डहाणू: अखेर आज टिम राष्ट्रवादी भाजपात दाखल पालकमंत्री, खासदार व आमदार यांच्या उपस्थितीत प्रवेश

0
1313

दि. 20: डहाणू नगरपरिषदेच्या 13 डिसेंबर रोजी होणार्‍या निवडणूकीत निवडून येण्याची क्षमता हाच भाजपचा उमेदवारी निश्‍चित करण्याचा निकष असल्याचे स्पष्ट झाले असून आयात उमेदवारांच्या सामर्थ्यावरच भाजप निवडणूकीला सामोरे जात आहे.

डहाणूच्या नगराध्यक्षा सौ. रमिला पाटील यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देऊन पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री विष्णू सवरा, खासदार चिंतामण वणगा, आमदार पास्कल धनारे, भाजपाचे प्रदेश प्रतिनिधी बापजी काटोळे यांच्या उपस्थितीत भारतीय जनता BHAJAP PRAVESHपक्षामध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्या समवेत राष्ट्रवादीचेच माजी नगराध्यक्ष रमेश काकड, शमी पिरा, रेणूका राकामुथा, तारा बारी, आशा फाटक या विद्यमान नगरसेवकांनी, तसेच माजी नगरसेवक शैलेश राकामुथा यांनी देखील भाजपमध्ये प्रवेश केला. शशिकांत बारी यांनी देखील प्रवेश केला असला तरी ते प्रकृती अस्वास्थ्यामुळे आज उपस्थित राहू शकले नाहीत. या सर्वांनी आज आपल्या नगरपरिषद सदस्यपदाचा राजिनामा देऊन मग भाजपमध्ये प्रवेश केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगराध्यक्ष मिहीर शहा, प्रकाश माच्छी व प्रकाश बुजड यांनी या आधीच नगरसेवकपदाचा राजिनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला आहे. तर सौ. लिलावती देवा यांनी राजिनामा देऊन शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे. यामुळे डहाणू नगरपरिषदेतील नगराध्यक्षपदासहीत 10 जागा रिक्त झाल्या असून डहाणू नगरपरिषद बरखास्त होण्याच्या वाटेवर आहे. यावेळी मिहीर शहा यांचेव्यतिरिक्त नगराध्यक्षपदाचे सर्वच उमेदवार उपस्थित होते.

भाजपमध्ये नगराध्यक्षपदासाठी 6 इच्छूक

डहाणू नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी भाजपमध्ये 6 उमेदवार इच्छूक असून त्यामध्ये भरत राजपूत, मिहीर शहा, रविंद्र फाटक, डॉ. अमित नहार, गिरीष कामत व सुजाता माळी यांचा समावेश आहे. भरत राजपूत हे विद्यमान नगरसेवक व भाजपच्या ठाणे मंडळाचे उपाध्यक्ष आहेत. मिहीर शहा हे माजी नगराध्यक्ष आहेत. रविंद्र फाटक हे माजी उपनगराध्यक्ष आहेत. डॉ. अमित नहार हे माजी जिल्हा उपाध्यक्ष आहेत. तर गिरीष कामत हे माजी शहराध्यक्ष आहेत. सुजाता माळी या माजी नगरसेविका आहेत. भाजपमध्ये ज्येष्ठतेचा त्यांचा क्रम खालील प्रमाणे आहे. 1) गिरीष कामत 2) सुजाता माळी 3) डॉ. अमित नहार 4) भरत राजपूत 5) रविंद्र फाटक 6) मिहीर शहा. या शिवाय 25 नगरसेवकपदांसाठी भाजपाकडे 125 च्या आसपास इच्छूक उमेदवार आहेत.

सर्व उमेदवारांची यादी तयार;
मुख्यमंत्र्यांना मान्यतेसाठी सादर

सर्व उमेदवारांची यादी तयार असून ती मुख्यमंत्र्यांना मान्यतेसाठी सादर करण्यात आलेली आहे. त्यांनी मान्यता दिल्यानंतर यादी जाहिर करण्यात येईल अशी माहिती पालकमंत्री विष्णू सावरा व खासदार चिंतामण वणगा यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. बाहेरचे उमेदवार आयात होत असताना पक्षातील नाराजांनी दगाफटका करु नये याची भाजपकडून काळजी घेण्यात येत असून ऐन वेळीच सर्व उमेदवार जाहिर केले जातील व मुख्यमंत्र्यांच्या नावावर यादी खपवून स्थानिक नेत्यांनी रोषापासून स्वत:ची सुटका करुन घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.

भरत राजपूत यांना डावलणे अवघड

नगराध्यक्षपदासाठीचे उमेदवार भरत राजपूत यांचे भाजपातील कार्यकर्त्यांचे मोठे नेटवर्क असून उत्तर भारतीय मतदारांची व्होट बँक त्यांच्या हातात आहे. मात्र भरत राजपूत यांनी वेळोवेळी स्थानिक नेत्यांना अंगावर घेण्याचा प्रयत्न केल्यामुळे त्यांच्याविषयी किंचीत अस्वस्थता आहे. असे असले तरी त्यांना डावलणे भाजपला घातक ठरु शकते. जिल्ह्यातील नेते देखील राजपूत यांच्याशी पंगा घेण्याच्या भानगडीत पडत नाही. परंतू दिड वर्षापूर्वी डहाणूरोड जनता सहकारी बँकेच्या निवडणूकीत भाजपने त्यांना एकहाती नेतृत्व दिलेले असताना झालेला मानहानीकारक पराभव ही त्यांच्यासाठी दुखरी बाजू ठरत आहे.
दुसरे उमेदवार मिहीर शहा यांनी अलिकडेच डहाणूरोड जनता सहकारी बँकेत मिळवलेला दैदिप्यमान विजय व अन्य निवडणूकांतील त्यांची भरीव कामगिरी यावर भाजपचे नेते खुष झालेले आहेत. मिहीर यांचा पक्षाला भविष्यात फायदा होऊ शकेल असे काही नेत्यांना वाटत आहे. रविंद्र फाटक आणि मिहीर शहा यांचा भाजप एकत्रित रित्या विचार करीत असून मिहीर शहा यांना उमेदवारी दिल्यास रविंद्र फाटक हे पाठीशी राहतीलच असे भाजपला वाटते.
डॉ. अमित नहार हे पाटी कोरी असलेले व तुलनेने भाजपमध्ये जुने असलेले उमेदवार असले तरी शहरात त्यांचे पुरेसे कार्यकर्त्यांचे नेटवर्क नाही. भरत आणि मिहीर या अनुक्रमे काँग्रेस व राष्ट्रवादीमधून आलेल्या उमेदवारांपेक्षा तुलनेने भाजपपासून राजकीय कारकीर्द सुरु करणार्‍या नहार यांना उमेदवारी मिळावी असे काही भाजपच्या निष्ठावंतांना वाटते. मात्र खासदार आणि आमदार यांच्या निवडणूका नहार यांच्या करिष्म्यामुळे जिंकल्या गेल्या या दाव्यावर भाजप गंभिर नाही. आणि त्यानंतर डहाणूरोड जनता बँकेतील विजयी पॅनलचे ते शिल्पकार असल्याचा दावा देखील नहार जितके गांभिर्याने व्यक्त करतात तितका पक्ष गांभिर्याने घेत नाही ही त्यांच्यापुढील अडचण आहे.

मिहीर शहा यांनी निवडणूकीमध्ये पूर्णपणे सस्पेन्स निर्माण केला असून ते भाजपकडून तिकीट न मिळाल्यास राष्ट्रवादी काँग्रेसकडून नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवू शकतात अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. राष्ट्रवादीचे आमदार आनंद ठाकूर त्यांच्या संपर्कात असल्याचे समजते. राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या बहुतांश नगरसेवकांनी मिहीर शहा यांना नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी मिळावी अशी इच्छा व्यक्त केल्याचे सुत्रांचे म्हणणे आहे. असे असले तरीही आता मिहीर शहा यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून निवडणूक लढविल्यास त्यांचे पाठीराखे नगरसेवक पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये माघारी फिरण्याची शक्यता मावळली आहे.

Print Friendly, PDF & Email

comments