आपले डहाणू शहर स्वच्छ, सुंदर आणि स्मार्ट बनवू! -संतोष शेट्टी

Santosh_Shettyडहाणू शहर स्वच्छ, सुंदर आणि स्मार्ट बनवायचे असेल तर त्याच त्याच लोकांना निवडून देण्याच्या मनस्थितीत जनता नाही. लोकांना परिवर्तन हवे आहे. हे परिवर्तन सर्व 25 जागांवर उमेदवार उभे करु शकणारी शिवसेनाच घडवून आणू शकते. त्यासाठी शहराला सक्षम नेतृत्व देऊ असा विश्‍वास डहाणू नगरपरिषदेच्या निवडणूकीतील शिवसेनेचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार संतोष शेट्टी यांनी दैनिक राजतंत्रचे संपादक संजीव जोशी यांच्याशी बोलताना व्यक्त केला. शेट्टी हे इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअर असून उच्च शिक्षित उमेदवारांमध्ये त्यांची गणना होते. त्यांनी डहाणू शहराविषयी व्यक्त केलेली मते त्यांच्याच शब्दात!

तुम्ही शिवसेनेत कसे आलात?
शिवसेनेने मुंबई आणि ठाणे शहराचा ज्या पद्धतीने विकास केला तो मी पाहिलेला आहे. या कार्यापासून मी प्रभावीत होतो. ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे साहेब, आमदार रविंद्र फाटकसाहेब यांच्याशी माझा परिचय होता. शिवसेनेत जी शिस्त आहे ती मला भावली. येथे तुमच्या समस्यांचे निराकरण नगरसेवकाने केले नाही तर तुम्ही नगराध्यक्ष, आमदार, जिल्हा प्रमुख, मंत्री, पक्षप्रमुख यांच्यापर्यंत क्रमाक्रमाने पोहोचू शकता. अशी शिस्त अन्य पक्षात नाही. शिस्तीमुळे निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींना मनमानी करता येत नाही. यामुळे डहाणू शहराचा विकास साधायचा असेल तर शिवसेनेला पर्याय नाही हे ओळखून मी शिवसेनेच्या माध्यमातून राजकिय प्रवास सुरु करायचा निर्णय घेतला.
शिवसेनेचे स्थानिक कार्यकर्ते तुम्हाला स्विकारतील का? तुमचे सुर त्यांच्याशी जुळले का?
मी काही वरुन लादलेला उमेदवार नाही. स्थानिक कार्यकर्त्यांनीच प्रथम मला मान्य केले व त्यांच्या भावनांचा आदर राखून मला पक्षाने उमेदवारी दिली. त्यामुळे सुर जुळण्याचा प्रश्‍न उद्भवतच नाही. सुर जुळलेत, आम्ही एक आहोत. म्हणूनच मी या निवडणूकीत नगराध्यक्षपदासाठी उभा आहे.
तुम्ही या क्षेत्रात नवीन आहात. तुम्हाला ही जबाबदारी झेपेल का?
मी राजकारणात नवीन असलो तरी, 30 वर्षांपासून समाजकारणात सक्रीय आहे. अनेक सामाजिक संस्थांच्या माध्यमातून मी समाजकार्य केलेले आहे. महाराष्ट्र अ‍ॅन्टी करप्शन इंटेलिजन्स कमिटीचा उपाध्यक्ष, अ‍ॅन्टी टेररिस्ट फ्रंटचा ठाणे जिल्हा अध्यक्ष या पदांच्या जबाबदार्‍या पार पाडल्या आहेत. डहाणू शहरात मॅरेथॉन स्पर्धा आयोजित केल्या आहेत. या स्पर्धैत जगप्रसिद्ध ऑलिंपिकपटू सुवर्ण कन्या पी. टी. उषा यांनी हजेरी लावली होती. महालिंगेश्‍वर एज्युकेशन ट्रस्टच्या माध्यमातून वाणिज्य, व्यवस्थापन महाविद्यालय व पॉलिटेक्नीक उभारण्यासाठी प्रयत्नशील आहे, सोसायटी फॉर फास्ट जस्टीस या संस्थेचा मी संस्थापक अध्यक्ष असून या माध्यमातून अनेक प्रश्‍न यशस्वीपणे हाताळलेले आहेत. पावसाळ्यात इराणी रोडवरील परिसर पाण्याखाली जातो. या समस्येविरोधात आम्ही नॅशनल ग्रिन ट्रिब्युनलकडे याचिका केली आहे. शिवसेना देखील 80 टक्के समाजकारण आणि केवळ 20 टक्के राजकारण करणारा पक्ष असल्यामुळे सामाजिक कार्याच्या अनुभवाच्या जोरावर मी ही जबाबदारी प्रभावीपणे पार पाडेन.
तुमची लढत कोणाशी आहे?
या निवडणूकीत सर्व जागांवर निवडणूक लढविणारे आमच्यासह केवळ 3 पक्ष आहेत. यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कारभार डहाणूकरांनी पाहिला आहे. त्यांना लोक कंटाळले आहेत. दुसरा पक्ष भारतीय जनता पक्ष केवळ हवेवर निवडणूक लढवित आहे. त्यांच्याकडे कर्तृत्व काही नाही. उलट भ्रष्ट्राचारी लोकांना गोळा करुन हा पक्ष निवडणूकीला सामोरे जात आहे. एकंदरीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपा या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. यामुळे आम्ही लोकांची प्रथम पसंती आहोत. दुसर्‍या क्रमांकासाठी अन्य दोन पक्षांची परस्परात लढत आहे.
डहाणू शहरासाठी तुम्ही काय करणार?
डहाणू शहरातून लोकांना शिक्षण व रोजगारासाठी बाहेर जावे लागते. यासाठी शहरात चांगल्या शैक्षणिक संस्थांना प्रोत्साहन द्यावे लागेल. पर्यटन विकासाच्या दृष्टीने योजना विकसीत करुन स्थानिकांना रोजगार उपलब्ध करुन देऊ. डहाणू शहराचा विकास आराखडा मंजूर होत नसल्यामुळे महत्वाची विकासकामे रखडली आहेत. हा विकास आराखडा शिवसेनेच्या माध्यमातून मंजूर करुन घेऊ. शहरातील विकासकामांसाठी ज्या प्रभागातील काम असेल त्या प्रभागातील कंत्राटदाराला प्राधान्य देऊ. म्हणजे स्थानिकांना रोजगार देखील मिळेल आणि स्वत:च्या प्रभागातील कामे उत्तम दर्जाची होतील.
शिवसेनेला लोक का निवडून देतील?
एकतर शिवसेना कसा विकास करते ते लोकांना माहित आहे. महाराष्ट्रात शिवसेना आपल्या कामाच्या जोरावर ओळखली जाते. शिवसेनेने एमबीए केलेले, उच्च शिक्षीत नवे चेहरे, अनुभवी चेहरे आणि परिवर्तनासाठी सतत झटणारे नरेंद्र पटेल यांच्यासारखे ज्येष्ठ चेहरे निवडणूकीत उतरविले आहेत. पटेल यांनी जनता बँकेत परिवर्तन होईपर्यंत दिलेला लढा सर्वांना माहित आहेच. परिपूर्ण अशी शिवसेनेची टिम खर्‍या अर्थाने डहाणू शहराचा सर्वागिण विकास साधू शकते याची जनतेला खात्री आहे. नगरसेवकांना आम्ही शिवसेनेच्या अनुभवी नेत्यांकडून प्रशिक्षित करुन घेऊ. आम्ही डहाणू नगरपरिषदेचा कारभार पारदर्शी बनवू. नगरसेवकांच्या नातेवाईकांना कंत्राटे घेऊ देणार नाही. विकासकामांची गुणवत्ता तपासली जाईल. काँक्रीटवर डांबर आणि डांबरावर पुन्हा काँक्रीट असे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत.
डहाणू शहराच्या कुठल्या प्रमुख समस्या तुम्ही प्राधान्यक्रमाने सोडविणार?
सर्वात महत्वाचा प्रश्‍न सांडपाण्यावर आधुनिक पद्धतीने प्रक्रीया करणारा सिवरेज ट्रिटमेंट प्लांट उभारु. याशिवाय नागरिकांना 24 तास स्वच्छ व मुबलक पाणी देण्याचा प्रयत्न करु. सर्व प्रमुख ठिकाणी बस थांबे व ई टॉयलेट्स उभारु. रस्ते खड्डेमुक्त करु. वाचनालय सुविधा उपलब्ध करण्याबरोबरच स्पर्धात्मक परिक्षांसाठी मार्गदर्शन केंद्रे उभारु. शहराच्या सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे व डिजीटल इंडीयासाठी मोफत वाय फाय सुविधा उपलब्ध करु. अनेक वर्षांपासून प्रलंबीत असा डंपींग ग्राऊंडचा प्रश्‍न मार्गी लावण्याचा निर्धार केला आहे. महिला बचत गट व महिला सक्षमीकरणासाठी विविध योजना सक्षमपणे राबवू. मोफत 24 तास रुग्णवाहिका आणि रक्तपेढी, अल्प दरात डायलिसिस सुविधा, शिवसेनेच्या माध्यमातून शिव आरोग्य सेवा उपलब्ध करु. विद्यार्थ्यांसाठी नगरपालिकेची सेमी इंग्रजी शाळा काढून मोफत शिक्षणाची व्यवस्था करण्याचा मानस आहे. आज डहाणू शहरातील शाळांची अवस्था बिकट आहे. वर्गांत विद्यार्थी कोंबलेले असतात. यासाठी नगरपालिकेने शाळा काढल्यास खर्‍या अर्थाने शिक्षणाचा हक्क देण्यात आम्ही यशस्वी होऊ. डहाणूमध्ये क्रिडांगण उभारु व कला आणि क्रिडा स्पर्धांचे भव्य आयोजन करु. सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी नाट्यगृह, विविध कार्यक्रमांसाठी भव्य सभागृह बांधू.
अन्य पक्षांची अशीच आश्‍वासने आहेत.
त्या पक्षांचे आमदार आणि खासदार असताना त्यांनी विकास केला नाही. ते आता विकासाची आश्‍वासने देत असले तरी लोकांचा त्यावर विश्‍वास बसणार नाही. आणि शिवाय ते आश्‍वासाने देतात. शिवसेना मात्र वचन देते. डहाणू नगरपरिषदेकडे मागील 5 वर्षांत जवळपास 175 कोटी रुपये आले. इतक्या रुपयांत डहाणू शहराचा कायापालट झाला असता. तसा तो झालेला नाही. हे जितके खरे आहे तितकेच विरोधी पक्षाने देखील निट व जबाबदारीने काम केले नाही हेही खरे आहे. जनता आता भूल थापांना बळी पडणार नाही.

Print Friendly, PDF & Email

comments