून मोकळे होतील. आणि अभूतपूर्व गोंधळ निर्माण होईल. राजकीय पक्षांनी देखील विजयाचे फटाके फोडताना अधिक काळजी घ्यावी हा अनाहुत सल्ला देणे इतकेच याक्षणी आमच्या हातात आहे.

Print Friendly, PDF & Email

comments