सुशील बागूल/राजतंत्र मिडीया
बोईसर, दि. 15 : बदलत्या काळाच्या कसोटीवर भारतीय राज्यघटनेत आजपर्यंत १०१ सुधारणा करण्यात आल्या. असे असले तरी मात्र भारतीय राज्यघटना व त्याचा मुळ उद्देश बदलणे अशक्य असुन राज्यघटना बदलण्याचा घाट घातला जात असल्याच्या अपप्रचाराला बळी पडू नये. बाबासाहेबांनी भारतीय राज्यघटना स्वतःचा बचाव करण्याईतकी सक्षम बनविली असल्याचे प्रतिपादन दैनिक राजतंत्रचे संपादक संजीव जोशी यांनी केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त काल, 14 एप्रिल रोजी बोईसरमधील भिमनगर येथील प्रज्ञा शील बुद्ध विहाराच्या पटांगणावर विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याच कार्यक्रमांचा भाग म्हणून भारतीय राज्यघटनेची तोंड ओळख या विषयावर संजीव जोशी यांचे व्याख्यान आयोजीत करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांनी भारतीय राज्यघटना म्हणजे काय, राज्यघटनेने भारतीयांना दिलेले मुलभूत अधिकार, नागरींकाची मुलभुत कर्तर्व्ये, धर्मनिरपेक्षता, घटनेतील दुरुस्त्या यांसह विविध मुद्दे उदाहरणांसह उपस्थितांना पटवून दिले. आजच्या युवकांनी आपल्या आयुष्यातील पहिल्याच वेतनातून भारतीय राज्यघटनेची प्रत खरेदी करुन त्याचा अभ्यास करावा, ज्या दिवशी प्रत्येक भारतीय नागरीकाच्या घरात राज्यघटनेची प्रत दिसेल व ती त्याने समजून घेतली असेल त्या दिवशी भारताला महासत्ता होण्यापासुन कोणीही रोखू शकणार नाही, असा विश्वास जोशी यांनी यावेळी बोेलून दाखवला. जो पर्यंत आपण राज्यघटना समजून घेत नाहीत, तोपर्यंत बाबासाहेबांच्या विचारातील भारत आपण घडवू शकणार नाही, असेही ते म्हणाले. पुढे बोलताना ग्रामसभेचे महत्व पटवून देतानाच प्रत्येक ग्रामस्थाने आपल्या भागातील ग्रामसभेला उपस्थित राहून गावाच्या विकासात योगदान द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले. दरम्यान, उपस्थित लोकांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे व त्यांच्या शंकांचे निरसन जोशी यांनी केले.
कार्यक्रमास डहाणू एज्युकेशन ट्रस्टचे उपाध्यक्ष सुधिर कामत देखील उपस्थित होते. कामत यांनी उपस्थितांना संजीव जोशी यांच्या मिशन भारतीय संविधान बद्दल माहिती देताना संजीव जोशी यांचा अल्पपरिचय करुन दिला. तसेच जोशी यांचे हे भारतीय राज्यघटनेवरील २६ वे व्याख्यान असल्याची माहिती दिली.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी रवींद्र पोहूरकर, भरत डोंगरे, शुद्धोधन डोंगरे, भागीनाथ बागुल, रवींद्र आवळे, राहुल जगताप, खिल्लारे सर यांच्यासह प्रतन्य शील बुद्ध विहार, संघाच्या महिला कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.