जव्हार : आदिवासी विकास प्रकल्पातंर्गत दिल्या जाणार्‍या नामांकित शाळा प्रवेशासाठी उकळले पैसे, शिक्षण विभागातील कनिष्ठ लिपिकावर गुन्हा नोंदविण्याची अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेची मागणी

0
1847

प्रतिनिधी
जव्हार, दि. 05 : आदिवासी समाजातील मुलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी व त्यांना उच्च दर्जाचे इंग्रजी शिक्षण मिळावे, या उद्देशाने आदिवासी विकास विभागाकडून नामांकित इंग्रजी शाळांची निवड करून गोरगरिब आदिवासी मुलांना अशा शाळांमध्ये मोफत प्रवेश दिला जात आहे. मात्र या शाळा प्रवेशासाठी मुलांच्या पालकांकडून पैशांची वसुली होत असल्याचा आरोप अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद या संघटनेने केला असुन प्रवेशाच्या नावाखाली पालकांकडून पैसे उकळणारे शिक्षण विभागातील कनिष्ठ लिपिक ए. डी. बागुल यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
जव्हार आदिवासी विकास प्रकल्पातंर्गत जव्हार, मोखाडा, वाडा व विक्रमगड अशा चार तालुक्यांचा समावेश आहे. या तालुक्यांतील गोरगरिब, तळागाळातील आदिवासी मुलांनाही उच्च दर्जाचे इंग्रजी शिक्षण मिळावे, या हेतूने जव्हार आदिवासी प्रकल्पाकडून नामांकित इंग्रजी शाळांची निवड करून या शाळेत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचा संपूर्ण खर्च आदिवासी विकास विभाग करीत आहे. महाबळेश्वर, पाचगणी, सांगली, सोलापूर, सातारा, शहापूर, आघई, विक्रमगड येथील इंग्रजी शाळांमध्ये या मुलांना प्रवेश दिला जात आहे. मात्र तालुक्याच्या जवळJAWHAR SHALA PRAVESHच्या इंग्रजी शाळेत प्रवेश देण्यासाठी प्रकल्पातील शिक्षण विभागातील कनिष्ठ लिपिक बागुल यांनी संबंधित मुलांच्या पालकांकडून पैसे उकळल्याचा आरोप होत आहे. याबाबत अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद, पालघर या संघटनेने प्रकल्प अधिकार्‍यांकडे लेखी तक्रार करुन याबाबत तात्काळ चौकशी समिती नेमून बागुल यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. तसेच बागुल यांची कार्यालयातून हकालपट्टी करत जोपर्यंत चौकशी होत नाही तोपर्यंत त्यांच्याकडे संबंधित जबाबदारी देऊ नये, अशी मागणीही केली आहे.
जवळच्या शाळेत प्रवेश देण्यासाठी पालकांकडून पैसे घेऊनही शाळेत प्रवेश न मिळाल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. यानंतर मुलांच्या पालकांनी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या सदस्यांसह जव्हारच्या प्रकल्प अधिकारी पवनीत कौर (भाप्रसे) यांच्याकडे धाव घेऊन याबाबत तक्रार केली. त्यावर कौर यांनी ही गंभीर बाब लक्षात घेऊन याबाबत चौकशी करून कनिष्ठ लिपिकावर निलंबनाची कारवाई करण्यात येईल, असे आश्‍वासन दिले. सन 2017-2018 या चालू वर्षात आघई व आंबई या शाळांमध्ये प्रवेश दिलेल्या मुलांपैकी काही मुले नोकरदार वर्गातील असून त्यांच्यामुळे काही गरजू पालकांच्या मुलांना प्रवेशापासून वंचित राहावे लागत असल्याचेही यावेळी निदर्शनास आणून दिल्यानंतर त्याचीही चौकशी करून योग्य ती कारवाई केली जाईल तसेच यापुढे असे गैरप्रकार टाळण्यासाठी योग्य ती पाऊले उचलली जातील असेही, असे प्रकल्प अधिकारी कौर म्हणाल्या. दरम्यान, ज्या नामांकित शाळा या योजनेअंतर्गत प्रवेश मिळविलेल्या मुलांकडून शाळेत येण्या-जाण्यासाठीच्या प्रवासाचे पैसे आकारते अशा शाळांची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही कौर यांनी दिला आहे.
ज्या पालकांच्या मुलांना या नामांकित शाळांमध्ये प्रवेश मिळाला आहे. परंतु तेथे मुलांना योग्य शैक्षणिक सुविधा, वसतिगृहाची सुविधा मिळत नसतील तसेच मुलांची गैरसोयी होत असल्यास मला त्यांसंबंधीची माहिती व फोटो द्यावे, आपण त्यावर योग्य ती कारवाई करु, असे आवाहन कौर यांनी आदिवासी मुलांच्या पालकांना केले आहे. मुलांची गैरसोय करणार्‍या अशा शाळांवर तात्काळ कारवाई करून त्या बंद करण्यात येईल, असा कडक इशाराही त्यांनी दिला आहे. तसेच ज्या पालकांकडून कनिष्ठ लिपिक बागुल यांनी पैसे घेतले आहेत. त्या पालकांचे पैसे त्यांच्याकडून वसूल करून परत करण्यात येतील, अशी माहिती त्यांनी दिली. यावेळी महेश तराळ, संतोष चौधरी, मंगल शिंगडे, योगेश्‍वर अडबाल, नरेश बोढेरे, महेश घेगड, जयवंती बुधर यांच्यासह एकूण 25 पालक उपस्थित होते. तर संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश भोये, सल्लागार दामू मौळे, सरचिटणीस मनोज कामडी, कमळाकर महाले, प्रकाश कामडी, पंकज मौळे, ईश्वर अडबाल, अनंता पारधी व इतर सदस्य उपस्थित होते.
………………………………………………………………….
जव्हार प्रकल्पातील अनागोंदी कारभार व शाळांच्या विद्यार्थ्यांच्या यादीतील घोळ तसेच मंगल शिंगडे या विधवा महिला पालकाकडून 4 हजार रुपये उकळणारे कनिष्ठ लिपिक बागुल यांच्यावर लवकरात लवकर कारवाई करावी, अन्यथा संघटनाच पुढील दिशा ठरवेल.
महेश भोये, जिल्हाध्यक्ष, अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद पालघर

Print Friendly, PDF & Email

comments