स्वच्छ, पारदर्शक व भ्रष्टा्रचारमुक्त कारभारासाठी मी निवडणूक लढवितोय! डॉ. अमित नहार

डहाणू नगरपरिषदेचा कारभार स्वच्छ व पारदर्शक आणि भ्रष्ट्राचारमुक्त व्हावा यासाठीच मी निवडणूक लढवित आहे. परिस्थितीत बदल व्हावा आणि डहाणू शहराच्या सुनियोजीत विकासाला चालना मिळावी अशी लोकांची मागणी आणि आवाहन आहे. यामुळेच डहाणूच्या जनतेसाठी मी हा निर्णय घेतला अशी भुमिका भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष तथा डहाणू नगरपरिषदेच्या निवडणूकीतील नगराध्यक्ष पदाचे अपक्ष उमेदवार डॉ. अमित रमेश नहार यांनी दैनिक राजतंत्रशी बोलताना मांडली. दैनिक राजतंत्रचे संपादक संजीव जोशी यांनी त्यांच्याशी केलेली बातचीत त्यांच्यात शब्दात!

तुम्हाला भारतीय जनता पक्षाने उमेदवारी का नाकारली?
कदाचित पक्षाला आमच्या क्षमतेवर विश्‍वास नसेल म्हणून उमेदवारी नाकारली असेल. पण मी इतकेच सांगू इच्छीतो भाजपने जनतेला हवा असलेला उमेदवार दिला असता तर मी हा निर्णय घेतला नसता. पक्षाचे काम केले असते. 3 Amit Nahar (1Colmn)लोकांना स्वच्छ प्रतिमेचा, सुशिक्षीत व विकासाची दृष्टी असणारा आणि तसा ध्यास असणारा उमेदवार भाजपने देणे अपेक्षीत होते. भाजपने जो उमेदवार दिलेला आहे त्याच्याकडे हे गुण नाहीत. त्याची प्रतिमा चांगली नाही. लोकांमध्ये त्यांच्याविषयी नाराजी आहे. मी जर निवडणूकीला उभा राहीलो नसतो तर लोकांना पर्याय मिळाला नसता. आम्ही लोकांना चांगला उमेदवार निवडायची संधी उपलब्ध करुन दिली आहे.
तुम्हाला भाजपने नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिली असती आणि नगरसेवक पदांसाठी आयात उमेदवार दिले असते तर तुमची भुमिका काय असती?
पक्षाने नगराध्यक्षपदाचा उमेदवार निवडल्यानंतर त्याच्याशी चर्चा करुन अन्य नगरसेवक पदांचे उमेदवार निवडावेत अशी माझी सुचना होती. मी पक्षाला निवडणून येण्याची क्षमता असणार्‍या 25 उमेदवारांची यादी देखील सादर केली होती. ज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमधून आलेला एकही उमेदवार नव्हता. या यादीकडे भाजपने पूर्णपणे दुर्लक्ष केले. या यादीतील काही उमेदवार आता अन्य पक्षांकडून उमेदवारी लढवित आहेत.
राज्यात आणि केंद्रात भाजपची सरकारे आली तेव्हा तुम्ही भाजपचे पदाधिकारी होतात. त्यावेळी नगरपरिषदेचा कारभार सुधरविण्यासाठी आपण काही प्रयत्न केलेत का?
भाजपच्या लोकप्रतिनिधींची भूमिका चुकली. लोकप्रतिनिधींनी आरोप केले. विधानसभेत प्रश्‍न उपस्थित केले. चौकशा झाल्या व त्याचे अहवाल आले. अहवाल आले हे लोकांना माहित आहे, मात्र अहवालात काय निष्पन्न झाले ते कोणाला माहित नव्हते. ज्यांच्यावर आरोप केले त्याच लोकांना भाजपने पक्षात घेण्यासाठी पायघड्या घातल्या. त्यांना हवा तो प्रभाग देण्याचा विचार झाला. याबाबत मी पक्षात प्रखर विरोध केला. लोकांनी अशा विचारांच्या विरोधात आपल्याला मतदान केलेले आहे. भ्रष्ट्राचारी लोकांना जवळ करुन आपण लोकांशी प्रतारणा करतो आहोत असे सांगितले होते. आजही जनसामान्यांची हीच भावना आहे.
भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांवर जे आरोप केले ते त्यांना फोडून भाजपमध्ये आणण्यासाठी होते का?
तसे नसावे असे वाटते. या चौकशीमध्ये काही तथ्य नसेल तर क्लीनचिट द्यायला पाहिजे होती आणि दोषी असल्यास कारवाई व्हायला पाहिजे होती असे मला प्रमाणिकपणे वाटते.
चौकशी अहवालात काय दडलेले आहे?
तो अहवाल गोपनीय असावा. मात्र काही लोकांकडे तो आहे असे म्हणतात. प्रथमदर्शनी आरोपांमध्ये तथ्य असावे असे वाटते. नगिन देवा या तक्रारी आमदार खासदारांकडे घेऊन जात होते. ते स्वत: लोकप्रतिनिधी होते व वरीष्ठ पदाधिकार्‍यांकडे प्रकरण घेऊन जात असल्याने मी त्यामध्ये लक्ष घातले नाही. कोणी काही करत असेल तर मला त्याचे श्रेय घ्यायचे नव्हते.
1 वर्षापूर्वी आलेल्या या अहवालात कोणावरही काही ठपका ठेवलेला नाही, कारवाईची शिफारस केलेली नाही. अशा गोलगोल अहवालातून काय निष्पन्न होणार?
आमच्याकडे सत्ता आल्यावर पुन्हा चौकशी करु! डहाणू नगरपरिषदेत जी टक्केवारी चालते ती आम्ही बंद करु. 40 ते 42 टक्के पैशांचे वाटप होते आणि मग कामे निकृष्ठ होतात.
तुमची लढत कोणाशी आहे?
ही चौरंगी लढत आहे आणि मी सर्वांशी लढतो आहे. अटीतटीची लढत होईल असे मला वाटते.
तुम्ही 25 उमेदवार उभे करु शकले नाहीत. मग लोकांनी तुम्हाला का निवडून द्यावे?
आम्ही 25 उमेदवार जमा केले होते. ते विविध पक्षांमध्ये निवडणूका लढवित आहेत. नगराध्यक्षपदासाठी थेट निवडणूक घेण्यामागे कदाचित सरकारचा देखील जनतेच्या मनातील उमेदवार या खुर्चीवर बसावा असा असेल. म्हणून मी निवडणूक लढवित आहे. हा उद्देश माझ्यामुळे सफलहोत असावा.
तुम्ही नगराध्यक्ष झालात तर तुमच्या विरोधातील नगरसेवकांबरोबर तुम्ही कसे कारभार चालवणार?
माझा विचार मी त्यांच्यावर थोपवू शकणार नाही. किंवा चुकीचा विचार मी खपवून देखील घेणार नाही. आम्ही जनतेला विश्‍वासात घेऊ. दर महिन्याला जनता दरबार घेऊ. थेट निवडणूक पद्धतीमध्ये नगराध्यक्षाला खुप अधिकार दिलेले आहेत. त्याचा वापर करु.
असे कुठले अधिकार नगराध्यक्षाला दिले आहेत?
या संदर्भात मी तुम्हाला कागदपत्रे दाखवेन! जनतेला थेट निर्णय प्रक्रीयेत समाविष्ट करण्याचा प्रयत्न करु. जनतेच्या फायद्याच्या निर्णयाच्या मागे राहेन. जर नगरसेवकांची मते मला पटली नाही तर जनतेची मते घेऊ आणि निर्णय बदलण्यास भाग पाडू.
भ्रष्ट्राचारी नगरसेवक निवडून आले तर नगराध्यक्ष म्हणून तुम्ही स्वच्छ कारभार कसा करणार?
आम्ही व्यवस्था अशी करु की, नगरसेवकांना भ्रष्ट्राचार करणे शक्यच होणार नाही.
निवडून आल्यावर पहिले काम काय करणार?
पहिला प्रयत्न संपूर्ण महाराष्ट्रात उत्तम कामगिरी करणार्‍या 10 पैकी एका अधिकार्‍याची डहाणू नगरपरिषदेसाठी मागणी करेन. त्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करेन. नगरपरिषदेच्या कर्मचार्‍यांचे लगेचच प्रशिक्षण सुरु करेन. त्यांना अधिक सक्षम करेन. डहाणूच्या जनतेला चांगल्या सुविधा मिळतील अशा सुधारणा प्रशासनात करेन. ज्या तक्रारी पेंडींग आहेत त्या मार्गी लावेन. एक तर क्लीनचिट द्या नाहितर कारवाई करा अशी भुमिका घेईन. जी कामे चालू आहेत ती त्वरीत थांबवेन. आरोपांतील तथ्य तपासून मग कामे सुरु करेन.
निवडून आल्यास भाजपने सन्मानाने प्रवेश दिल्यास घरवापसी करणार का?
तसा सध्या तरी विचार केलेला नाही. भाजपने माझी पक्षातून हकालपट्टी केलेली आहे. याबाबत आता काही विचार केलेला नाही.
तुमचे व्हीजन आणि लोकांच्या अपेक्षा यांच्यात तुम्ही समन्वय कसा साधणार? डहाणू नगरपालिका 1 रुपयांत 100 लिटर पाणी पुरवते. हा दर महाग असताना तुम्ही 1 रुपया लिटर दराने मिनरल वाटर पुरवणार हा विरोधाभास नाही का?
नगरपालिका सध्या जे पाणी पुरविते त्यात आणि यात फरक आहे. ज्याला मिनरल वाटर पाहिजे त्यांच्यासाठी वेगळी संकल्पना आहे. पाणीपुरवठा योजना सुरुच राहील. लोकांना वेळेत, स्वच्छ आणि मुबलक पाणीपुरवठा होईल. त्याशिवाय मिनरल वॉटर देखील वेगळ्या योजनेद्वारे पुरवू. आम्ही जाहिरनामा प्रसिद्ध केलेला आहे. त्यामध्ये आमच्या विकासाच्या कल्पनांचा तपशिल सविस्तरपणे दिला आहे. कचर्‍याचा प्रश्‍न, गटारांच्या समस्या या प्राथमिकतेने सोडविल्या जातील. सध्या डहाणूत बांधकाम परवानग्या दिल्या जात नसल्याने विकास रोखला गेला आहे. या परवानग्या पुन्हा सुरु व्हाव्यात यासाठी प्रयत्न करु.
डहाणू शहराच्या समस्यांना जबाबदार कोण?
डहाणू शहराच्या समस्यांना सत्ताधारी पक्ष जितके जबाबदार तितकाच विरोधी पक्ष जबाबदार आहे असे माझे स्पष्ट मत आहे.
जेव्हा भाजपने डहाणूरोड जनता बँकेमध्ये भ्रष्ट्रचाराच्या आरोपाने कलंकीत व्यक्तीच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढविली तेव्हा आपण व्यथीत झालात का? अशा पक्षात का राहीलात?
भाजपने त्यावेळी देखील भ्रष्ट्राचारी लोकांच्या पॅनलला पक्षाचे नाव दिले. आमच्यावर तेव्हा देखील अन्याय झाला. आम्ही तेव्हासुद्धा भाजपच्या विरोधात लढलो आणि आता देखील अशाच प्रवृत्तींच्या विरोधात लढण्यासाठीच निवडणूक लढवित आहे.

Print Friendly, PDF & Email

comments