डहाणू : समुद्रात बोट उलटली, तीन विद्यार्थीनींचा मृत्यू! जिल्हा आपत्ती निवारण यंत्रणेच्या अस्तित्वावर प्रश्‍नचिन्ह

राजतंत्र मिडीया

दि. 14 : डहाणू येथे समुद्र सफर घडवून आणणारी बोट उलटून झालेल्या अपघातात 3 जणांचा बळी गेला आहे. सोनल भगवान सुरती (17), जान्हवी हरिश सुरती (17) व संस्कृती मायावंशी (17) अशी मृतांची नावे आहेत. स्थानिक मच्छिमारांच्या प्रसंगावधानाने 30 ज26231511_2094574547441495_2007234003070007900_nणांचे जीव वाचले असले तरी जिल्हा आपत्कालीन यंत्रणांच्या सज्जतेवर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. स्थानिकांशिवाय केवळ पोलीस यंत्रणेने जबाबदारी पार पाडली आहे. प्रत्यक्षात बचाव कार्य पूर्ण झाल्यानंतर तटरक्षक दल घटनास्थळी पोचले असले तरी ते कुणाला बचावू शकले नाहीत. केवळ तिसरा मृतदेह शोधण्यात त्यांची मदत झाली. जवळपास सर्व बचाव कार्य संपल्यानंतर जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे मिडीया समोर चमकूगिरी करण्यापुरते या ठिकाणी आले असले तरी मृतांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत जाहीर करण्याची संवेदनशीलता त्यांना दाखवता आली नाही. त्यांच्या हा प्रकार लाईटली घेण्याच्या मानसिकतेवर ज्येष्ठ वकील धनंजय मेहेर यांनी घटनास्थळी संतप्त स्वरात आक्षेप नोंदवल्यानंतर ते काहीसे भानावर आल्याचे दिसले.
डहाणू शहरातील समुद्रकिनार्‍यावर बाबूभाई पोंदा कनिष्ठ महाविद्यालय आहे. या महाविद्यालयातील 12 वीच्या विद्यार्थ्यांचा शनिवारी शेवटचा दिवस होता. त्यांच्या वर्गाला सकाळी 9.30 वाजता सोडण्यात आले. येथे 12 वी पर्यंतच शिक्षणाची सोय असल्याने पुन्हा आपण सर्व एकत्र येऊ शकणार येऊ की नाही या भावनेने त्यांनी समुद्रसफर करुन निरोपसमारंभ साजरा करण्याचे ठरवले. आणि सकाळी 10 वाजता जवळपास 35 ते 40 जण या डबलडेकर बोटीत बसले. बरेचसे जण वरच्या डेकवर जमले. तरुणाईला सेल्फी घेण्याचा मोह आवरला नाही. एका बाजूला सेल्फीसाठी मुले जमा झाली असतानाच किनार्‍यापासून 1 किलोमीटर अंतरावर बोटीने यू टर्न घेतला आणि बोट कलंडली.
बोटीतील प्रवाश्यांच्या सुदैवाने बोट बुडताना अनेक जणांनी पाहिले. डहाणूतील सुप्रसिद्ध छायाचित्रकार सनत तन्ना हे त्यावेळी समुद्र किनार्‍यावर उपस्थित होते. ते स्वतःच्या मुलांना घेऊन सफर करणार होते. मात्र गर्दी पाहून त्यांनी बेत रद्द केला. या सफरीला निघालेल्यांचे त्यांनी फोटो देखील काढले. आणि काही क्षणात ही बोट बुडाल्याचे पाहून त्यांनी लगेचच मदतीसाठी फेसबुकवर पोस्ट टाकली. दरम्यान नगराध्यक्ष भरत राजपूत, पोलीस उप विभागीय अधिकारी सचिन पांडकर, तहसीलदार राहुल सारंग घटनास्थळी पोचले. स्थानिक मच्छीमार बांधवांनी बचावकार्य सुरु केले होते. पोलीस, नगरपालिका व महसूल प्रशासनाने बचतकार्य करणार्‍यांना प्रोत्साहन व मार्गदर्शन करीत बहुतांश बचाव कार्य पूर्ण केले. बचाव कार्यासाठी स्थानिकांनी स्वतःच्याच सर्व सामुग्रीचा वापर केला. जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्षातर्फे एक दोरीचा तुकडा देखील पुरविण्यात आला नाही. केवळ श्रेय घेण्यापुरते या यंत्रणेचे अस्तित्व दिसून आले. सागरी सुरक्षेच्या 2 स्पीड बोटींचा या शोध मोहिमेत उपयोग न झाल्याने या स्पीडबोटी केवळ शोभेचे हत्ती असल्याचे समोर आले आहे. तटरक्षक दलाच्या मदतीसाठी आलेल्या बोटी या 10 नॉटीकल मैल अंतरावर थांबल्या. त्यापेक्षा अधिक जवळ त्या येऊ शकल्या नाहीत. तटरक्षक दलाच्या 3 हेलीकॉप्टर्सनी या मोहितेत भाग घेतला.
सुरुवातीला ही सफर म्हणजे बाबूभाई पोंदा कनिष्ठ महाविद्यालयाची सहल असल्याचा भ्रम पसरला. संस्थेला याबाबत काहीही माहिती नव्हती. मग संस्थेचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश करंदीकर यांच्यासह विश्वस्त मंडळीने आपले विद्यार्थी अपघातग्रस्त झाल्याचे कळल्यानंतर धाव घेऊन यंत्रणांशी समन्वय साधला. संस्थेतर्फे सर्व विद्यार्थ्यांशी प्रत्यक्षात संपर्क साधून चौकशी व खातरजमा करण्यात आली. सुरुवातीला किती विद्यार्थी सफर करण्यास गेले होते याबाबतहा नेमका आकडा हाती येत नसल्याने गोंधळाचे वातावरण होते. सुरुवातीला 6 जण सुस्थितीत बाहेर आल्यानंतर ते रुग्णालयात न जाता परस्पर घरी निघून गेले. या 6 जणांची दप्तरे समुद्रकिनार्‍यावर आढळल्याने सुरुवातीला ते बेपत्ता असल्याची शंका व्यक्त होत होती. त्यानंतर उप जिल्हा रुग्णालयात 27 जणांना आणण्यात आ ले. यामध्ये बोटीचा चालक महेश अंभिरेचा देखील समावेश होता. यातील 26 विद्यार्थ्यांपैकी 4 जणांची प्रकृती चिंताजनक होती. यातील 2 जणांवर उपचार सुरु करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. आणखी 1 मृतदेह तटरक्षक दलाच्या हेलिकॉप्टरच्या मदतीने सायंकाळी उशीरा हाती आला. यानंतर शोध मोहीम थांबविण्यात आली. इंडियन मेडिकल असोसिएशनच्या खासगी डॉक्टर्सनी देखील वैद्यकीय सहाय्य पुरविले. महेश अंभिरे या बोट चालकाने अपघात झाल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांना बचावले. स्वतःची शक्ती क्षीण होईपर्यंत त्याने हे काम केले. अखेर त्याला देखील रुग्णालयात दाखल करावे लागले.
जिल्ह्याचे पालकमंत्री विष्णू सवरा यांनी घटनास्थळी भेट देऊन बचाव कार्याचा आढावा घेतला. तसेच उपजिल्हा रुग्णालयास भेट देऊन विद्यार्थ्यांच्या प्रकृतीची विचारपुस केली. यावेळी खासदार चिंतामण वणगा, आमदार पास्कल धनारे, आमदार अमित घोडा, आमदार मनिषा चौधरी, आमदार रविंद्र फाटक, नगराध्यक्ष भरत राजपुत उपस्थित होते. जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी देखील घटनास्थळी भेट दिली. यावेळी पोलिस अधिक्षक मंजुनाथ सिंगे, डहाणूच्या उपविभागीय अधिकारी आंचल गोयल, उपजिल्हाधिकारी संभाजी अडकुणे यांसह अन्य अधिकारी उपस्थित होते.

डहाणूच्या पर्यटनाला चालना देणारी समुद्र सफारी घडवणारी ही फेरी सोमवारपासून सुरु झाली होती. या बोटीची बंदर विभागाकडे कुठल्याही प्रकारची नोंदणी नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. ही बोट 7 महिन्यांपूर्वी भावनगर येथून आणण्यात आली असून तीच्यामध्ये आसन व्यवस्था बसविण्यात आली आहे. त्यामध्ये सुरक्षा साधनांचा अभाव आणि क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसविल्यामुळे हा अपघात झाल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे. कुठल्याही प्रकारची परवानगी नसताना ही बोट प्रवासी वाहतूक करीत असल्याचे निष्पन्न झाल्याने संबंधित यंत्रणांच्या विश्वासार्हतेला छेद गेला आहे.

बघ्यांच्या गर्दीमुळे पोलीसांची डोकेदुखी – हा अपघात झाल्याचे कळल्यानंतर लोक मोठ्या संख्येने समुद्रकिनार्‍यावर व रुग्णालयात जमा झाले. गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीसांनी समुद्र किनार्‍यावर जाणारी वाहतूक काही काळ अडवली होती. या गर्दीचा बचावकार्यात अडथळा येत असला तरी प्रत्यक्ष बचावकार्य करणारे देखील नागरिकच असल्याने त्यांच्या भावनांची कदर करुन नियंत्रण मिळविणे पोलीसांसाठी आव्हान ठरले.

बोटचालक व खलाशांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा:

दरम्यान, बोटमालक महेंद्र गणपत अंभिरे व पार्थ धिरज अंभिरे व धिरज गणपत अंभिरे यांच्या विरुध्द डहाणू पोलिस स्टेशनमध्ये सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पार्थ व धिरज यांना अटक करण्यात आली असून महेंद्र यास रुग्णालयातून उपचार पूर्ण झाल्यानंतर अटक करण्यात येणार असल्याचे सुत्रांकडून समजते आहे.

 

Print Friendly, PDF & Email

comments