
पालघर, दि. ३ : भारतीय जनता पक्षाचे दिवंगत खासदार चिंतामण वनगा यांच्या निधनानंतर होऊ घातलेल्या पोटनिवडणुकीच्या तोंडावर वनगा कुटुंबीयांनी गुरुवारी ( दि. ३ ) ‘मातोश्री’ गाठल्याने भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. ज्या वनगांनी संपूर्ण हयात भाजपसाठी खर्ची घातली त्यांच्या कुटुंबियांवर भाजपच्या नेतृत्वाने मातोश्री गाठण्याची वेळ आणल्याचा आरोप वनगा कुटुंबीयांनी पत्रकार परिषदेत केला.
खासदार वनगांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागी येत्या २८ मे रोजी निवडणूक होत आहे. ह्या निवडणुकीत वनगांच्या राजकीय वारसांना उमेदवारी द्यावी असा सूर गेले काही दिवस वनगा समर्थकांनी लावून धरला आहे. मात्र पक्ष नेतृत्व त्याकडे फारसा उत्साही असल्याचे दिसत नसल्याने वनगा कुटुंबांसह त्यांच्या समर्थकांमध्ये प्रचंड अस्वस्थता होती. पक्ष नेतृत्वाकडे वारंवार वेळ मागूनही ती दिली गेली नसल्याने नाराज झालेल्या वनगा कुटुंबीयांनी आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली.त्यामुळे आगामी पोटनिवडणुकीत भाजपसमोर मोठे आव्हान उभे राहिले असल्याचे दिसत आहे. वनगा कुटुंबीयांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत भाजप आणि चिंतामण वनगा यांचं नातं कसं अतूट होतं, पक्ष उभारणीत त्यांनी खाल्लेल्या खस्ता, हे सांगत आज त्यांच्या कुटुंबीयांनी अश्रुभरल्या डोळ्यांनी आम्हाला पक्षानं वाऱ्यावर सोडल्याचे सांगितल्याने भाजप नेतृत्वाने एका दिवंगत आदिवासी खासदारांच्या कुटुंबीयांना अपमानित केल्याने त्याचा निवडणुकीत नेमका काय परिणाम होईल, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
पालघर पोटनिवडणुकीत भाजपनं वनगा यांच्या कुटुंबीयांकडे दुर्लक्ष केल्याची खंत त्यांनी यावेळी बोलून दाखवली. आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची फोनवरून आणि एसएमएसवरून भेट मागितली पण त्यांनी काही वेळ दिली नाही, असे श्रीनिवास वनगा यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी वनगांच्या पत्नी जयश्री वनगा, प्रफुल्ल वनगा हे उपस्थित होते.