प्रदुषणकारी कंपन्यांना नियंत्रण मंडळाचे अभय ? सुनावणी दरम्यान प्रांतांचे कानावर हात ; तक्रारदार हतबल

0
826
विशेष प्रतिनिधी
वाडा, दि.१५: तालुक्यातील अबिटघर गावात औद्योगिक कारखान्यांच्या घातक प्रदुषणामुळे स्थानिकांचे आरोग्यच धोक्यात आले असताना  गुरुवारी उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयात या प्रकरणी झालेल्या सुनावणी प्रसंगी प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी होणारे प्रदुषण घातक नसल्याचा अहवाल दिल्याने प्रदुषण नियंत्रण मंडळ या घातक प्रदुषणकारी कारखान्यांना अभय देते कि काय ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. तर सुनावणी घेणाऱ्या उपविभागीय अधिकारी मोहन नळदकर यांनी आपण टेक्नीकल ॲथॉरिटी नसल्याने ठोस कारवाई करता येत नसल्याचे  म्हणत कारवाईबाबत त्यांनी कानावर हात ठेवल्याचे दिसत आहे.
IMG20180210121416आबिटघर गावातील औद्योगिक कारखान्यांमुळे  घातक प्रदूषण होत असल्याने स्थानिक नागरिक व ग्रामपंचायतीने यासंदर्भात तक्रारी केल्या होत्या.  ग्रामस्थांनी केलेल्या तक्रारींसंदर्भात वाड्याच्या उपविभागीय अधिकाऱ्यांनी गुरुवारी ( दि. १५ )  सुनावणी घेतली. मात्र ह्या  सुनावणी दरम्यान उपविभागीय अधिकारी मोहन नळदकर व प्रदुषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी सुजित डोलम यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे प्रशासन ह्या घातक प्रदुषणकारी कारखान्यांना अभय देत असल्याचेच दिसत आहे.
           सुनावणीप्रसंगी तक्रारदार विश्वास पाटील यांनी ठाम भूमिका घेत कारखान्यांमुळे होणाऱ्या प्रदुषणामुळे स्थानिकांचे आरोग्य धोक्यात आले असल्याचे सांगितले. त्याला उपस्थित स्थानिक गावकऱ्यांनीही दुजोरा दिला. तर प्रदुषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी सुजित डोलम यांनी लेखी अहवाल सादर केला असून या अहवालात कारखान्यांकडून होणारे प्रदुषण हे घातक नसल्याचा निर्वाळा दिल्याचे सूत्रांकडून कळते. त्यामुळे प्रशासन कारखान्यांना पाठीशी घालत असल्याचे स्पष्ट  दिसत आहे. येथील सनशाईन पॅपटेक प्रा. लि., ग्रीन टेक मेटल रिसायकल्स प्रा. लि. जय जगदंबा, शक्ती मेटल, मे प्लस ल्युब्रिकेटर्स ह्या पेपर, स्टिल रोलिंग, इंगोट व ऑईल फिल्टरचे उत्पादन घेणाऱ्या  औद्योगिक कारखान्यांच्या रासायनिक सांडपाणी, वायू प्रदूषण व ध्वनी प्रदुषणामुळे स्थानिकांच्या आरोग्यावर होत असलेल्या परिणामाकडे दुर्लक्ष होत असल्याचे बोलले जात आहे. रासायनिक सांडपाणी नाल्यात सोडल्याने पाणी प्रदूषित झाले आहे, तर भूगर्भातील पाण्यावरही याचा दुष्परिणाम झाला असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. कारखान्यां लगत असलेल्या आदिवासी पाड्यातील जनतेला प्रदुषणाचे दुष्परिणाम भोगावे लागत आहेत. मात्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून कारखान्यांना क्लिनचिट देण्याचा प्रयत्न करत असल्याने येथील जनतेला यापुढेही प्रदूषणाचे चटके सहन करावे लागतील अशी भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे प्रशासनाने सुनावणी घेऊन प्रदूषणाविरोधात सुरु केलेली कारवाई ही केवळ फार्स ठरण्याचीच शक्यता अधिक निर्माण झाली आहे.
===========================
   प्रदुषणकारी कारखान्यांना यापूर्वी वारंवार नोटीस बजावून सुधारणा करावयास सांगितले आहे. सद्यस्थितीत असलेले प्रदूषणाची पातळी घातक नसल्याने कारखाने बंद करण्याची कारवाई करता येत नाही.
                    सुजित डोलम
         प्रदुषण नियंत्रण अधिकारी, कल्याण
=============================
प्रदुषणा संदर्भात टेक्निकल ॲथॉरिटी प्रदुषण नियंत्रण मंडळ आहे. आपण या परिसराची पहाणी करणार आहोत. परंतु कारवाईचे अधिकार देखील प्रदुषण नियंत्रण मंडळाला असल्याने यासंदर्भात त्यांनीच निर्णय घ्यायचा आहे.
 मोहन नळदकर , उपविभागीय अधिकारी, वाडा
==============================
प्रदुषणकारी कारखान्यांना प्रशासन पाठीशी घालेल याची भीती आहेच. स्थानिकांच्या आरोग्यासाठी  प्रदूषणाविरोधात आम्ही आमची लढाई सुरु ठेवू.
               विश्वास पाटील, तक्रारदार
==============================
Print Friendly, PDF & Email

comments