मुंबई, दि.08 : पालघर जिल्ह्यातील डहाणू व जव्हार आणि नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी सुधारीत कार्यक्रमानुसार आता 13 डिसेंबर 2017 ऐवजी 17 डिसेंबर 2017 रोजी मतदान होणार असल्याची माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी आज येथे दिली.
सहारिया यांनी सांगितले की, या नगरपरिषदांच्या नामनिर्देशनपत्रांसदंर्भातील न्यायालयांचे निकाल आणि संबंधित अधिनियमातील तरतुदी लक्षात घेऊन हा बदल करण्यात आला आहे. या बदलानुसार तीन ठिकाणी 17 डिसेंबर 2017 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होईल. 18 डिसेंबर 2017 रोजी मतमोणजी होईल. त्याचबरोबर खोपोली नगरपरिषदेच्या प्रभाग क्र.6-अ च्या रिक्त पदाच्या पोटनिवडणुकीसाठीदेखील 13 डिसेंबर 2017 ऐवजी 17 डिसेंबर 2017 रोजी मतदान होणार आहे.
डहाणू नगरपरिषदेच्या निवडणूकीत निवडणूक निर्णय अधिकारी आंचल गोयल यांच्या चुकीच्या निर्णयामुळे 31 उमेदवार छाननीमध्ये बाद होऊन निवडणूक लढविण्यापासून वंचीत राहिले. यातील 6 जणांनी न्यायालयात दाद मागितल्यानंतर या उमेदवारांना न्याय मिळाला. अशा उमेदवारांना प्रचार करण्याची पुरेशी संधी मिळावी या उद्देशाने निवडणूका पुढे ढकलण्यात आल्या आहेत.