डहाणू नगरपालिका; दिशा आणि दशा! भाग १ ; भ्रष्ट्राचाराच्या विळख्यात, डहाणू नगरपालिकेची पाणीपुरवठा योजना!

विशेष लेख 
भाग 1 : -संजीव जोशी
डहाणू नगरपालिकेच्या निवडणूकीतील वाढीवfacebook_1506002192949ना हा अतिशय कळीचा मुद्दा आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सत्ताकाळातील हा महत्वाचा आणि महत्वाकांक्षी असा प्रकल्प म्हणावा लागेल. हा प्रकल्प पुर्ण झाल्यानंतर डहाणू शहराचा पाणीप्रश्‍न सुटण्यास मदत होणार आहे. पुरेशा दाबाने पाणीपुरवठा होणार असून ज्या भागात पुर्वी पाणी पोहोचत नसे अशा वस्त्यांपर्यंत पाणी पोचणार आहे. डहाणूचे तत्कालीन नगराध्यक्ष मिहीर शहा यांच्या कार्यकाळात 32 कोटी 85 लक्ष रुपये खर्चाच्या या योजनेच्या कामास मार्च 2014 मध्ये सुरुवात झाली आणि 24 महिन्यात ही योजना पूर्ण होणे अपेक्षीत होते. (मार्च 2016 मध्ये ही योजना पूर्ण होणे आवश्यक असताना त्यानंतर 20 महिने उलटले, तरी योजना अपूर्ण अवस्थेतच आहे.)
या योजनेबाबत पालघरचे खासदार चिंतामण वणगा आणि डहाणूचे आमदार पास्कल धनारे यांनी 11 जानेवारी 2016 रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे, डहाणू नगरपरिषदेमध्ये झालेल्या व सातत्याने होत असलेल्या गैरव्यवहार व भ्रष्ट्राचाराबाबतीत (तत्कालीन) मुख्याधिकारी अतुल पिंपळे यांची त्वरीत व तात्काळ जिल्ह्याबाहेर बदली करुन स्वतंत्र विभाग व सक्षम अशा अधिकारी आणि अ‍ॅन्टी करप्शन ब्युरोमार्फत सखोल व कसून चौकशी करावी व कारवाई करावी अशी मागणी केली. दोन्ही तक्रारींतील मजकूर साराखाच आहे.
यावर मुख्यमंत्र्यांनी तत्काळ अहवाल सादर करावा असा शेरा लिहीला. ही चौकशी पालघरच्या जिल्हाधिकार्‍यांकडे आली. जिल्हाधिकारी यांनी दिनांक 16 मार्च 2016 रोजीच्या जावक क्र. 57/2016 च्या पत्रान्वये उपविभागीय अधिकारी, डहाणू यांना चौकशीचे आदेश दिले. पुन्हा जिल्हाधिकारी यांनी उपविभागीय अधिकारी यांना दिनांक 2 एप्रिल 2016 रोजी जावक क्रमांक 92/16 च्या पत्रान्वये, दिनांक 18 एप्रिल 2016 रोजी जावक क्र. 109/16 च्या पत्रान्वये, दिनांक 15 जून 2016 रोजी जावक क्र. 160/16 अन्वये स्मरणपत्रे दिली.
उप विभागीय अधिकारी, डहाणू यांनी या चौकशीसाठी दिनांक 6 मे 2016 रोजी वसई विरार महापालिकेचे उपमुख्य लेखापरिक्षक संजय साळी, तलासरी पंचायत समितीच्या सहाय्यक लेखाधिकारी जयमाला सुरवसे, तलासरीचे तहसिलदार विशाल दौडकर, पालघरचे सहाय्यक नगररचनाकार र. आ. पाटील, महाराष्ट्र जिवन प्राधिकरणाचे उप अभियंता के. एस. लोखंडे, महावितरणचे कार्यकारी अभियंता जी. व्ही. दिवकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता खैरनार व डहाणू तहसिलदार कार्यालयातील 4 अधिकारी व कर्मचारी यांच्या पथकाची नियुक्ती केली.
चौकशी पथकाने दिलेल्या अहवालाच्या आधारावर पालघरचे जिल्हाधिकारी यांनी दिनांक 8 डिसेंबर 2016 रोजी जावक क्रमांक 524/16 अन्वये मुख्यमंत्र्यांकडे अहवाल सादर केला. या अहवालाला आज वर्ष पुर्ण होत आले तरी कोणावरही कुठल्याही प्रकारची कारवाई झालेली नसल्यामुळे ही चौकशी म्हणजे डोंगर पोखरुन उंदीर काढल्यासारखे ठरले आहे. एकीकडे कोणावरही काहीही कारवाई झालेली नसताना मागील 5 वर्षांत नगराध्यक्षपद उपभोगलेले, व ज्यांच्यावर मनमानी कारभाराचे आरोप ठेवण्यात आले होते असे, मिहीर शहा व रमिला पाटील यांच्यासह राष्ट्रवादीच्या 11 नगरसेवकांना भाजपाने नुसतेच पोटात घेतले नाही तर ज्यांनी सुरुवाती पासून भाजपची कास धरली अशा निष्ठावान भाजप कार्यकर्त्यांना उमेदवारीसाठी झुंजवून आणि मुलाखतींचा फार्स करुन परस्पर डावलले आणि राष्ट्रवादीच्या आयात उमेदवारांवर तिकीटांची खैरात केली.
खासदार वणगा आणि आमदार धनारे यांच्या तक्रारींमधील मुख्य मुद्दा होता: राज्य शासन लाखो रुपयांच्या अडचणीत असतांना डहाणू नगरपरिषदेला राज्य शासनाने महाराष्ट्र सुजल निर्मल अभियान डहाणू शहर पाणीपुरवठा योजने अंतर्गत दिलेल्या निधीमध्ये सुरुवातीपासून म्हणजे लोकवर्गणीपासून ते कामाचे अंदाजपत्रकामध्ये प्रचंड प्रमाणात वाढ केल्याचे दिसून येते. त्यामध्ये प्रचंड प्रमाणात भ्रष्ट्राचार झालेला आहे.
आज त्यांचे काय म्हणणे आहे?
याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी 20 नोव्हेंबर रोजी पालकमंत्री विष्णू सवरा, खासदार चिंतामण वणगा, भाजपचे जिल्हाध्यक्ष पास्कल धनारे, प्रदेश प्रतिनिधी बाबाजी काठोळे यांच्या उपस्थितीत डहाणू येथील पक्ष कार्यालयात अधिकृतपणे पक्ष प्रवेश करताना त्यांच्याशी केलेल्या वार्तालापातून मिळवण्याचा प्रयत्न केला. प्रश्‍नोत्तरे पुढीलप्रमाणे होती.
डहाणू नगरपरिषदेतील कथित भ्रष्ट्राचाराबाबत खासदार वणगा आणि आमदार धनारे यांनी अ‍ॅन्टी करप्शन विभागाकडून चौकशीची मागणी केली होती त्याचे काय झाले?
यावर खासदार वणगा यांनी उत्तर दिले, या प्रश्‍नांची उत्तरे आम्ही निवडणूकीत प्रचार करताना देऊ!
याचा अर्थ तुम्ही केलेले आरोप राजकीय होते का? केवळ दबाव निर्माण करुन अथवा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांना कारवाईचा धाक दाखवून तुम्ही विरोधी पक्षाचे नगरसेवक फोडले का? तुम्ही ज्यांच्यावर भ्रष्ट्राचारचे आरोप केले त्यांच्यावर तुम्ही भविष्यात कारवाई करणार का?
खासदार वणगा यांचे उत्तर, आम्ही तक्रार वैयक्तीक केली नव्हती. ती नगरपरिषदेच्या विरोधात होती.
मग सर्व नगरसेवकांनी मिळून भ्रष्ट्रचार केला असेल तर माफ का?
आमदार धनारे यांनी सांगितले चौकशी अजून चालू आहे!
चौकशी पूर्ण होऊन एक वर्ष पूर्ण झाले. माझ्याकडे अहवाल आहे.
आमदार धनारे म्हणाले, वास्तविक चौकशी झाली तर आम्हाला अहवाल दिला गेला पाहीजे होता.
तुमचे सरकार आहे. तुम्हाला प्रत का नाही मिळाली ते आम्ही कसे सांगू? तुम्हाला माझ्याकडची प्रत देऊ का? मुख्यमंत्र्यांनी अ‍ॅन्टी करप्शनची चौकशी का नाही लावली?
आमदार धनारे म्हणाले, मी विधानसभेत प्रश्‍न उपस्थित केला होता. याबाबत चौकशी करतो.
केंद्रात आणि राज्यात तुमचे सरकार असताना तुम्हाला आयाराम उमेदवार का आयात करावे लागले? तुमच्या पक्षातील लोकांना डावलून आयारामांना तिकीटे कशी देत आहात?
यावर पालकमंत्री सवरा आणि खासदार वणगा यांचे असे म्हणणे आहे की, भाजपची हवा आहे. लोकांचा भाजपवर मोठ्या प्रमाणात विश्‍वास निर्माण झाला आहे. यामुळे लोक प्रभावीत होऊन भाजपकडे येत आहेत. आम्हाला पक्ष वाढवायचा आहे. यावेळी कधी नव्हे इतक्या जवळपास 125 इच्छूकांनी उमेदवारी मागितली. इतिहासात इतकी कधिही मागणी नव्हती. आम्ही निवडून येण्याची क्षमता तपासून उमेदवारांची यादी तयार केली असून ती अंतिम मान्यता मिळविण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे सादर केलेली आहे.

शासनाने डहाणू नगरपालिकेतील भ्रष्ट्राचार प्रकरणी आपले खासदार वणगा आणि आमदार धनारे यांना चौकशी अहवाल न दिल्यामुळे त्यांना तो वाचायला मिळाला नाही. त्यांना पाठपुरावा करणे शक्य व्हावे आणि लोकांना खासदार व आमदार यांच्याकडे पाठपुरावा करणे शक्य व्हावे यासाठी आम्ही याबाबत भाग 2 मध्ये विश्‍लेषण करीत आहोत. (क्रमश:)

Print Friendly, PDF & Email

comments