जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे 3 बळींची जबाबदारी कोण घेणार?

विशेष संपादकिय

जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे, डहाणूच्याfacebook_1506002192949 समुद्रकिनार्‍यावर प्रवासी वाहतूक करणारी बोट बुडून 3 महाविद्यालयीन विद्यार्थीनींचा बळी गेला. आपण सर्व बचाव कार्य जवळपास पूर्ण झाल्यानंतर सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास घटनास्थळी आलात. त्यावेळी आपण माध्यमांशी बोलताना ही मुले सहलीसाठी आली होती असे वक्तव्य केलेत. या बाबत तेथे उपस्थित माजी नगरसेवक तथा वकील धनंजय मेहेर यांनी आपणास ही मुले सहलीसाठी आली नसून जवळच्या कनिष्ठ महाविद्यालयातील असल्याचे सांगण्याचा प्रयत्न केला. यावर आपण रागावलात आणि उपस्थित पोलीसांना मेहेर यांना तातडीने अटक करण्याचे आदेश दिलेत. नशिबाने तुमचे आदेश पोलीसांनी ऐकले नाहीत किंवा तुम्ही अज्ञानातून हे आदेश दिल्याचे तुमच्या लक्षात आल्यानंतर तुम्ही माघार घेतली? याबाबत लोकांना खरे काय ते कळले पाहिजे. आपण जिल्हाधिकारी आहात म्हणजे आपणास अनिर्बंध अधिकार आहेत आणि आपण काहीही करु शकता अशी आपली धारणा असेल तर मग कठीणच आहे. आपण या आधीही डहाणू नगरपरिषदेच्या निवडणूकीमध्ये गोंधळ घातलात आणि निवडणूका लांबणीवर टाकायची नामुष्की निवडणूक आयोगावर ओढवली होती. आपल्या विरोधात बातम्या प्रसिद्ध झाल्यावर आपण वर्तमान पत्राची नोंदणी रद्द करण्याच्या वल्गना करीत कारवाईच्या धमक्या देता. या बाबतीत आपण आत्मपरीक्षण करणे गरजेचे ठरले आहे. आत्मपरीक्षण केल्याशिवाय तुमचा भ्रम दूर होणार नाही.

आपल्याला कळलेच असेल कि, अपघातग्रस्त बोटीची बंदर विभागाकडे कुठल्याही प्रकारची नोंदणी नव्हती. एप्रिल 2017 मध्ये ही बोट भावनगर येथून आणण्यात आली आणि त्यामध्ये प्रवासी वाहतूकीची व्यवस्था करण्यात आली. या बोटीने 8 जानेवारी पासून समुद्र सफारी सुरु केली. मात्र बंदर विभागासह तट रक्षक दलाच्या नजरेतून ही बोट सुटली कशी? याचे उत्तर आपण द्यायला हवे. आपण पालघर जिल्हा पर्यटनदृष्ट्या समृद्ध करण्याच्या वल्गना करीत असता. या विद्यार्थ्यांना वाटले असावे जिल्हाधिकार्‍यांच्या प्रयत्नातून डहाणूत पर्यटन विकास साधण्यासाठी हा प्रकार सुरु केला असेल. खुलेपणाने प्रवासी वाहतूक सुरु असताना त्यावर हे विद्यार्थी शंका तरी कसे घेणार? त्यांना 50 रुपये खर्चून समुद्र सफारी करावीशी वाटली तर तो अपराध केला का? तुमच्या नेतृत्वाखालील यंत्रणेवर विश्वास ठेवल्यामुळे जिवाची शिक्षा मिळेल हे त्यांना माहिती नसणार.
तुमच्या लक्षात येतेय का, जिल्हा प्रशासन प्रमुख म्हणून आपण या व्यवस्थेतील छेदाला जबाबदार आहत! हे तुमचे फेल्युअर आहे. तुम्ही हे फेल्युअर झटकण्यासाठी या प्रकरणी विद्यार्थ्यांच्या पालकांना जबाबदार ठरवणारे वक्तव्य केले. तरी काही प्रश्‍नांची उत्तरे तुम्हाला द्यावीच लागतील.
तुमच्या नेतृत्वाखाली जिल्हा आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा आहे. या यंत्रणेने नेमकी काय भूमिका निभावली ते जरा जाहीर करा. या बचावकार्यात स्थानिक मच्छीमार, नगरपालिका व अन्य शासकीय यंत्रणांची महत्वाची भूमिका होती. आपले प्रतिनिधी तहसीलदार आणि प्रांताधिकारी हे देखील घटनास्थळी त्वरित पोचले आणि तेथे ठिय्या देऊन उभे राहिले हे देखील खरे आहे. पोलीस प्रशासन तर खूपच तत्परतेने आणि जबाबदारीने वागले. आपण मार्गदर्शन केले असते किंवा नसते तरी हे बचावकार्य स्वयंस्फूर्तीने झालेच असते. प्रश्‍न जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाचा नेमका काय सहभाग होता याचे उत्तर नकारार्थी येते. सागरी सुरक्षेसाठी तैनात स्पीडबोटी कुठे होत्या? तट रक्षक दलाने नेमके किती मुलांना वाचवले? जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून एक मीटरभर दोरीचा तुकडा तरी पुरविण्यात आला का? काय साधन सामुग्री तुमच्याकडून पुरविण्यात आली? या प्रश्‍नांची उत्तरे द्यायची असल्यास तुम्हाला केवळ बोलबच्चन गिरी करुनच वेळ मारुन न्यावी लागेल. नेहमीच तुम्ही असे करु शकणार नाहीत. त्यापेक्षा जिल्ह्यामध्ये सुरक्षिततेच्या दृष्टीने सारे काही आलबेल नाही हे ध्यानात घ्या आणि स्वत: मध्ये आणि जिल्हा प्रशासनामध्ये सुधारणा घडवून आणा. तुम्ही काहीही करु शकता असा समज करुन घेणे लोकशाहीला मारकच आहे. ते तुमच्या देखील हिताचे नाही. सर्वच जण अंगावर आलेले खपवून घेत नाहीत हे ध्यानात घेतलेले बरे असे आम्ही या निमित्ताने पुन्हा एकदा तुम्हाला सुचवित आहोत.

Print Friendly, PDF & Email

comments