भरकटलेल्या पर्यावरणवादाने घोटला डहाणूच्या विकासाचा गळा!

भरकटलेल्या पर्यावरणवादाने घोटला डहाणूच्या विकासाचा गळा!

दिनांक 20 जून 1991 रोजीचे नोटिफिकेशन डहाणूसाठी शाप कि वरदान? 20 जून डहाणूसाठी काळा दिवस कि उत्सव?


भाग 1 : प्रास्ताविक


[highlight]संजीव जोशी (दैनिक राजतंत्र च्या दिनांक १३ जुलै २०१५ रोजीच्या अंकात प्रसिद्ध):[/highlight]
गेल्या काही दिवसांपासून दैनिक राजतंत्रतर्फे डहाणूच्या विकासाच्या मुद्द्यावर काही प्रश्‍न उपस्थित करण्यात आले. विकासाच्या मुद्द्यावर विविध अंगाने चर्चा व्हावी हा या मागचा हेतु होता. दिनांक 20 जून 1991 रोजीचे नोटिफिकेशन डहाणूसाठी शाप कि वरदान? 20 जून डहाणूसाठी काळा दिवस कि उत्सव? डहाणू तालुक्याला फक्त विकास हवा कि फक्त पर्यावरण हवे? डहाणू तालुक्याचा पर्यावरणासह विकास शक्य नाही का? डहाणू तालुका कॉर्पोरेट वॉरचा बळी आहे का? डहाणूच्या पर्यावरणाची चिंता डहाणू बाहेरचे लोक का करतात? यात त्यांचा हेतु प्रामाणिक आहे का? डहाणू तालुक्याच्या पर्यावरणाची चिंता वाहणारे डहाणू तालुका पर्यावरण संरक्षण प्राधिकरणाचे कामकाज डहाणूतून न चालता मुंबईतुन का चालते? या प्राधिकरणामध्ये डहाणू तालुक्या बाहेरचेच सदस्य का? यात कोणाची सोय पाहिली जाते? डहाणू तालुक्याचा रिजनल प्लॅन 24 वर्षे मंजुर का नाही झाला? डहाणू तालुका पर्यावरणदृष्ट्या संवेदनाशिल जाहिर झालेला असताना मुंबई दिल्ली कॉरिडोर रेल्वेमार्गाला डहाणू प्राधिकरणाने परवानगी कशी दिली? या रेल्वे मार्गामुळे डहाणूच्या विकासाला काही हातभार लागणार आहे का? वाढवण बंदरासंदर्भात शासनाने सामंजस्य करार कसा केला? बंदरामुळे समुद्रातील जिवसृष्टीचे पर्यावरण धोक्यात येणार नाही का? राष्ट्रीयदृष्ट्या महत्वाचा ठरवून मुंबई दिल्ली कॉरिडोर रेल्वेमार्गाला प्राधिकरणाने परवानगी दिली तशी वाढवण बंदराला पण देणार की काय? परवानगी देणार असाल तर डहाणू प्राधिकरण नेमके कशासाठी आहे? डहाणू तालुक्याचा पर्यावरण पोषक विकास साधण्यासाठी राज्य व केंद्र सरकारने नेमके काय प्रयत्न केले? डहाणू ग्रीन ठेवण्यासाठी, चिकु बागायती वाढवण्यासाठी व टिकवण्यासाठी धरणे कालवे बांधले का? तालुक्यातील सुर्या धरणाचे पाणी यासाठी आरक्षीत ठेवले गेले का? डहाणूचा पर्यटन स्थळ म्हणून विकास साधण्याचा काय प्रयत्न झाला? डहाणूत आयटी पार्क, एज्युकेशन हब, मेडीकल हब अशा काही पर्यावरण पोषक संकल्पना राबवता आल्या असत्या का? महाराष्ट्र सरकारने अ, ब व क वर्ग नगरपालिकांसाठी तयार केलेल्या विकास नियंत्रण नियमावलीतुन डहाणू नगरपालिकेला का वगळले? तळ + 2 मजल्यांपेक्षा जास्त उंचीच्या इमारती बांधल्यामुळे पर्यावरणाचे नेमके काय नुकसान होणार?
हे प्रश्‍न उपस्थित होताच लोकांना ते आपल्या मनातले असल्याचेच वाटले. लोकांच्या मनातील अस्वस्थतेला दैनिक राजतंत्रने वाट करुन दिली. यातुन लोकांनी 20 जून हा काळा दिवस पाळण्याचा एकमुखाने निर्णय घेतला. डहाणू शहरात त्या दिवशी बंद पुकारण्यात आला व तो 100 टक्के यशस्वी झाला. बहुतांश राजकिय पक्षांनी व संघटनांनी बंदला पाठींबा दिला. भरकटलेल्या पर्यावरणवादाला लोकांनी दिलेले हे चोख उत्तर ठरले. यातुन लोकांना काय हवे ते अधिक स्पष्ट झाले.
असे असले तरीही 20 जून 1991 च्या नोटिफिकेशन संदर्भात अनेक लोकांच्या मनात गैरसमज देखील आहेत. हे नोटिफिकेशन 24 वर्षांपुर्वीचे असल्याने चालु कालखंडातील एक संपुर्ण युवा पिढीला या विषयी माहिती नसणे स्वाभाविक आहे. 24 वर्षे ही कोंडी फोडता न आल्याने हा प्रश्‍न विस्मृतीत गेला. अनेकांनी हा खटाटोप करण्यापेक्षा स्थलांतर करणे पसंत केले. मुठभर लोकांना मात्र पर्यावरणवादाचे घोंगडे पांघरुन आपले दुकान थाटता आले. आपला दबदबा निर्माण करता आला. डहाणूतील दारीद्रय जगाला दाखवून ते दुर करण्याच्या बहाण्याने परदेशातुन पैसा गोळा करता आला. कोणी या पैशातुन पर्यावरणाचे धडे देण्याचे सोंग वठवले तर कोणी सौर उर्जेने गावेच्या गावे (कागदावर) झळाळून टाकली. कोणी शाळा काढून परदेशी पर्यटकांना येथील दुरावस्था पहायला आकर्षीत केले.
हा प्रश्‍न पुन्हा चर्चेत आल्यानंतर तो 24 वर्षानंतर आत्ताच का? असा देखील प्रश्‍न उपस्थित झाला. या प्रश्‍नाचे निराकरण देखील करावे लागणारच. ते या लेखमालेत मिळेलच. मात्र प्रश्‍न न सोडवण्यापेक्षा तो सोडवण्यासाठी उशिरा का होईना प्रयत्न करणे स्वागतार्ह्यच म्हणावे लागेल. आणि आत्ताच का? असा प्रश्‍न उपस्थित होण्याचे तसे काहीच कारण नाही. कारण 24 वर्षांपासून सतत या प्रश्‍नाचा काही लोक आपआपल्या परीने पाठपुरावा करीत आहे. आपले विद्यमान खासदार चिंतामण वणगा हा प्रश्‍न सोडविण्यासाठी सातत्याने प्रयत्नशिल राहीले. सर्वच पक्षांनी हा प्रश्‍न सोडविण्यासाठी प्रयत्न केले. विशेष म्हणजे सर्वच राजकीय पक्षांची केंद्रात व राज्यात सत्ता येऊन गेली. परंतू यासंदर्भात लोकभावना काय हे समजू न शकल्याने या प्रश्‍नाला त्या-त्या सरकारांनी गांभिर्याने घेतलेले दिसत नाही. 20 जून च्या डहाणू बंदने राज्यकर्त्यांना येथील लोकभावना समजू शकली असेल.
आता 24 वर्ष या मोठ्या कालावधीचे मुल्यमापन केले तर प्रश्‍न पडतो, ग्रीन झोन म्हणजे नेमके काय? संपुर्ण तालुक्यात ग्रीन डहाणू या संकल्पनेला साजेसे असे एखादे उद्यान आहे का? मुलांना खेळण्यासाठी एखादे क्रिडांगण विकसीत झाले का? येथील समुद्र किनारे संरक्षीत राहीले का? नद्या प्रदुषण मुक्त राहील्या का? या सर्वांची उत्तरे नाही अशी का येतात? अहो लोकांना कळु तरी द्या ग्रीन डहाणू म्हणजे नेमके काय? त्याचा वास कसा असतो? त्याची चव कशी असते? त्याची मजा काय? आणि तुम्ही पण (पर्यावरणवादी) ही मजा घेत घेत डहाणूच्या पर्यावरणाची काळजी घ्यायला काय हरकत आहे. उंटावरुन शेळ्या हाकुन आमच्या डहाणूकरांचे भले कसे होणार? काही धनाड्ड्यांनी भ्रष्ट्र सरकारी यंत्रणांना हाताशी धरुन ग्रीन झोनच्या अडचणीतुन वेळोवेळी अर्थपुर्ण मार्ग देखील काढले. तुमच्यापर्यंत काही पोचले का?
एकंदरीतच या प्रश्‍नाचे संपूर्ण विश्‍लेषण करण्याच्या आवश्यकतेतुन हा लेखप्रपंच आहे. या नोटिफिकेशनचा उगम कसा झाला? डहाणू तालुका पर्यावरण संरक्षण प्राधिकरण कसे अस्तित्वात आले? त्याचे फायदे काय झाले व तोटे काय झाले? कुणाचे, काय फायदे झाले? आणि महत्वाचे म्हणजे पुढे काय? हे डहाणू तालुक्यातील लोकांना ठरवणे सोपे जावे हेच या लेखमालेचे उद्दीष्ट्य आहे. (क्रमश:)

जेपीजी फाईल पाहण्यासाठी लिंक 

 

Print Friendly, PDF & Email

comments