जिल्हाधिकारी नारनवरे, तुम्ही लोकशाहीचे नुकसान केलेत!

विशेष संपादकीय 

डहाणू नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणूकीत निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहाय्यक जिल्हाधिकारी आंचल गोयल या जबाबदारी सांभाळत आहेत. त्या अननुभवी आहेत. यामुळे त्यांच्याकडून चुका होऊ शकतात हे खरे आहे. त्यांच्या प्रशासकिय कारकीर्दीतील ही पहिलीच निवडणूक आहे. त्यांच्यावर आदिवासी प्रकल्प अधिकारी व उप विभागीय अधिकारी या पदांची जबाबदारी आहे. यामुळे त्यांच्यात अधिकारीपदांची हवा असण्याचे देखील समजू शकतो. त्यातही निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जबाबदारी पार पाडताना त्यांना facebook_1506002192949निवडणूक यंत्रणेची कवचकुंडले प्राप्त झालेली आहेत. ही कवचकुंडले निवडणूका निर्भय आणि तटस्थपणे पार पाडण्यासाठी आहेत यांचे भान मात्र निवडणूक अधिकार्‍यांना असले पाहिजे. हे भान नसेल तर तशी जाणीव देण्याचे काम आपण जिल्हाधिकारी म्हणून केले पाहिजे. मात्र आपण हे कामपणे चोख पार पाडलेले नसल्यामुळे लोकशाहीचे नुकसान झाले आहे.
1 जून 1992 रोजी 74 व्या घटना दुरुस्तीद्वारे नगरपालिकांना भारतीय राज्यघटनेने घटनात्मक स्थान दिले. त्याला काही दिवसांत 25 वर्षे पुर्ण होत आहेत. यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांना लोकशाही व्यवस्थेमध्ये सहभागी होता येते. डहाणू नगरपरिषदेच्या निवडणूकांमध्ये पहिल्यांदाच ऑनलाईन पद्धतीने उमेदवारी अर्ज भरावयाचे असल्याने लोकांना अडचणी आल्या. डहाणूच्या निवडणूक निर्णय अधिकारी गोयल यांनी या अडचणींवर मात करण्यासाठी प्रयत्न केले नाहीत. पुरेशी जनजागृती नाही. लोकांना मदतीसाठी केंद्रे देखील सुरु करण्यात आली नाहीत. गोयल यांच्या बाजूला असलेल्या कॉम्प्युटर व प्रिंटर आणि ऑपरेटर या व्यवस्थेला ते मदत केंद्र म्हणत असले तरी तेथे सर्वसामान्य व्यक्तीला प्रवेश नव्हता. ज्या जागेवार माध्यम प्रतिनिधीला प्रवेश नाही त्या ठिकाणी सामान्य लोकांना प्रवेश होता असे मानता येणार नाही. यामुळे ज्यांच्या पाठीशी राजकिय बळ आहे अशा लोकांनाच उमेदवारी अर्ज भरता आले. यामुळे महिला, गरीब, दुर्लक्षीत घटकांतील उमेदवारांचा रस्ता बिकट झाला. अशातही 141 नागरिकांनी उमेदवारी अर्ज भरले.
उमेदवारी अर्ज भरुन घेताना राज्य निवडणूक आयोगाच्या दिनांक 1 एप्रिल 2017 रोजीच्या परिपत्रक क्र. रानिआ/ मनपा 2017/ प्र.क्र. 32/ का. 5 मधील मार्गदर्शक तत्वांचे उल्लंघन झाले. यामुळे 31 उमेदवारी अर्ज उमेदवारांची सही नाही, सुचकाची सही नाही अशा किरकोळ कारणांनी बाद ठरविण्यात आले. या बाद झालेल्या उमेदवारांमध्ये सर्वाधिक 11 महिला, 7 अनुसूचित जमाती व 3 अनुसूचित जातींचे उमेदवार व इतर मागास प्रवर्गातील 3 उमेदवारांचा समावेश होता. आपणाला याची लाज वाटत असेल किंवा नसेल, आमच्या भावना तिव्र आहेत. आपणा सर्वांनी नीट अभ्यास करुन जबाबदार्‍या पार पाडणे अपेक्षीत होते. आपण स्वत: याबाबत समजून घेतले नाही आणि गोयल यांना देखील समजावले नाही. आता आम्ही सदरील परिपत्रक 28 नोव्हेंबर 2017 रोजीच्या अंकात प्रसिद्ध केले असले तरी वेळ निघून गेली आहे. छाननीमध्ये बाद झालेल्या उमेदवारांमध्ये 2 विद्यमान नगरसेवकांचा समावेश होता. या नगरसेवकांना व न्यायालयात दाद मागणार्‍या अन्य 4 जणांना न्यायालयाने दिलासा दिला असून गोयल यांचे निकाल फिरवले आहेत. जे उर्वरीत लोक न्यायालयात जाऊ शकले नाहीत असे 25 जण निवडणूकीच्या रिंगणाबाहेरच राहीले.
आम्ही निवडणूक निर्णय अधिकार्‍यांच्या विरोधात लोकांच्या ज्या भावना छापत आहोत, त्याच भावना न्यायालयीन निकालांमध्ये व्यक्त झाल्या आहेत. जिल्हा न्यायालयाने निवडणूक अपील क्र. 1/2017 व अन्य 4 प्रकरणी निकाल देताना निवडणूक निर्णय अधिकारी यांनी निवडणूक आयोगाच्या नियमानुसार कामकाज केले नसल्याचा ठपका ठेवला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने देखील रिट पिटीशन क्र. 13475/2017 मध्ये निवडणूक निर्णय अधिकारी यांनी उच्च न्यायालयाच्या ज्या निकालावर सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती आहे अशा निकालाच्या आधारावर नगरसेवक सईद शेख यांना निवडणूक लढविण्यास अपात्र ठरविल्याचे निरिक्षण नोंदविले आहे. तपशिलात गेल्यानंतर जिल्हाधिकारी नारनवरे, तुम्ही देखील नगरसेवक सईद शेख यांना दिनांक 6 सप्टेंबर 2017 रोजी उच्च न्यायालयाच्या ज्या निकालावर सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती आहे अशा निकालाच्या आधारावर अपात्र ठरविल्याचे समोर येत आहे. तुमच्या या आदेशाला राज्यमंत्र्यांची स्थगिती असताना त्याकडेही दुर्लक्ष करुन गोयल यांनी सईद यांना अपात्र ठरविले. तुम्ही हे सर्व ठरवून केले का? तसे असेल तर ते लोकशाहीचा गळा घोटणारे आहे. आणि लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ हे कदापी खपवून घेणार नाही.

Print Friendly, PDF & Email

comments