बाल शिक्षणातूनच माणसाची जडणघडण होते! – डॉ. विजया वाड

0
854
KOSBAD PURASKAR VITRAN
राजतंत्र न्यूज नेटवर्क
मुंबई, दि. १९: बाल शिक्षणातूनच माणूस घडतो. बालमनावर झालेले संस्कार चिरकाल टिकतात. देशाचे भविष्य घडवायचे असेल तर समृद्ध नागरिक घडवावे लागतील आणि यासाठी बालशिक्षणाचा पाया अधिक मजबूत करावा लागेल. ताराबाई आणि अनुताई यांनी हे ओळखूनच तळागाळापर्यंत पूर्व प्राथमिक शिक्षण पोचविण्याचे महत्वपूर्ण कार्य उभे केल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाच्या माजी अध्यक्षा डॉ. विजया वाड यांनी मुंबई येथे बोलताना केले. नूतन बाल शिक्षण संघातर्फे आयोजित पुरस्कार सोहळ्यात त्या प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होत्या. 
 मुंबईतील (दादर) पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या सभागृहात आयोजीत करण्यात आलेल्या एका शानदार कार्यक्रमात नूतन बाल शिक्षण संघातर्फे दिल्या जाणाऱ्या पद्मभूषण ताराबाई मोडक पुरस्कार व पद्मश्री अनुताई वाघ पुरस्काराचे वितरण करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. विजया वाड व सोमैय्या महाविद्यालयाच्या मराठी विभाग प्रमुख डॉ. विणा सानेकर उपस्थित होत्या. व्यासपीठावर नूतन बाल शिक्षण संघाचे विश्वस्त व अध्यक्ष चंद्रगुप्त पावस्कर, विश्वस्त ॲड. प्रकाश करंदीकर, निवड समिती सदस्य तथा झी २४ तास वृत्तवाहिनीचे मुख्य संपादक श्री विजय कुवळेकर आणि मॉडर्न कॉलेज (पुणे) चे माजी प्राचार्य श्री अनंत गोसावी, सरस्वती मंदीर ट्रस्ट (ठाणे) चे विश्वस्त सुरेंद्र दिघे, सौ. रेणू राजाराम दांडेकर (रत्नागिरी) हे मान्यवर उपस्थित होते.
पद्मभूषण ताराबाई मोडक आणि पद्मश्री अनुताई वाघ यांनी नूतन बाल शिक्षण संघाच्या माध्यमातून पूर्व प्राथमिक व माध्यमिक शिक्षण क्षेत्रात मोठे कार्य उभे केले आहे. आदिवासी व दलीत समाज देखील पूर्व प्राथमिक शिक्षणापासून वंचीत राहू नये या भुमीकेतून त्यांनी स्वातंत्र्यपूर्व काळापासून डहाणू सारख्या आदिवासी बहुल तालुक्यात शैक्षणिक क्षेत्रात मोठे कार्य उभे केले. त्यांच्या या कार्याची स्मृती चिरंतन रहावी व त्यापासून इतरांनाही प्रेरणा मिळावी ह्या हेतूने नूतन बाल शिक्षण संघाने २०१७ पासून दरवर्षी पूर्व प्राथमिक व माध्यमिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या संस्थांच्या व व्यक्तींच्या कार्याचा गौरव करण्याचा निर्णय घेतला आहे. पद्मभूषण ताराबाई मोडक यांच्या नावाने संस्थेला व पद्मश्री अनुताई वाघ यांच्या नावाने व्यक्तीला असे पुरस्कार दिले जातात. सन्मानपत्र व २५ हजार रुपये रक्कम असे पुरस्काराचे स्वरूप असून दरवर्षी पद्मभूषण ताराबाई मोडक यांच्या जयंतीदिनी १९ एप्रिल रोजी या पुरस्काराचे वितरण केले जात आहे. २०१८ मध्ये संस्थेने पद्मभूषण ताराबाई मोडक पुरस्कारासाठी सरस्वती मंदीर ट्रस्ट (ठाणे) ही संस्था व पद्मश्री अनुताई वाघ पुरस्कारासाठी सौ. रेणू राजाराम दांडेकर, दापोली (रत्नागिरी) यांची निवड करण्यात आली. त्यांना या कार्यक्रमात पुरस्काराने गौरविण्यात आले.
 डॉ. विणा सानेकर यांनी सध्या मातृभाषेतून शिक्षण देण्यात निर्माण होत असलेल्या अडथळ्यांबाबत भाष्य करताना पुर्व प्राथमिक व प्राथमिक शिक्षणाबाबतच्या दुरावस्थेकडे लक्ष वेधले. विजय कुवळेकर व अनंत गोसावी यांनी पुरस्काराच्या निवड समितीचे सदस्य म्हणून काम करताना आलेले अनुभव कथन केले. तर सौ. रेणू दांडेकर यांनी शिक्षणाच्या क्षेत्रात केलेल्या प्रयोगांची उपस्थितांना माहिती करुन दिली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला नूतन बाल शिक्षण संघाच्या उपाध्यक्षा सौ. संध्या करंदीकर यांनी उपस्थितांना संस्थेच्या कार्याची ओळख करुन दिली. प्रा. प्रदीप राऊत व प्रा. अशोक पाटील यांनी पुरस्कारासाठी निवड झालेल्या संस्था व व्यक्तीना दिल्या जाणाऱ्या सन्मानपत्राचे वाचन केले. कार्यक्रमाचा समारोप करताना चंद्रगुप्त पावस्कर यांनी नूतन बाल शिक्षण संघाला आदिवासी क्षेत्रात कार्य करण्यासाठी बळ देण्याचे आवाहन केले.
Print Friendly, PDF & Email

comments