जेव्हा जेव्हा मराठी भाषा दिन जवळ येतो तेव्हा तेव्हा भाषेच्या अस्तित्वाचा प्रश्न मराठी मानसाच्या मनात उगवतो. मराठीच्या अस्तित्वाच्या काळजीचा हा हँहओव्हर फार काळ टिकून राहत नाही. मराठीच्या अस्तित्वाच्या प्रश्नाचा भाषिक अस्मितेच्या अंगाने अत्यंत वरवरचा, ढोबळ विचार करणारा पण संख्येने अधिक असलेला एक गट तर तिच्या अस्तित्वाचा, स्वरुपाचा अत्यंत गांर्भियाने चिंतन-मननाच्या अंगाने मूलभूत स्वरुपाचा विचार करणारा दुसरा गट. मराठीच्या अस्तित्वाच्या प्रश्नाचा विचार करताना तो प्रश्न भाषाभ्यासक, विचारवंत, संशोधन, शिक्षणतज्ञ त्यांच्याकडून म्हणजेच दुसर्या गटाकडून नेमकेपणाने समजून घ्यावा लागेल.
इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांनी मराठी भाषेचा मूलारंभ हा इ.स. 488 असा दिलेला आहे. म्हणजे 5 वे शतक हा मराठी भाषेचा आरंभकाळ मानला तर अंदाजे पंधराशे वर्षे मराठी भाषा बोलली जाते आहे. आणि 8 व्या शतकापासुन मराठी भाषेत लेखन होत आलेले आहे. (कुवलूयमाला या ग्रंथात मरहट्ट असा मराठी भाषेचा संदर्भ सापडतो) त्यापुर्वी मौखिक स्वरुपात रचले गेलेले वाङ्मयही अफाट आहे. पुढे 13 व्या शतकात मराठी भाषेत श्रेष्ठ प्रतीची ग्रंथरचना झालेली आहे. महानुभाव पंथाने मराठी भाषेचा धर्मभाषा म्हणून स्विकार केलेला दिसतो. भागवतधर्मीय वारकरी संतांनी आपली काव्यरचना मराठीतून केलेली आहे. दत्तसंप्रदाय, नागेश संप्रदाय, वीरशैव परंपरा यासारख्या संप्रदायांनी मराठी भाषेचाच अवलंब केलेला दिसतो. याच काळात यादव राजांनी मराठी भाषेला राजभाषा बनवली. पुढे छत्रपती शिवाजी महाराजांनीही त्यांच्या काळात मराठीला राजभाषेचे स्थान प्राप्त करुन दिले. बखरी, संस्कृत ग्रंथांची भाषांतरे यांच्याबरोबरच राजव्यवहारकोश, मराठी शब्दकोश अशा भाषाविषयक उपक्रमांचा आरंभ शिवशाहीत झालेला दिसतो. शिवाजी महाराजांचे भाषेच्या संदर्भातले मोठेपण हे की मराठी व्यवहार-भाषा अरबी-फार्सी यामध्ये जी दुदमरुन जाणार होती तो धोका शिवाजी महाराजांनी तिला राजभाषा केल्यामुळे टळला. पुढे इंग्रजी राजवटीतही मराठा संस्थानांमध्ये शासनाच्या आश्रयाने ग्रंथनिर्मिती झालेली आहे. थोडक्यात मराठी भाषेला हजारेक वर्षांची परंपरा आहे, असे आपल्याला यातून दिसुन येईल.
हजारेक वर्षांपासुन जी भाषा बोलली व लिहिली जात आहे ती पुढील काळात नष्ट होईल की काय अशी चिंता मराठी भाषेवर प्रेम असणारे, कळवळा असणारे, तिच्या बाबत नितांत आस्था असणारे भाषाभ्यासक विचारवंत करीत आहेत. तर काहीजण मराठी भाषा ही जोपर्यंत 7 कोटी लोकांच्या स्वाभाविक अभिव्यक्तीची भाषा आहे व भारतातील 6.99 टक्के जनता मराठी भाषक आहे किंवा भारतीय शासनाच्या सूचीतील प्रशासनिक भाषांपैकी मराठी ही भाषकसंख्येच्या दृष्टीने 4 थ्या स्थानावर आहे तोपर्यंत मराठी भाषेला मरण नाही, असा सूर आवळताहेत. भाषेच्या अस्तित्वाची काळजी करणार्या विचारवंतांच्या मते मराठी ही आजही महाराष्ट्राची राजभाषा असली किंवा लोकसंख्येच्या प्रमाणात मराठी भाषा बोलणार्यांची व लिहिणार्यांची संख्या वाढलेली असली तरी शिक्षण, प्रशासन, न्यायालयीन कामकाज, विज्ञान, तंत्रज्ञान, व्यापार, उद्योग इत्यादी क्षेत्रामध्ये मराठी भाषेचा वापर फारसा होत नाही. या क्षेत्रात मराठीच्या वापराबाबत जी उदासिनता दिसते व पर्यायाने तिच्या विकासाला खिळ घातली जातेय. त्यामुळे तिच्या भविष्यातील अस्तित्वाचा विचार अपरिहार्य ठरतो. म्हणजे भाषा ही आपोआप टिकत नाही तर ती टिकविण्याची गोष्ट असते. जगातल्या अनेक भाषा व उपभाषा नष्ट होत आहेत. यावरून तर ते सिध्दच होते. यासंदर्भात ज्येष्ठ भाषाभ्यासक गणेश देवी यांचे चिंतन आपण विचारात घेणे गरजेचे आहे. ते म्हणतात –
भाषा कधीही स्वतःहून मरत नाही, तर तिला मारले जाते. भाषेचे मरण हे एखाद्या पर्वतासारखे असते. एखादी म्हैस मरताना आपल्याला दिसते; परंतु पर्वत नामशेष होताना आपल्याला दिसत नाही. त्याचे छिन्न – विछिन्न झालेले दगड – गोटे, माती या माध्यमातून आपल्याला पर्वताचे मरण जाणवते. भाषा नामशेष होण्यासाठी अनेक वर्षे जावी लागतात. भाषा टिकण्यासाठी त्या भाषेतून होणारे आर्थिक, सामाजिक व्यवहार टिकायला हवेत. भाषेच्या अस्तित्वाचा विचार म्हणूननच महत्वाचा ठरतो.
मराठी भाषेला वाचवले पाहिजे अशी चिंता सर्व मराठी भाषकांना असलेली दिसते. अगोदर म्हटल्याप्रमाणे काहींना तसे पोटतिडकीने वाटते तर काहींना पब्लिसिटी स्टंट म्हणून वा मराठीच्या चूलीवर राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी ती तशी दाखवावी लागते. मराठी भाषेला कोणापासून धोका आहे की तिला वाचवण्याची गरज पडावी! काहींना हिंदी व इंग्रजी यांच्या आक्रमणापासून तिला धोका असल्याचे वाटते तर काहींना अरबी- फारसी यांच्या प्रभावाने भाषा शुद्ध करावीशी वाटते; तर काहींना संस्कृत भाषेच्या अतिरेकी प्रभावापासून तिचा बचाव करावासा वाटतो. खरं तर हे काही प्रमाणात सत्य असले तरी आजच्या तरुण पीढीच्या मनात असा मूलभूत प्रश्न येतो की मराठी भाषेला का वाचवायचे? जे काम इंग्रजी वा हिंदीच्या माध्यमातून होते ते मराठीतूनच व्हावे असा आग्रह का? मराठीतून आर्थिक, सामाजिक व्यवहार नाही झाला, मराठी माध्यमातून नाही शिकलो तर आपलं काय बिघडणार आहे? तरुण पीढीचा मातृभाषेकडे पाहण्याचा हा दृष्टीकोण वा मानसिकता निश्चित चिंता करायला लावणारी आहे. त्यामुळे भाषेचे – मातृभाषेचे आपल्या जगण्यातील स्थान व स्वरूप समजून घेणे काळाची गरज बनलेली आहे.
खरं तर भाषा म्हणजे काय ते आपण नीट समजून घेतलं पाहिजे. भाषा ही केवळ संपर्काचे साधन नाही. आपले विचार, भावना, कल्पना वा आपला हेतू दुसर्यापर्यंत पोहोचला, की भाषेचे कार्य संपले असे नव्हे; तर भाषा हे सांस्कृतिक आदानप्रदान करण्याचे माध्यम आहे. भाषेमध्ये संस्कृती प्रतिबिंबीत झालेली असते. भाषेशिवाय संस्कृती असूच शकत नाही. त्यामुळे मराठी संस्कृती वा मराठी कल्चर हे भाषेशिवाय अस्तित्वात असूच शकत नाही. मराठी रीतीरिवाज व सण – उत्सव, परंपरा, खाद्यसंस्कृती, मराठी पोशाखसंस्कृती ही भाषेतूनच मूर्त होऊ शकते. संस्कार वा मूल्ये रुजवण्यासाठी आपल्याला जी भाषा लागते ती मातृभाषे इतकी जवळची किंवा पेशीची भाषा दुसरी कोणती असूच शकत नाही. त्यामुळेच कदाचित भाषा निसटली की संस्कृती निसटते व संस्कृती निसटली की सभ्यता संपते आणि सभ्यता संपली की अनागोंदी माजते असे म्हटले जाते ते त्यामुळेच. मराठीतील ज्येष्ठ समाज- संस्कृती अभ्यासक डॉ. हरिश्चंद्र थोरात म्हणतात-
भाषा केवळ आविष्काराचे साधन नसते. भाषा हा समाजाच्या सांस्कृतिक पर्यावरणाचा महत्वाचा भाग असतो. त्याचे विशेष लहानपणापासून मातृभाषा बोलणार्या मुलाच्या अंगात मुरलेले असतात. मातृभाषेच्या माध्यमातून लहान मूल समाजाशी जोडले गेलेले असते. समाजांतर्गत व्यवहार मातृभाषेतून होणे ही सामाजिक जडणघडणीच्या व सामाजिक विकासाच्या दृष्टीने महत्त्वाची गोष्ट असते. (’मूल्यमापनाची सामग्री, मराठीचा प्रश्न)
वि. वि. शिरवाडकरांनी भाषेचे व समाजाचे असलेले हे एकजीव नाते विचारात घेतलले होते. म्हणूनच ते एका ठिकाणी म्हणतात भाषेचा उत्कर्ष म्हणजे समाजाचा उत्कर्ष आणि भाषेचा र्हास म्हणजे समाजाचा र्हास. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य शासनाने उच्च माध्यमिक पातळीवर मराठी भाषा विषयाला पर्याय म्हणून माहिती- तंत्रज्ञान हा विषय पर्याय म्हणून घेण्याची मुभा दिलेली आहे. त्यामुळे विद्यार्थी व त्यांच्या पालकांची मानसिकता विचारात घेता बहुसंख्य विद्यार्थी मराठी सोडून माहिती- तंत्रज्ञान विषयाला पसंती देतील त्यामुळे मराठी विषय घेणार्यांची संख्या रोडावेल हे सांगायला नको. उच्च माध्यमिक स्तरावरून मराठी विषय गेला की, पदवी महाविद्यालय व पुढे विद्यापीठीय स्तरावरून तो गायब होईल. अशी भीती व्यक्त केली जात आहे. आजचे वास्तव पाहता ही भीती खरी ठरू लागल्याचे दिसते आहे. कारण मुंबईसारख्या पदवी महाविद्यालयातील मराठी विभाग बंद पडू लागले आहेत. अनेक मराठीचे प्राध्यापक सरप्लस होऊ लागले आहेत. जी भाषा आजही कागदोपत्री राजभाषा आहे ती त्याच राज्यात डाऊन मार्केट म्हणून उपेक्षिली जात आहे. या दुरावस्थेला राज्यकर्ते शासन, प्रशासन जबाबदार तर आहेच पण त्याचबरोबर भाषेचा केवळ भावनिक पातळीवर विचार करणारे मराठी भाषिकही तितकेच जबाबदार आहेत. मराठी – माहिती तंत्रज्ञान वाद जेव्हा जोमात सुरु होता तेव्हा मराठीची बाजू घेणे म्हणजे बहुजन समाजाला अज्ञानाच्या अंध:कारात लोटण्याचे हे ब्राम्हणी षड्यंत्र आहे, असा युक्तीवाद केला गेला. पहिलीपासुन इंग्रजीला विरोध करणार्या तज्ञांचीही असाच युक्तीवाद करुन मुस्कटदाबी करण्यात आली होती. आपल्या राजकीय स्वार्थासाठी राजकारणी लोकांच्या अस्मिता कुरवाळत भाषेसंदर्भातला गंभीर व भल्याचा विचार कसा मारुन टाकतात हे आपल्याला यातुन सहज ध्यानात येईल. भाषेसंदर्भातल्या या गंभीर विचारांबाबत मराठी भाषिकांत असलेली अनास्था हे भाषेच्या दुरावस्थेचे एक कारण आहे.
माहिती-तंत्रज्ञान व मराठी भाषा यांचा तुलनात्मक विचार करता माहिती-तंत्रज्ञान हा विषय मराठी भाषा विषयाला पर्याय ठरुच शकत नाही. कारण तंत्रज्ञान हे एक माहिती मिळविण्याचे तांत्रिक साधन आहे. मातृभाषा ही मुल्य, संस्कार, सभ्यता शिकवणारे, ज्ञाननिर्मिती करणारे व तिचे वहन करणारे एक माध्यम आहे. माहिती-तंत्रज्ञान हे आजच्या काळात उपयुक्त आहेच परंतू ते भाषेला पर्याय असू शकत नाही. संस्कार, सभ्यता व मुल्ये आपण ऑप्शनला टाकू शकत नाही. खरे तर मराठीला एखादा विषय पर्याय देण्याऐवजी मराठी भाषा विषय पदवी स्तरावरील वाणिज्य, विज्ञान, अभियांत्रिकी, वैद्यकिय यासारख्या स्तरांवरही विवेकी व अभिरुचीसंपन्न समाज घडवण्यासाठी लावायला हवा.
शिक्षणाचे माध्यम म्हणूनही आपला मातृभाषा टाळण्याकडे कल असलेला दिसतो. खेड्यापाड्यापासुन शहरी भागांपर्यंत इंग्रजी माध्यमाच्या शाळांचे जे पिक आले आहे त्यावरुन तर हे खात्रीने म्हणता येते. खरं तर कोणत्याही विषयाचे आकलन हे आपल्याला मातृभाषेतूनच चांगल्या पद्धतीने होत असते. याला मानसशास्त्राचाही आधार आहे. मानसशास्त्र म्हणतं की मानवी मेंदु हा दोन टप्प्यात विकसित होत असतो. पहिल्या टप्प्यात आईच्या गर्भाशयात तर दुसरा टप्पा हा मुल जन्मल्यापासुन ते 6 वर्षांचे होईपर्यंतचा असतो. दुसर्या टप्प्यापर्यंत मेंदुची वाढ व विकास 90 टक्के पुर्ण झालेला असतो. त्यानंतर एक छोटासा तिसरा टप्पा म्हणजे 7 ते 13 वर्षे वयाचा. या काळात उरलेला 10 टक्के विकास व वाढ अभिप्रेत असते. मेंदुच्या वाढीचे टप्पे सांगण्यामागचे कारण हे की शिक्षण, ज्ञान या गोष्टींचा संबंध आपण मेंदुशी जोडतो. या काळात मुल आपल्या आईच्या सहवासात अधिक काळ असते. त्यामुळे आई जी भाषा बोलते तिच भाषा मुल आत्मसात करते व बोलू लागते. त्यामुळे आईची भाषा ती मातृभाषा असे आपण म्हणतो. याच मातृभाषेतून मुलाची विचारप्रक्रिया विकसित व्हायला लागते.
ज्या भाषेतून मेंदूत विचारप्रक्रिया विकसीत झालेली असते ती भाषा सहाजिकच शिक्षणाचे माध्यम ठेवल्यास विज्ञान, अर्थशास्त्र, इतिहास, राज्यशास्त्र, भूगोल, मानसशास्त्र यासारखे सर्वच विषय त्याला मातृभाषेतून समजून घेणे सोपे जाईल. शिक्षणाचे माध्यम मातृभाषा हवे ते यासाठीच. इंग्रजी ही ज्यांची मातृभाषा नाही त्यांना इंग्रजी माध्यमातून शिकवणे म्हणजे त्या मुलावर अन्याय करण्यासारखे वा त्याच्या मेंदूवर ताण टाकण्यासारखेच आहे. त्यामुळे ज्यांचे मातृभाषेचे ज्ञान सखोल, त्याची इतर भाषेतील प्रगती व इतर विषयातील प्रगती चांगली होते शिवाय मातृभाषा ही पेशीची भाषा असल्यामुळे सर्जनशीलताही मातृभाषेतच अधिक फुलताना दिसते. विद्यार्थ्यांचा बौद्धिक, भावनिक, सामाजिक विकास व्हायचा असेल तर त्याला मराठी या त्याच्या भाषेतूनच शिकवले पाहिजे. इंग्रजी ही जागतिक संपर्क भाषा आहे. ती शिकायलाच पाहिजे. ती शिकली नाही तर आपले नुकसानच होईल. कारण जगातले ज्ञान त्याच भाषेत अधिक आहे. शिवाय हा ज्ञान व्यवहार होण्यासाठी ती लिंक लँग्वेज म्हणून काम करते त्यामुळे ती आत्मसात करायला हवीच. परंतु इंग्रजी भाषा शिकणे व इंग्रजीमधून शिकणे या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. त्याचे भान आपण ठेवले पाहिजे. त्यामुळे इंग्रजी आले पाहिजे. पण त्यासाठी इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेण्याची गरज नाही. डॉ. मॅक्सिन बर्नसन या अमेरिकी शिक्षणतज्ज्ञ असलेल्या व इंग्रजी त्या तिच्या मातृभाषेतून शिकलेल्या विदुषी स्वतः ग्रामीण भागातील मुलांना मराठी भाषा हा विषय शिकवतात. त्या स्वतः इंग्रजी स्पेशल विषय घेऊन अमेरिकेन विद्यापीठाच्या एम. ए. झालेल्या आहेत. त्या इंग्रजी माध्यमातून आपल्या पाल्यांना शिक्षण देणार्या पालकांना एके ठिकाणी उद्देशून म्हणतात…
महाराष्ट्रातील मध्यमवर्ग गोंधळलेला व स्वतः हरवलेला स्वार्थ शोधत आहे. मुलांचे हित त्यांना कळत नाही. इंग्रजी शिकवल्यांचा सामाजासाठी कितपत उपयोग होईल याची शंका आहे. मातृभाषे ऐवजी इंग्रजीमध्ये शिकणार्याचे वैयक्तिक नुकसान होते. व समाजाचेही नुकसान होते. या मुलांची बौद्धिक पातळीवरही प्रगती होताना दिसत नाही.
हे सर्व पाहता मराठी भाषा आपण का टिकवायची वा का तिच्यातून व्यवहार करायचा. वा का तिचा मातृभाषा म्हणून स्वीकार करायचा याची काही प्रमाणात उत्तरे मिळू शकतील.
प्रा. प्रदिप पाटील
न्यू इंग्लिश ज्युनियर कॉलेज, वसई