घरच्या भाषेतून का शिकायचे ? -नीलेश निमकर, शिक्षणतज्ज्ञ

0
2842

मराठी माध्यमात शिकणाऱ्या मुलांची घटती संख्या हे शिक्षण व्यवस्थेत काम करणाऱ्या प्रत्येकाचा चिंतेचा विषय झाला आहे. गेल्या काही वर्षांत ग्रामीण भागात इंग्रजी माध्यमाच्या शाळांची वाढ झपाट्याने होते आहे. या शाळानी मराठी माध्यमाच्या शाळांपुढे मोठेच आव्हान उभे केले आहे. टाय बूट असणारा गणवेश, जायला यायला स्कूल बस सारख्या सोयी, शाळेत साजरे केले जाणारे विविध दिवस अशा अनेक क्लुप्त्या वापरून या शाळा विद्यार्थ्यांना त्यांच्याकड आकर्षित करायचा प्रयत्न करताना सातत्याने करताना दिसतात. पालकही सरकारी शाळांत मिळणारे मोफत शिक्षण टाळून या खाजगी शाळांकडे मोठ्याप्रमाणावर वळलेले दिसतात. आपल्या उत्पन्नाचा मोठा हिस्सा खर्च करून मुलांना इंग्रजी शाळांत घालण्याची गरज पालकांना का वाटते आहे याचा विचार केला तर एक बाब स्पष्ट दिसून येते. इंग्रजी भाषा आजतरी समाजातील सत्ताधारी, श्रीमंत वर्गाची भाषा आहे. ती आली नाही तर प्रगतीचे मार्ग खुंटतात असा कटु पण सत्य असणारा अनुभव पालकांनी घेतलेला असतो आणि त्यातून निर्माण झालेल्या चिंतेतून ते इंग्रजी माध्यामाकडे वळतात. आमचे इंग्रजीवाचून अडले. आता निदान मुलांचे तरी अडायला नको अशी कळकळ या निर्णयामागे असते. आधुनिक काळात प्रगती साधायची तर इंग्रजी चांगली यायला हवी यात फारसे कोणाचे  दुमत असण्याची शक्यता नाही. मात्र चांगली इंग्रजी येण्याचा मार्ग पहिली पासून सारे काही इंग्रजीत शिकणे हा आहे का याचा विचार करायला हवा.
प्राथमिक शाळेत जेव्हा मूल येते तेव्हा त्याने लेखन वाचन शिकण्याची अपेक्षा असते. लेखी भाषा हे तोंडी भाषेचेच एक रूप असते आपण जे बोलतो ते लिहून ठेवता येते आणि लिहिलेले परत वाचता येते हा लेखन-वाचनाचा उपयोग कळला म्हणजे मुलांचा लिपीवर प्रभुत्त्व मिळवण्याचा प्रयत्न एकदम सार्थक होतो. थेट इंग्रजी माध्यमात पहिलीच्या वर्गात शिकणाऱ्या बहुसंख्य मुलांना इंग्रजीतून बोलता येत नाही. ही मुले जेव्ही इंग्रजीची लिपी शिकू लागतात तेव्हा ती वापरून मनातील कोणती ही कल्पना, विचार ते कागदावर उमटवू शकत नाहीत. कारण कल्पना विचार मराठीतून चालू असतात आणि लिपी मात्र इंग्रजीची शिकत असतात. या मुळे अनेक मुले सात आठ वर्षे शाळेत राहून ही त्यांना स्वतःचे असे फारसे लिहिता येत नाही. जे लेखना बाबत सत्य आहे तेच वाचनाला ही लागू पडते. इंग्रजची लिपी आल्यानंतरही मुले स्वतंत्रपणे फारशी वाचू शकत नाहीत.कारण वाचलेले समजण्या इतकी इंग्रजीच त्यांना येत  नसते. परिणामतः या मुलांचे वाचनही अगदी मर्यादित व कामचलाऊ स्वरूपाचे राहते. स्वतंत्रपणे पुस्तक वाचून समजून घेण्याचा आनंद ही मुले दीर्घकाळ घेऊ शकत नाहीत. थोडक्यात जी भाषा बोलताच येत नाही त्यात सारे प्राथमिक शिक्षण घ्या असे म्हणणे शिक्षणशास्त्राला धरून नाही.
ग्रामीण भागात चालवण्यात येणाऱ्या इंग्रजी माध्यमाच्या शाळा खऱ्या अर्थाने इंग्रजी माध्यामाच्या आहेत काय याचा ही विचार व्हायला हवा. या शाळांत शिकवणाऱ्या अनेक शिक्षकांचे इंग्रजीवर म्हणावे असे प्रभुत्त्व नसते. त्यामुळे शिकण्या शिकवण्यासाठी मराठीचा आधार घेतला जाणे हे स्वाभाविकच असते. कारण जी भाषा मुलांना, त्यांच्या पालकांना इतकेच काय तर त्यांना शिकवणाऱ्या शिक्षकांनाही चांगली अवगत नाही अशा भाषेतून शिक्षण व्यवहार करणे कमालीचे अवघड आहे. त्या मुळे शिक्षण किमानतेच्या पातळीवर येते. परीक्षेत जे येणार आहे ते पाठ करून ठेवा व लिहा ही ती किमान पातळी. इंग्रजी शाळेत गणित शिकवणाऱ्या शिक्षकांना एक अनुभव नेहमी येतो. मुलांना बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार येत असला  तरी त्यांना शाब्दिक उदाहरणे सोडवताना नेमकी कोणती क्रीया करावी हे उमगत नाही. याचे कारण उघड आहे. मुलांना एकतर शाब्दिक उदाहरण वाचता येत नाही किंवा वाचले तर त्यात काय लिहिले आहे हे समजत नाही. अशावेळी शिक्षक मुलांना काही अत्यंत अशैक्षणिक क्लुप्त्या देतात. More शब्द आल तर बेरीज कर less शब्द दिसला तर वजाबाकी कर अशा स्वरूपाच्या या क्लुप्त्या असतात. पण त्या वापरून गणित सोडवणारी मुले समजून उमजून गणित सोडवत नसतात हे उघड आहे. Meena has 5 mangos and Raju has 3 mangoes. How many more mangoes does Meena have than Raju.  असा प्रश्न आला तर मुले प्रश्नातील more हा शब्द पाहून ५ व ३ ची बेरीज करून मोकळी होतात. एकूणच स्वतःच्या भाषेत शिकायला मिळाले नाही तर शिक्षण कसे आंधळेपणाचे होते हे यावरून कळावे.
ज्या आदिवसी मुलांची घरची भाषा मराठी नाही त्यांनी मराठी माध्यम निवडण्यापेक्षा इंग्रजी निवडले तर निदान भविष्यात मराठीतून इंग्रजीकडे जाण्याचा त्रास तरी वाचेल असा एक मुद्दा मांडला जातो. तो बराच पटण्यासारखा असला तरी त्यात एक अडचण आहे. इंग्रजी माध्यमाची शाळा चालवायला निदान शिक्षक तरी चांगली  इंग्रजी येणारे लागतील. आदिवासी भागात राहून काम करायला तयार असणारे आणि चांगले इंग्रजी जाणणारे शिक्षक इतक्या मोठ्या प्रमाणावर उपलब्ध कसे करायचे? शिवाय भाषा ही सामाजिक बाब आहे. ती परिसरात वापरली जायला हवी मुलांच्या कानावर ती शाळेबाहेर थोडी तरी पडायला हवी. हे मान्य केले तर मुलांच्या कानावर घरच्या भाषेव्यतिरिक्त इंग्रजीपेक्षा मराठी पडण्याची शक्यता जास्त आहे. शिवाय काही आदिवासी भाषा मराठीला जवळच्या असल्याने मराठी अवगत करणे इंग्रजी पेक्षा मुलांना जास्त सोयीचे आहे. त्या मुळे अशा मुलांना आज तरी घरच्या भाषेतून मराठी कडे व मराठीतून इंग्रजीकडे जाण्याशिवाय पर्याय दिसत नाही.
इंग्रजी माध्यमाच्या शाळांच्या स्पर्धेला तोंड देता यावे म्हणून पहिली पासून  सेमी इंग्रजी नावाचा पर्याय मराठी शाळांना शोधून काढला आहे. या शाळांत गणित व विज्ञान हे दोन विषय इंग्रजीतून तर इतर विषय मराठीतून शिकायचे अशी व्यवस्था असते. सेमी इंग्रजी या ऐवजी सेमी जर्मन किंवा सेमी इटालीयन असे कोणते हे शब्द वापरून या कल्पनेचा विचार केला तर ती किती अव्यवहार्य आहे, याचा अंदाज लगेचच येईल. खरे तर प्राथमिक स्तरावरील मराठी शाळांत द्वितीय भाषा म्हणून  उत्तम इंग्रजी कसे शिकवता येईल याचा विचार व्हायला हवा. सारे काही इंग्रजीतूनच शिकणे आणि चांगली इंग्रजी शिकणे या दोन पर्यांयातील अधिक व्यवहार्य काय याचा विचार केल्याशिवाय प्राथमिक शिक्षणाचे माध्यम काय असावे या प्रश्नाचे योग्य उत्तर मिळणार नाही.

Print Friendly, PDF & Email

comments