अदिवासी विकास मंत्रीजी, विकासाचे असे मॉडेल स्विकारा!

विशेष संपादकीय

facebook_1506002192949पालघर जिल्हा निर्माण होऊन, केंद्रात पंतप्रधानपदी नरेंद्र मोदीजी बसून, राज्यात मुख्यमंत्रीपदावर देवेंद्र फडणवीसजी विराजमान होऊन आणि पालघर जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची धुरा आपल्या हाती येऊन 3 वर्ष पूर्ण झाली आहेत. आता 2 वर्षांपेक्षा कमी सत्ताकाळ उरला आहे. त्यानंतर पुन्हा निवडणूका येणार आहेत. मोदी लहर आजही टिकून असल्याचे संकेत मिळत असले तरी तुम्हाला तुमच्या कामाच्या जोरावर येत्या निवडणूकीत मते मागता आली तर उत्तमच आहे.
आपण कामे केली नाहीत असे आम्हाला म्हणायचे नाही. पालघर जिल्हा विकासाच्या दिशेने वाटचाल करतो आहे हे कोणी नाकारु शकत नाही. प्रश्‍न इतकाच आहे कि, आपण आदिवासी विकास मंत्री आहात. आणि आदिवासी बहुल पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री आहात. यामुळे आपल्याकडून लोकांना अधिक अपेक्षा आहेत. त्यातही आपण अखंड ठाणे जिल्ह्याचे ठाणे आणि पालघर असे जिल्हा विभाजन होण्यास कारणीभूत ठरलेल्या, कुपोषण आणि बालमृत्यूमुळे कायम चर्चेत राहीलेल्या जव्हार-मोखाडा सारख्या आदिवासी आणि दुर्गम भागाचा समावेश असलेल्या विक्रमगड मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत आहात. असे असताना आपण मोखाडा आणि विक्रमगड नगरपंचायती आणि आता जव्हार नगरपालिका व त्याचवेळी वाडा नगरपंचायत गमावता आहात. या पराभवाची आपणाला कारणीमिमांसा करावी लागणार आहे.
आम्हाला अलिकडेच आपल्या मतदारसंघातील जव्हार तालुक्यातील बोर्‍हाळा गावातील बोरीचा घोडा येथे जाण्याचा योग आला. तेथील यशोगाथा पाहून आमचा उर भरुन आला. आम्ही मनोमन आपल्यावर खूष झालो. असेच काम चालू राहीले तर जव्हार/मोखाड्याचा शास्वत विकास झाल्याशिवाय रहाणार नाही याची आम्हाला मनोमन खात्री पटली. अधिक तपशिलात गेल्यानंतर मात्र या सफलतेमध्ये लाल फितीतल्या योजनांचा सहभाग शुन्य असल्याचे समजले. कुठल्याही शासकीय योजनांचा लाभ न मिळता बोरीचा घाट विकसीत झाला आहे हे कळले. आणि मग आपल्या विभागाविषयी भ्रमनिरास झाला. विकासाचे हे मॉडेल आदिवासी विकास विभागाच्या योजनांच्या चौकटीत बसणारे नव्हते. पण लाल फितीतले विकासाचे मॉडेल वापरुन जर प्रश्‍न सुटत नसतील तर यशस्वी झालेले विकासाचे मॉडेल पाहून त्याप्रमाणे योजना तयार करण्याबाबत शासनाला विचार करायला काय हरकत काय?
या आदिवासी पाड्यावर सौर उर्जेवर चालणार्‍या मोटारपंपाद्वारे पाणी पुरवठा होतो. येथे सार्वजनिक नळाला फिल्टर बसविण्यात आलेले आहे. येथील सर्व 36 घरे सामुहीक शेती करतात. सर्वांच्या हाताला काम मिळालेले आहे. यामुळे पोटापाण्यासाठी होणारे स्थलांतर शून्य टक्क्यांवर आले आहे. अर्थातच स्थलांतर होत नसल्यामुळे त्यासोबत उद्भवणार्‍या अनेक समस्यांचे देखील निराकारण झाले आहे. हे सर्व एकाच दिवसात झाले नाही. त्यासाठी या लोकांनी 2 किलोमीटर अंतरावरील नदीतून पाणी आणून ठिबकसिंचन पद्धतीने 150 मिटर उंचीवरील 28 एकर जमिन ओलीताखाली आणली. पाण्याची बचत करुन विकास साधला. आज या गावातून नवी मुंबई असो की दिल्ली, दूरदूरवर भाजीपाला पोचतो. त्यासाठी स्वत:ची वाहन व्यवस्था आहे. यासाठी एकीचे बळ दाखवत या लोकांनी 25 लाख रुपयांचे कर्ज घेतले आणि त्यातील 10 लाख रुपये 2 वर्षांत फेडले देखील. शासनाचा एकही रुपया अनुदानाशिवाय हे शक्य झाले आहे.
हे सर्व शक्य झाले त्याचे कारण एकच घडले. प्रगती प्रतिष्ठानच्या सुनंदाताई पटवर्धन यांच्या दृष्टीक्षेपात हा पाडा आणि त्यांतील लोकांची मेहनत व तळमळ आली. यातून या लोकांची प्रगती झाली. सुनंदाताईंनी विविध सेवाभावी संस्थांच्या माध्यमातून या लोकांना योग्य मार्ग दाखवला. सुनंदाताईंच्या मार्गावर चालून बोरीचा घोडा समृद्ध झाला. सरकारने देखील सुनंदाताईंच्या मार्गावरुन जायला काय हरकत आहे? असे एखादे विकासाचे मॉडेल स्विकारायला काय हरकत आहे. टेबलवर बसुन तयार केलेल्या मॉडेलपेक्षा खाचखळग्यांतून वणवण करणार्‍यांनी यशस्वी केलेल्या मॉडेलमधून जव्हार मोखाड्याचा विकास साधू शकेल. आणि मग आदिवासी विकास मंत्र्यांच्या मतदारसंघाचे विकासाचे यशस्वी मॉडेल राबवून संपूण आदिवासी भाग समृद्ध व्हायला वेळ लागणार नाही.

 

 

Print Friendly, PDF & Email

comments