
जव्हार, दि. १५: प्रत्येक भारतीय नागरीकाने भारतीय राज्यघटना समजून घेतली पाहिजे. त्यामुळे लोकशाही व्यवस्था समजणे सोपे होईल. आणि लोकशाही व्यवस्था समजली म्हणजे आपण त्यात सक्रीय होऊ शकतो. त्यातूनच देश सामर्थ्यशाली बनेल असा विश्वास दैनिक राजतंत्रचे संपादक संजीव जोशी यांनी जव्हार येथे बोलताना व्यक्त केला. ते जव्हारस्थित प्रगती प्रतिष्ठान व सिन्जेठीया फाऊंडेशन तर्फे घेतल्या जाणाऱ्या कृषी उद्योजकांच्या प्रशिक्षण वर्गात भारतीय राज्यघटना व देशातील कायदे या विषयावरील बोलत होते.
सर्वसामान्य नागरिकांनी देखील लोकशाही व्यवस्थेमध्ये सक्रीय सहभाग नोंदवावा, यासाठी भारतीय राज्यघटनेमध्ये १९९२ साली ७३ व ७४ व्या घटनादुरुस्तीद्वारे भारतीय राज्यघटनेमध्ये पंचायतराज व्यवस्था व नगरपालिका व्यवस्थेची तरतूद करण्यात आली. ग्रामसभेला गावाच्या विकासाचे अधिकार दिले. त्याही पुढे जाऊन अनुसूचित क्षेत्रांसाठी पेसा कायदा अस्तित्वात आला. या कायद्यान्वये ग्रामसभेला सरपंचावर अविश्वासाचा ठराव आणण्याचे अधिकार दिलेले आहेत. मात्र लोकांना आपल्या अधिकार आणि कर्तव्याची जाणीव नसल्यास व्यवस्था निष्प्रभ ठरते. आणि म्हणून याबाबत केवळ स्वतः ज्ञान घेऊन थांबू नका, तर ते इतरांना देखील द्या असे आवाहन देखील जोशी यांनी केले.
कुठलेही कायदे सार्वजनिक हितासाठीच केलेले असतात. यामुळेच कायदा तोडण्यापेक्षा तो समजून घेऊन त्याचा सन्मान करण्याची प्रवृत्ती मनात बाळगली पाहिजे. ते आपल्या आणि देशाच्या हिताचे ठरेल. असे सांगून हॅल्मेट सक्तीसारख्या सुरक्षा व सुरक्षिततेच्या उपाययोजनांमुळे आपल्यावर अन्याय झाल्याची भावना न बाळगता सकारात्मक दृष्टिकोन तयार करावा असा संदेशही जोशी यांनी दिला. यावेळी डहाणू तालुका विकास परिषदेचे सुधीर कामत आणि रतन खत्री हे देखील उपस्थित होते.