माझा नगरसेवक – हरेश राऊत (डहाणू)

0
3361

डहाणू नगरपरिषदेच्या निवडणुकीचा बिगुल वाजला आहे, सगळेच पक्ष आणि हौशे गवशे तयारीला लागलेत. हल्ली ग्रामपंचायत, नगरपरिषदेच्या निवडणुका देखील विधानसभा, लोकसभेच्या निवडणुकांप्रमाणे महत्वाच्या वाटायला लागल्यात, किंबहुना ते आपल्या अंगवळणी पडलेय. अनेक पक्ष निवडणुकीत उतरतातच पण कितीतरी अपक्ष देखील आपलं नशीब आजमावतात. अनेक जण तर आपण शंभर टक्के हरणार याची खात्री असताना देखील आपलं नशीब आजमावताना दिसतात. अशा लोकांकडे नीट पाहिलं तर एक गोष्ट लक्षात येईल, ते नशीब आजमावत नसतात, तर विरोधी उमेदवारांना आजमावतात. समोरच्यावर दबाव टाकायचा, काही तोडपाणी होते का पहायचे, काही मिळालं तर गप्प बसायचं, नाही मिळालं तरी काही हरकत नसते, जास्तीत जास्त काय होईल? डिपॉजीट जप्त LEKHहोईल. यावेळी पक्ष जास्त आणि उमेदवार कमी अशी परिस्थिती असल्याने ही मंडळी गरजवंत पक्षात समाविष्ट होऊ शकली.
हल्ली राजकारण म्हणजे पोराबाळांचा खेळ झालाय, या फ्लेक्स संस्कृतीने राजकारण खूप सोप्प केलंय. गावात, शहरात एक कोपर्‍याकोपर्‍यावर फ्लेक्स लावायचे, डावीकडे वरच्या कोपर्‍यात पक्षातील मोठ्या नेत्याचे, आपण ज्या मोठ्या नेत्याचे समर्थक आहोत त्यांचे असे उतरत्या क्रमाच्या आकाराचे फोटो लावायचे, मध्ये एखाद्या भाऊ दादाला वाढदिवसाच्या शुभेच्छा, कुठलं तरी पद मिळाल्याबद्दल शुभेच्छा, नाहीतर नागरिकांना दिवाळीच्या, गणपतीच्या, ईदच्या, ख्रिस्तमसच्या शुभेच्छा. दादा, भाऊ, भाईचा मोठा फोटो, आणि खाली दोन ते चार रांगेत पंटर लोकांचे छोटेछोटे फोटो. मला नेहमी प्रश्‍न पडतो तो हा की, हे छोटे फोटो कुणी कौतुकाने पाहत असतील का? मला पक्की खात्री आहे, ज्याचा फोटो लावलाय तोच फक्त आपला फोटो पाहत असावा. शहराचं विद्रुपीकरण अशा फ्लेक्समूळे होते, पण त्याचं यांना काय? आपली छबी चमकवून घ्यायची, आपलं काम भागतं नं, झालं तर.
जन्मापासून मरणापर्यंत एकाच पक्षात राहून, कुठल्याही पदाची, सत्तेची, मोबदल्याची लालसा न ठेवता निष्ठेने काम केलेली अनेक उदाहरणे आहेत. दोन वेळा आमदार राहिलेले व झोपडीत राहणारे पंजाबचे आमदार शिंगारा राम किंवा त्रिपुराचे मुख्यमंत्री, जे त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या तिसर्‍या टर्मवेळी पहिल्या टर्मपेक्षा गरीब झाले होते. इथे पाच वर्षात तीनशे टक्के संपत्ती वाढण्याची उदाहरणे असताना अशा प्रामाणिक कार्यकर्त्यांची कितीशी उदाहरणे आपण आजूबाजूला पाहू शकतो? पैसा ओतायचा आणि निवडुन आल्यावर पैसा कमवायचा हा एकमेव हेतू जास्तीत जास्त राजकारण्यांचा असतो. नाहीतर, तुटपुंज्या भत्त्यासाठी आणि दिवसरात्र लोकांचा त्रास सहन करण्यासाठी कोण लोकप्रतिनिधी होणार?
कुठल्या तरी पक्षाशी बांधील राहून निष्ठेने राजकारण करायचं असते, असं समजणं म्हणजे निव्वळ अंधश्रद्धा आहे. आणि आता तर सगळ्याच पक्षातील राजकारण्यांनी ते आपल्या हरकतींनी सिद्ध देखील केलंय. मागच्या चार-पाच वर्षात एका मोठ्या पक्षात सामील व्हायची जणू शर्यत लागलीय, आपलं शहर देखील त्याला अपवाद कसं असेल? नामांकनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत किती कोलांट्या उड्या आपल्याला पहायला मिळाल्या? जो पक्ष तिकीट देईल तो आपला, हेच वातावरण सगळीकडे होतं. अगदी अजून मला कोण कुठल्या पक्षात आहे हे स्पष्ट समजलं नाही, ज्याला समजलं असेल ती व्यक्ती खरोखरच पूजनीय! आणि तिकीट मिळून सुद्धा निष्ठा त्या पक्षाशी हे उमेदवार ठेवतील याची काहीच खात्री नाही. माझा मित्र सांगत होता, त्याने एक पक्षाच्या महिला उमेदवाराला, दुसर्‍या पक्षाच्या नगराध्यक्ष उमेदवाराला असं सांगताना ऐकलं की, तुम्ही मला मदत करा, मी तुम्हाला करीन, झालं? म्हणजे कुणी कुणावर भरोसा ठेवायचा? माझ्या एका मित्राला निवडणूक लढवायची होती, पण पक्षाने तिकीट दुसर्‍या कुणाला तरी दिले, मग हा शांत बसला, पण शेवटच्या दिवशी कळलं की तो तिकीट मिळालेला माणूस शेवटच्या क्षणी दुसर्‍याच पक्षात गेला, मित्राने पुन्हा धावपळ केली, पण उमेदवारी मिळाली नाहीच.
हल्ली एक ट्रेंड आलाय, अमुक तमुक नेत्याचं आपल्या कार्यकर्त्यांसकट अमुक तमुक पक्षात प्रवेश! मग प्रवेश करताना येणार्‍या नेत्याच्या गळ्यात पक्षाचा गमचा घालून स्वागत आणि फोटो, डहाणूदेखील त्याला अपवाद नाही. इथेही खूप गाजावाजा करून इतर पक्षात गेलेले, गमचा गळ्यात घालून काढलेले फोटो आपण पाहिले. पण इथे गम्मत निराळीच, परवा धुमधडाक्यात दुसर्‍या पक्षात पक्षप्रवेश केलेले आज स्वगृही परत, आणि फोटो पाहिले तर काय? पुन्हा जंगी स्वागत? हसावं की रडावं? काहीच कळत नाही. अशा फटाफट निष्ठा बदलतात ते आपले प्रतिनिधी! आणि याला कुठलाच पक्ष अपवाद नाही, राजकारणात कुणीही अस्पृश्य नाही हेच खरं, आणि ही अस्पृश्यता मानत नाही, तेच राजकारणात यशस्वी होतात, हेही तितकेच खरं! तुमच्या माझ्यासारखे इथे कसे टिकणार?
ही झाली उमेदवार आणि राजकारण्यांची गोष्ट; पण मतदारांची गोष्ट यापेक्षा वेगळी नाही. किंबहुना राजकारणी जर बिघडले असतील तर त्याला जबाबदार दुसरं तिसरं कुणीही नाही, फक्त आणि फक्त आपण! आपण मत देताना काय पाहतो? एक तर पक्ष, आणि पक्ष उमेदवारी देताना त्या व्यक्तीत काय पाहतात? निवडुन येण्याची क्षमता! सच्चा कार्यकर्ता या सर्व घडामोडीत कुठे दिसतो? साहेबाच्या मागे! आपण जबाबदार कसे? माझा मित्र सांगत होता, तो निवडणुकीला उभा राहणार आहे इतकं कळल्याबरोबर लोकांचे तीनचार गट येऊन त्याला भेटून गेले, आम्हाला इतके द्या, आम्ही तुमच्या बरोबर आहेत. आपल्याला निवडणुका कळल्याच नाहीत. क्षणिक फायद्यासाठी आपण हे विसरतो की, आपण निवडुन दिलेला उमेदवार हा पाच वर्षे आपली कामं करण्यासाठी असतो, आपण काय करतो? निवडणुकीच्या वेळी आपल्या उमेदवारांना आपण आपल्या मागण्या सांगतो, इतके पैसे द्या, मंदिर बांधून द्या, क्रिकेटचं किट द्या, सोसायटीत सीसीटीव्ही लावून द्या, आणि मतदानाच्या आदल्या रात्री किंवा मतदानाआधी ठराविक रक्कम द्या. झालं आपल्या अपेक्षा यापेक्षा काही नसतातच, मग उमेदवार तरी आपल्याकरता का पाच वर्षे काम करतील?
या निवडणुकीत चला आपण एक पण करु, की मी कुठल्याही उमेदवाराला पैसे घेऊन किंवा कुठल्याही लालचेने मतदान करणार नाही! सच्चा उमेदवार, जो माझ्या अडचणी समजून, माझ्या प्रभागातील अडचणी समजून कार्य करेल, निधीचा पुरेपूर आणि योग्य वापर करून जनतेच्या नागरी समस्या सोडवण्यासाठी मनःपूर्वक प्रयत्न करेल. अगदी न खाऊंगा, न खाने दुंगा उमेदवार मिळणं ही अपेक्षा ठेवा, असं सांगण्याचा आगाऊपणा मी करणार नाही! कारण या पातळीवर ते केवळ कठीण नाही, तर अशक्य आहे. पण आपण सुरवात तर करु या! आज आपल्या प्रयत्नांना शंभर टक्के यश येईल हे सांगणं धाडसाचे होईल, पण म्हणून प्रयत्न करुच नाही असे कुणी म्हटलंय? आज सुरुवात आपण करु, योग्य उमेदवार निवडून, राजकारणात आज ज्या वाईट प्रवृत्ती राज्य करु पाहताहेत, कदाचित त्या प्रवृत्तीच्या शेवटाची ही सुरुवात ठरावी! आणि ज्या उमेदवाराला तुम्ही निवडून द्याल, उद्या तुम्ही अभिनमनाने म्हणाल, हो, हा माझा नगरसेवक!

Print Friendly, PDF & Email

comments